

India vs South Africa Test Series Century Crisis: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टेस्ट मालिकेत टीम इंडियाची कामगिरी अत्यंत निराशाजनक झाली आहे. पहिल्या टेस्टमध्ये 30 धावांनी पराभव झाल्यानंतर दुसऱ्या टेस्टमध्येही भारतीय फलंदाजी पूर्णपणे ढासळली. तीन डावांत भारत फक्त एकदाच 200 धावांच्या पुढे जाऊ शकला.
या मालिकेतील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे भारतीय संघाकडून अद्याप एकही शतक आलेले नाही. फक्त यशस्वी जैस्वालने पहिल्या टेस्टमध्ये 58 धावांची एक अर्धशतकी खेळी केली. त्याशिवाय एकही फलंदाज 50 धावांचाही टप्पा ओलांडू शकलेला नाही.
भारतीय संघाचे टॉप ऑर्डरपासून मिडल ऑर्डरपर्यंत सर्वच फलंदाज अपयशी ठरले आहेत.
के. एल. राहुलच्या बॅटमधून सर्वाधिक 39 धावा
ऋषभ पंतही 27 धावांवर थांबला
रविंद्र जडेजादेखील 27 धावांपलीकडे जाऊ शकला नाही
ध्रुव जुरेल एका डावात 20 धावाही करू शकला नाही
यात वॉशिंग्टन सुंदरने मात्र 48 धावांची एक उत्तम खेळी केली आणि तीन डावांत 108 धावांसह तो भारताचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. त्याच्याशिवाय एकही भारतीय फलंदाज तीन डावांत मिळून 100 धावांपर्यंत पोहोचलेला नाही.
भारताला या मालिकेत आता एकदाच फलंदाजीची संधी आहे. चौथ्या डावातही जर शतक झळकावलं नाही, तर मागील 30 वर्षांमध्ये पहिल्यांदाच भारतात खेळल्या गेलेल्या टेस्ट मालिकेत भारतीय संघ एकही शतक करू शकला नाही, अशी ऐतिहासिक नोंद होईल.
दरम्यान, दक्षिण आफ्रिकेचा ऑलराउंडर सेन्युरन मुथुसामीने गुवाहाटी टेस्टच्या पहिल्या डावात 109 धावांची जबरदस्त खेळी केली. 7व्या क्रमांकावर उतरून 206 चेंडूंमध्ये 10 चौकार आणि 2 षटकारांसह त्याने आपली सेंचुरी पूर्ण केली.
सध्याची परिस्थिती टीम इंडियासाठी अत्यंत गंभीर आहे. संपूर्ण मालिकेत फलंदाजीत सातत्यच नाही. आता भारताकडे फक्त एकच संधी आहे ती गमावली, तर ही मालिका भारतीय क्रिकेटच्या इतिहासात काळ्या अक्षरांनी नोंदवली जाईल.