

टीम इंडियाचा मुख्य संघ शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली 20 जूनपासून इंग्लंड विरुद्धच्या 5 कसोटी मालिकेला सुरुवात करणार आहे. या दरम्यान, 19 वर्षांखालील भारतीय संघ देखील इंग्लंडच्या दौ-यावर आहे. भारताचा हा युवा संघ 24 जून रोजी 19 वर्षाखालील यजमान संघाविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे. पण या दौऱ्यापूर्वी भारताच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. संघातील दोन खेळाडू जखमी झाले आहेत. यात आदित्य राणा आणि खिलन पटेल यांचा समावेश आहे.
दरम्यान, दोन्ही जखमी खेळाडू इंग्लंड दौऱ्यातून बाहेर पडले आहेत. बीसीसीआयने त्याच्या जागी नव्या खेळाडूंची घोषणा देखील केली आहे. यात डी दीपेश आणि नमन पुष्पक यांचा संघात समावेश केला आहे. हे दोघेही दौऱ्यासाठी स्टँडबाय खेळाडूंच्या यादीत समाविष्ट होते.
बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्स येथे सुरू असलेल्या हाय परफॉर्मन्स कॅम्प दरम्यान आदित्यला पाठीच्या खालच्या भागात स्ट्रेस फ्रॅक्चर झाला, तर खिलनला उजव्या पायात समस्या आहे. अशा परिस्थितीत बीसीसीआयला दोन्ही खेळाडूंच्या जागी बदली खेळाडूंची घोषणा करावी लागली आहे.
बीसीसीआयने 22 मे रोजीच इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय अंडर-19 संघाची घोषणा केली होती. आयपीएल 2025 मध्ये बॅटने धुमाकूळ घालणाऱ्या वैभव सूर्यवंशीचाही संघात समावेश करण्यात आला होता. आता दौरा सुरू होण्याच्या काही दिवस आधी संघात बदल करण्यात आले आहेत. भारताच्या गोलंदाजी आक्रमणात प्रणव राघवेंद्रसारखे गोलंदाज आहेत, ज्यांनी बेंगळुरू येथील एनसीए कॅम्प दरम्यान 147 किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी करून प्रसिद्धी मिळवली होती. दुसरीकडे, इंग्लंड लायन्सने देखील एक मजबूत संघ निवडला आहे, ज्यामध्ये इंग्लंडचा माजी स्टार अँड्र्यू फ्लिंटॉफचा मुलगा रॉकी फ्लिंटॉफचाही समावेश आहे.
24 जून : 50 षटकांचा वॉर्म-अप सामना (लॉफबोरो युनिव्हर्सिटी)
27 जून : पहिला वनडे सामना (होव)
30 जून : दुसरा वनडे सामना (नॉर्थॅम्प्टन)
2 जुलै : तिसरा वनडे सामना (नॉर्थॅम्प्टन)
5 जुलै : चौथा वनडे सामना (वॉर्सेस्टर)
7 जुलै : पाचवा वनडे सामना (वॉर्सेस्टर)
12-15 जुलै : पहिला मल्टी-डे सामना (बेकेनहॅम)
20-23 जुलै : दुसरा मल्टी-डे सामना (चेम्सफोर्ड)
आयुष म्हात्रे (कर्णधार), वैभव सूर्यवंशी, विहान मल्होत्रा, मौल्यराजसिंह चावडा, राहुल कुमार, अभिज्ञान कुंडू (उपकर्णधार आणि यष्टीरक्षक), हरवंश सिंह (यष्टीरक्षक), आर.एस. अंबरीश, कनिष्क चौहान, हेनिल पटेल, युधाजीत गुहा, प्रणव राघवेंद्र, मोहम्मद एनान, अनमोलजीत सिंह, डी. दीपेश, नमन पुष्पक