पुढारी ऑनलाईन डेस्क : R Ashwin Century : भारतीय फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने चेन्नईच्या चेपॉक अर्थात एमए चिदंबरम स्टेडियमवर फलंदाज म्हणून आश्चर्यकारक कामगिरी केली. हे त्याचे होम ग्राउंड आहे. त्याने गुरुवारी कसोटी करियरमधील सहावे शतक झळकावून विक्रमांची मालिका रचली. बांगलादेशविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात त्याने कठीण परिस्थितीत फलंदाजी करत दमदार शतक झळकावले. यासह तो कसोटी क्रिकेटमध्ये 500 हून अधिक बळी घेणारा आणि 6 शतके झळकावणारा जगातील एकमेव क्रिकेटर बनला आहे. अश्विनने रवींद्र जडेजासह बांगलादेशविरुद्ध सातव्या विकेटसाठी भारतासाठी सर्वात मोठी भागीदारी करून ऐतिहासिक विक्रमाची नोंद केली आहे.
अश्विनने 108 चेंडूत 10 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने आपले शतक पूर्ण केले. जे त्याच्या कारकिर्दीतील सर्वात वेगवान शतक आहे. 144 धावांवर भारतीय संघाच्या 6 विकेट पडल्या होत्या, पण त्याने जडेजाच्या साथीने जबादारीने खेळ केला आणि संघाला 339 पर्यंत नेले. या दोन फलंदाजांमध्ये सातव्या विकेटसाठी नाबाद 195 धावांची भागीदारी झाली. चेन्नईतील आपल्या होम ग्राउंडवर अश्विनचे हे दुसरे कसोटी शतक आहे. यापूर्वी फेब्रुवारी 2021 मध्ये त्याने इंग्लंडविरुद्ध 124 चेंडूत शतक झळकावले होते.
अश्विनचे यापूर्वीचे सर्वात वेगवान कसोटी शतक 117 चेंडूत होते, जे 2011 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध फटकावले होते. आता 108 चेंडूत त्याने बांगलादेशविरुद्ध त्याच्या कारकिर्दीतील सर्वात वेगवान शतक ठोकले. तो गोलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे हे सर्वांनाच माहीत आहे, परंतु त्याने कसोटी क्रिकेटमध्ये 3400 हून अधिक धावा केल्या आहेत, ज्यात 6 शतकांचा समावेश आहे. त्यामुळेच तो सध्या नंबर वन कसोटी अष्टपैलू खेळाडू आहे.
अश्विनने चौथ्यांदा आठव्या क्रमांकावर येऊन कसोटी शतक झळकावले आहे. या क्रमांकावर फलंदाजी करताना सर्वाधिक शतके करणारा तो भारताचा पहिला तर जगातील दुसरा फलंदाज ठरला आहे. सध्या या यादीत सर्वाधिक कसोटी शतके करण्याचा विक्रम न्यूझीलंडच्या डॅनियल व्हिटोरीच्या नावावर आहे. त्याने आठव्या क्रमांकावर येत पाच शतके झळकावली आहेत.
5 – डॅनियल व्हिटोरी
4 – रविचंद्रन अश्विन
3 – कामरान अकमल
3 - जेसन होल्डर
अश्विनसाठी चेपॉक नेहमीच खास राहिले आहे. कसोटीत एकाच मैदानावर दोन शतके झळकावणारा आणि दोन पाच किंवा त्याहून अधिक विकेट्स (फिफर्स) घेणारा तो जगातील 5वा खेळाडू ठरला आहे. यासह तो कपिल देव, इयान बोथम, ख्रिस केर्न्स आणि गॅरी सोबर्स यांच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. चेन्नईतील अश्विनचे हे दुसरे शतक आहे. या मैदानावर त्याने दोनदा पाच किंवा त्याहून अधिक विकेट्सही घेतल्या आहेत.
चेन्नई : कपिल देव (2 शतके, 2 फिफर्स)
लीड्स : इयान बोथम (2 शतके, 3 फिफर्स)
ऑकलंड : ख्रिस केर्न्स (2 शतके, 2 फिफर्स)
लीड्स : गॅरी सोबर्स (2 शतके, 2 फिफर्स).
चेन्नई : आर अश्विन (2 शतके, 4 फिफर्स)
5 : सचिन तेंडुलकर
3 : सुनील गावस्कर
2 : आर अश्विन
2 : ॲलन बॉर्डर
2 : कपिल देव
2 : दलीप मेंडिस
2 : वीरेंद्र सेहवाग
2 : अँड्र्यू स्ट्रॉस
2 : गुंडाप्पा विश्वनाथ