Women's Asia Cup 2026 | भारताने आठव्‍यांदा जिंकला आशिया चषक!

प्रतिस्‍पर्धी श्रीलंकेचा ७२ धावांनी एकतर्फी धुव्‍वा
Women's Asia Cup 2026 |
Women's Asia Cup 2026 | भारताने आठव्‍यांदा जिंकला आशिया चषक!
Published on
Updated on

दुबई; वृत्तसंस्‍था : शेफाली व स्‍मृती मानधनाची आक्रमक फलंदाजी व श्री चरणीच्‍या ४ बळींच्‍या जोरावर भारताने रविवारी महिला आशिया चषकाच्या अंतिम फेरीत गतविजेत्या श्रीलंकेचा ७२ धावांनी पराभव केला. या विजयासह भारताने विक्रमी आठव्यांदा आशिया चषकावर आपले नाव कोरले.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारणाऱ्या भारतीय संघासाठी दोन्ही सलामीवीरांनी १२.५ षटकांत १२९ धावांची भक्कम भागीदारी रचून विजयाचा पाया रचला. शेफाली वर्माने अवघ्या ३९ चेंडूंत ९ चौकार, २ षटकारांच्या मदतीने ६८ तर स्मृती मानधनाने ३९ चेंडूंत ५ चौकार, ३ षटकारांसह ५९ धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. डावाच्या अखेरीस युवा फलंदाज गुणालन कामलिनीने ५ चेंडूंत नाबाद १५ धावा फटकावत भारताला ५ बाद १८३ अशा आव्हानात्मक धावसंख्येपर्यंत पोहोचवले.

मानधनाने तिच्या टी-२० कारकिर्दीतील ३६ वे अर्धशतक झळकावले, तर शेफालीने महिला आशिया चषकाच्या इतिहासातील सर्वात जलद अर्धशतक ठोकण्याचा पराक्रम केला. शेफालीने अवघ्या २४ चेंडूंत ५० धावा पूर्ण करत २०२२ मधील मानधनाचा २५ चेंडूंतील अर्धशतकाचा विक्रम मोडीत काढला. ही शतकी भागीदारी अखेर प्रबोदाच्या गोलंदाजीवर संपुष्टात आली; शेफालीचा फटका थेट ३० यार्डांच्या सीमेवर उभ्या असलेल्या अटापट्टूच्या हातात विसावला. पहिल्या धक्क्यानंतर लगेचच भारताला दुसरा धक्का बसला. कर्णधार हरमनप्रीत कौरसोबत धाव घेताना झालेल्या गोंधळात मानधनाला धावबाद होऊन तंबूत परतावे लागले. या स्पर्धेत मानधना धावबाद होण्याची ही तिसरी वेळ ठरली. १५ षटकांत भारताची धावसंख्या २ बाद १४० अशी मजबूत स्थितीत होती. अखेरच्या पाच षटकांत भारतीय संघाला केवळ ४३ धावाच जोडता आल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news