

india vs england 3rd test lords cricket ground pitch report
भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिका सध्या 1-1 अशा बरोबरीत असून, मालिकेतील तिसरा सामना 10 जुलैपासून लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर खेळवला जाणार आहे. त्यापूर्वी, या मैदानाची खेळपट्टी फलंदाजांसाठी अनुकूल ठरेल की गोलंदाजांसाठी, यावर एक नजर टाकूया.
एजबेस्टन येथे टीम इंडियाकडून 336 धावांच्या विशाल फरकाने झालेल्या पराभवानंतर इंग्लंडच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे. त्यामुळे, लॉर्ड्स कसोटी कोणत्याही परिस्थितीत जिंकण्यासाठी यजमान संघ आतुर आहे. याच पार्श्वभूमीवर, संघाचे मुख्य प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलम यांनी लॉर्ड्सच्या क्युरेटरला आपल्या वेगवान गोलंदाजांना पूरक ठरेल अशी खेळपट्टी तयार करण्याची विनंती केली आहे. लीड्स कसोटी इंग्लंडने जिंकली होती, तर बर्मिंगहॅममध्ये विजय मिळवून भारताने मालिकेचा हिशोब बरोबरीत आणला. आता या तिसऱ्या सामन्यापूर्वी लॉर्ड्सच्या खेळपट्टीचा सविस्तर आढावा घेऊ.
लॉर्ड्सच्या खेळपट्टीचे पहिले छायाचित्र समोर आले आहे. ‘रेवस्पोर्ट्झ’ने त्यांच्या एक्स हँडवर प्रसिद्ध केलेल्या छायाचित्रात, भारतीय संघाचे फलंदाजी प्रशिक्षक सीतांशू कोटक आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर खेळपट्टीचे बारकाईने निरीक्षण करताना दिसत आहेत. खेळपट्टीवर गवताचा एकसारखा हिरवा थर स्पष्टपणे दिसून येत असून, हा थर सामन्यादरम्यान कायम राहण्याची शक्यता आहे.
याचाच अर्थ, वेगवान गोलंदाजांना खेळपट्टीकडून अधिक मदत मिळू शकते आणि खेळपट्टी लवकर खराब होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे, या सामन्यात फिरकी गोलंदाजांची भूमिका मर्यादित राहील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
जून महिन्यात याच मैदानावर खेळवण्यात आलेला जागतिक कसोटी अजिंक्यपद 2023-25 (WTC) स्पर्धेचा अंतिम सामना फलंदाजांसाठी एका दुःस्वप्नापेक्षा कमी नव्हता. त्या सामन्यात 200 धावांचा टप्पा गाठण्यासाठी संघांना संघर्ष करावा लागत होता. मात्र, अखेरच्या डावात फलंदाजी तुलनेने सोपी झाली होती, ज्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाने 282 धावांचे लक्ष्य पाच गडी राखून पार केले. त्या सामन्यात एकमेव शतक झळकले. एडन मार्करमच्या बॅटमधून तीन आकडी धावसंख्या साकारली गेली. विजेतेपदाच्या त्या सामन्यात फिरकी गोलंदाजांना केवळ तीन बळी मिळाले होते.
तथापि, यापूर्वी 2021 मध्ये जेव्हा भारतीय संघ येथे अखेरचा सामना खेळला होता, तेव्हा खेळपट्टी काहीशी वेगळी आणि फलंदाजीसाठी अधिक अनुकूल होती. तो सामना भारताने 151 धावांच्या मोठ्या फरकाने जिंकला होता.
यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (यष्टिरक्षक), करुण नायर, नितीश रेड्डी, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज, आकाश दीप, साई सुदर्शन, शार्दुल ठाकूर, प्रसिद्ध कृष्णा, जसप्रीत बुमराह, अभिमन्यू ईश्वरन, अर्शदीप सिंग, ध्रुव जुरेल आणि कुलदीप यादव.
बेन स्टोक्स (कर्णधार), हॅरी ब्रुक, जो रूट, सॅम कुक, जेकब बेथेल, जॅक क्रॉली, बेन डकेट, जेमी ओव्हरटन, ओली पोप, जेमी स्मिथ, ब्रायडन कार्स, जोश टंग, ख्रिस वोक्स, शोएब बशीर, जोफ्रा आर्चर, गस ऍटकिन्सन.