

India vs Kuwait Highlights Hong Kong Sixes 2025
नवी दिल्ली : हाँगकाँग सिक्सेस टूर्नामेंट २०२५ मध्ये भारतीय संघाचे आव्हान संपुष्टात आले आहे. दिनेश कार्तिकच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला पूल-सी मधील एका महत्त्वाच्या सामन्यात कुवैतकडून २७ धावांनी पराभव पत्करावा लागला. या पराभवामुळे भारतीय संघ उपांत्यपूर्व फेरीत पोहोचू शकला नाही.
आज मोंग कोक येथील मिशन रोड मैदानावर झालेल्या या सामन्यात भारताला विजयासाठी १०७ धावांचे लक्ष्य मिळाले होते, परंतु संपूर्ण संघ ५.४ षटकांत ७९ धावांवर गुंडाळला गेला. सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. ४ षटकांनंतर कुवैतचा स्कोर ५१/४ होता. मात्र, शेवटच्या दोन षटकांत भारतीय गोलंदाजांनी ५५ धावा दिल्या, ज्यामुळे कुवैतचा संघ १०६/५ या स्कोअरपर्यंत पोहोचण्यात यशस्वी झाला. दिनेश कार्तिकने त्याच्या षटकात २३ धावा दिल्या, तर प्रियांक पांचालने शेवटच्या षटकात ५ षटकारांसह ३२ धावा दिल्या. हे दोन षटकेच सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरले. कुवैतकडून यासीन पटेलने केवळ १४ चेंडूंमध्ये नाबाद ५८ धावा केल्या, ज्यात ८ षटकार आणि दोन चौकारांचा समावेश होता.
लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. रॉबिन उथप्पा (० धावा) आणि दिनेश कार्तिक (८ धावा) दोघेही लवकर बाद झाले. प्रियांक पांचाल (१७ धावा), अभिमन्यू मिथुन (२६ धावा) आणि शाहबाज नदीम (१९ धावा) यांनी फलंदाजीत काही प्रमाणात योगदान दिले. मिथुनने शेवटच्या षटकात सलग तीन षटकार मारले, पण तोपर्यंत सामना भारतीय संघाच्या हातातून निघून गेला होता.
हाँगकाँग सिक्सेस टूर्नामेंटमध्ये एकूण १२ संघांनी भाग घेतला होता. हॉन्ग कॉन्ग, बांगलादेश, कुवैत, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांनी उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले. हाँगकाँग सिक्सेसमधील सर्वात यशस्वी संघ दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान आणि इंग्लंड हे आहेत. या तिन्ही संघांनी प्रत्येकी पाच-पाच वेळा विजेतेपद जिंकले आहे. भारताने एकदा विजेतेपद पटकावले आहे.