

India U19 Squad: भारतीय क्रिकेटमधील दोन दिग्गज खेळाडू वीरेंद्र सेहवाग आणि राहुल द्रविड यांच्या मुलांची भारताच्या अंडर-19 संघात निवड झाली आहे. ऑस्ट्रेलिया अंडर-19 संघाच्या भारत दौऱ्यापूर्वी बीसीसीआयने भारतीय अंडर-19 संघाची घोषणा केली. विशेष म्हणजे, वीरेंद्र सेहवाग यांचा मुलगा आर्यवीर सेहवाग आणि राहुल द्रविड यांचा मुलगा अन्वय द्रविड यांना वनडे संघात स्थान मिळाले आहे.
ऑस्ट्रेलिया अंडर-19 संघाविरुद्ध भारत तीन वनडे सामने आणि दोन मल्टी-डे सामने खेळणार आहे. या दोन्ही प्रकारांसाठी वेगवेगळे संघ जाहीर करण्यात आले आहेत. वनडे मालिकेसाठी लक्ष्य रायचंदानी याच्याकडे कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे, तर यशबर्धन चौहान उपकर्णधार असेल. मल्टी-डे सामन्यांसाठी यशबर्धन चौहान कर्णधार, तर लक्ष्य रायचंदानी उपकर्णधार असेल.
आर्यवीर सेहवागची भारताच्या अंडर-19 संघात पहिल्यांदाच निवड झाली आहे. तो अलीकडेच दिल्ली प्रीमियर लीगमध्ये वेस्ट दिल्ली लायन्सकडून खेळला होता. त्याने आपल्या आक्रमक फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यापूर्वी 2024 मध्ये कूच बिहार ट्रॉफीमध्ये मेघालयविरुद्ध तब्बल 297 धावांची दमदार खेळी करून आर्यवीर चर्चेत आला होता.
राहुल द्रविड यांचा मुलगा अन्वय द्रविड यालाही वनडे संघात यष्टीरक्षक म्हणून स्थान मिळाले आहे. त्यामुळे भारताच्या अंडर-19 संघात दोन दिग्गज क्रिकेटपटूंच्या मुलांचा समावेश झाल्याने क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया अंडर-19 संघांमधील पहिला वनडे सामना 18 सप्टेंबर 2026 रोजी राजकोट येथे होणार आहे. दुसरा आणि तिसरा वनडे अनुक्रमे 21 आणि 23 सप्टेंबरला खेळला जाईल. त्यानंतर दोन मल्टी-डे सामने 27 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबरदरम्यान राजकोट आणि अहमदाबाद येथे होणार आहेत.
आता आर्यवीर सेहवाग आणि अन्वय द्रविड आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत भारतीय क्रिकेटमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण करतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
वनडे स्क्वाॅड: लक्ष्य रायचंदानी (C), यशबर्धन चौहान (VC), रजत बघेल (WK), आर्यवीर सेहवाग, वी.के. विनीत, कुशाग्र ओझा, अर्जुन राजपूत, मनाल चौहान, अन्वय द्रविड (WK), वी. यशवीर, रोहित यादव, शाविन विनोद, मोहित उलवा, चिगुरुपति वेंकटा और काव्या पटेल.
मल्टी-डे स्क्वाड: यशबर्धन चौहान (C), लक्ष्य रायचंदानी (VC), सागर विर्क, कुशाग्र ओझा, मनाल चौहान, कुश पटेल, मानव कृष्णा (WK), अभिप्राय बिस्वास (WK), रोहित यादव, ईशान ओम, अयान अकरम, प्रणव राघवेंद्र, प्रियांशु सिंह, मोहित उलवा और आर्यन यादव.
18 सप्टेंबर 2026 (शुक्रवार): पहिला एकदिवसीय सामना, राजकोट, सकाळी 9 वाजता
21 सप्टेंबर 2026 (सोमवार): दुसरा एकदिवसीय सामना, राजकोट, सकाळी 9 वाजता
23 सप्टेंबर 2026 (बुधवार): तिसरा एकदिवसीय सामना, राजकोट, सकाळी 9 वाजता
27 ते 30 सप्टेंबर 2026: पहिला बहुदिवसीय सामना, राजकोट, सकाळी 9:30 वाजता
5 ते 8 ऑक्टोबर 2026: दुसरा बहुदिवसीय सामना, अहमदाबाद बी ग्राउंड, सकाळी 9:30 वाजता