

वेलिंग्टन; वृत्तसंस्था : न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने भारताच्या आगामी न्यूझीलंड दौऱ्याचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले असून यानुसार, ऑक्टोबर ते डिसेंबरदरम्यान होणाऱ्या या दौऱ्यात टीम इंडिया ४० दिवसांत ५ टी-२०, ५ वन डे व २ कसोटी असे एकूण १२ आंतरराष्ट्रीय सामने खेळणार आहे. २२ ऑक्टोबरपासून सुरू होणारा हा दौरा १ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. विशेष म्हणजे सात वर्षांनंतर भारतीय संघ न्यूझीलंडमध्ये कसोटी मालिका खेळताना दिसणार आहे.
७ वर्षांनंतर न्यूझीलंडमध्ये कसोटी मालिका
भारतीय संघाने न्यूझीलंडमध्ये अखेरची कसोटी मालिका २०१९ मध्ये खेळली होती. त्यानंतर भारताने न्यूझीलंडचा दौरा केला असला तरी तो केवळ मर्यादित षटकांच्या मालिकांसाठी होता. त्यामुळे तब्बल सात वर्षांनंतर भारतीय संघ पुन्हा एकदा न्यूझीलंडच्या आव्हानात्मक परिस्थितीत कसोटी क्रिकेट खेळताना दिसणार आहे. त्याचबरोबर २०२२ नंतर प्रथमच भारतीय संघ न्यूझीलंडमध्ये मर्यादित षटकांची मालिका खेळणार आहे.
टी-२० मालिकेने होणार दौऱ्याची सुरुवात
भारतीय संघाच्या दौऱ्याची सुरुवात २२ ऑक्टोबरपासून पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेने होईल. पहिले दोन टी-२० सामने २२ आणि २४ ऑक्टोबर रोजी ख्राईस्टचर्च येथे खेळवले जातील. तिसरा सामना २७ ऑक्टोबरला वेलिंग्टनमध्ये होणार आहे. चौथा टी-२० सामना ३० ऑक्टोबरला ऑकलंड येथे रंगणार असून पाचवा आणि शेवटचा सामना १ नोव्हेंबर रोजी हॅमिल्टनमध्ये खेळवला जाईल.
४ नोव्हेंबरपासून वन डे मालिकेला सुरुवात
टी-२० मालिका संपल्यानंतर दोन्ही संघ ५ सामन्यांच्या वन डे मालिकेत आमनेसामने येतील. ही मालिका ४ ते १५ नोव्हेंबर या कालावधीत खेळवली जाणार आहे. वन डे मालिका संपल्यानंतर अवघ्या तीन दिवसांनी कसोटी मालिकेला सुरुवात होईल. पहिली कसोटी १९ ते २३ नोव्हेंबरदरम्यान वेलिंग्टन येथे खेळली जाईल. तर दुसरी आणि शेवटची कसोटी २७ नोव्हेंबर ते १ डिसेंबर या कालावधीत ख्राईस्टचर्च येथे होणार आहे. कसोटी क्रिकेटमध्ये विदेशातील कामगिरी सुधारण्याचे मोठे आव्हान संघासमोर असेल. त्यामुळे रोहित शर्मा, शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल आणि इतर खेळाडूंच्या कामगिरीकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
भारत-न्यूझीलंड मालिकेची रूपरेषा
तारीख सामना भारतीय प्रमाणवेळ ठिकाण
२२ ऑक्टोबर पहिली टी-२० ख्राईस्टचर्च दु. १.३० वा.
२४ ऑक्टोबर दुसरी टी-२० ख्राईस्टचर्च दु. १.३० वा.
२७ ऑक्टोबर तिसरी टी-२० वेलिंग्टन दु. १.३० वा.
३० ऑक्टोबर चौथी टी-२० ऑकलंड दु. १.३० वा.
१ नोव्हेंबर पाचवी टी-२० हॅमिल्टन दु. १.३० वा.
४ नोव्हेंबर पहिली वन डे ऑकलंड स. ८.३० वा.
७ नोव्हेंबर दुसरी वन डे वेलिंग्टन स. ८.३० वा.
१० नोव्हेंबर तिसरी वन डे हॅमिल्टन स. ८ ३० वा.
१३ नोव्हेंबर चौथी वन डे तौरंगा स. ८.३० वा.
१५ नोव्हेंबर पाचवी वन डे तौरंगा स. ८.३० वा.
१९ ते. २३ नोव्हें. पहिली कसोटी वेलिंग्टन पहाटे ४.३० वा.
२७ नोव्हें. ते १ डिसें. दुसरी कसोटी ख्राईस्टचर्च पहाटे ४.३० वा.