

Ram Mandir Dhwajarohan :
अयोध्या: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (मंगळवार) अयोध्या दौऱ्यावर जाणार असून, रामजन्मभूमी मंदिराच्या बांधकामाची पूर्तता झाल्याचे प्रतीक म्हणून मंदिराच्या शिखरावर विधिवत भगवा ध्वज फडकवणार आहेत.
काय आहेत धर्मध्वजाची वैशिष्ट्य
हा काटकोन त्रिकोणी ध्वज दहा फूट उंच आणि बीस फूट लांब आहे. यावर ॐ सोबत कोविदार वृक्षाचे चित्र असून, भगवान श्रीरामाचे तेज आणि शौर्य दर्शवणारे तेजस्वी सूर्याचे प्रतीकही आहे. हा पवित्र भगवा ध्वज रामराज्याच्या आदर्शाना मूर्त रूप देत प्रतिष्ठा, एकता आणि सांस्कृतिक सातत्याचा संदेश देईल, असे पंतप्रधान कार्यालयाने म्हटले आहे. हा ध्वज पारंपरिक उत्तर भारतीय नागर स्थापत्यशैलीत बांधलेल्या शिखरावर फडकवला जाईल, तर मंदिराभोवती बांधलेला ८०० मीटरचा परकोटा (प्रदक्षिणा मार्ग) दक्षिण भारतीय स्थापत्यशैलीत तयार करण्यात आला असून, तो मंदिराची स्थापत्यशास्त्रीय विविधता दर्शवतो.
पंतप्रधान नरेंद्र मोदी दुपारी सुमारे 12 वाजता श्री रामजन्मभूमी मंदिराच्या 'शिखरा'वर भगवा ध्वज फडकवतील, जो मंदिराचे बांधकाम पूर्ण झाल्याचे आणि सांस्कृतिक उत्सव व राष्ट्रीय एकाग्रतेच्या नव्या अध्यायाची सुरुवात झाल्याचे प्रतीक असेल. याप्रसंगी पंतप्रधान लोकांना संबोधित देखील करतील. हा कार्यक्रम मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षाच्या शुभ पंचमी तिथीला होईल, ज्या दिवशी श्री राम आणि माता सीतेच्या विवाह पंचमीचा अभिजीत मुहूर्त देखील आहे.
पंतप्रधान मोदी या मंदिरांना देणार भेट
ध्वजारोहणानंतर पंतप्रधान मोदी अयोध्येतील विविध धार्मिक स्थळांना भेट देतील. ते सप्तमंदिरांना भेट देतील, जिथे महर्षी वशिष्ठ, महर्षी विश्वामित्र, महर्षी अगस्त्य, महर्षी वाल्मिकी, देवी अहिल्या, निषादराज गुहा आणि माता शबरी यांच्याशी संबंधित मंदिरे आहेत. यानंतर ते शेषावतार मंदिर आणि माता अन्नपूर्णा मंदिरालाही भेट देतील. दौऱ्याच्या समारोपप्रसंगी पंतप्रधान राम दरबार गर्भ गृह आणि त्यानंतर रामलला गर्भ गृहात जाऊन दर्शन आणि पूजन करतील.