Gautam Gambhir: 811 धावा, गिलचं द्विशतक अन् भारताचा ऐतिहासिक विजय; तरी गंभीर नाराज, म्हणाला, 'हे क्रिकेट नाही, फक्त...'

Gautam Gambhir: भारताने वेस्ट इंडिजविरुद्ध 406 धावांचे विक्रमी लक्ष्य पार करत वनडे क्रिकेटमध्ये इतिहास रचला.
Gautam Gambhir
Gautam Gambhir Pudhari
Published on: 
Updated on: 

Gautam Gambhir: भारताने वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात धावांचा डोंगर उभारत ऐतिहासिक विजय मिळवला. वेस्ट इंडिजने भारतासमोर तब्बल 406 धावांचे लक्ष्य ठेवले होते. हे लक्ष्य भारताने सहज पार करत वनडे क्रिकेटच्या इतिहासात नवा विक्रम नोंदवला. भारताने प्रथमच वनडेमध्ये 400 हून अधिक धावांचे लक्ष्य यशस्वीपणे गाठले.

गुवाहाटीमध्ये झालेल्या या सामन्यात तब्बल 811 धावा झाल्या. वेस्ट इंडिजने 405 धावा केल्या, तर भारताने हे लक्ष्य अवघ्या 44 व्या षटकात पार केले. भारताच्या या शानदार विजयात कर्णधार शुभमन गिल आणि रोहित शर्मा यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

शुभमन गिलने जबरदस्त फलंदाजी करत नाबाद 223 धावांची विक्रमी खेळी केली. रोहित शर्मानेही 101 धावांची शतकी खेळी करत गिलला उत्तम साथ दिली. भारताने हा सामना जिंकत तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली. मात्र, भारताच्या या मोठ्या विजयानंतरही मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर पूर्णपणे समाधानी दिसले नाहीत. सामन्यानंतर त्यांनी यामागचे कारण स्पष्ट केले.

'हे क्रिकेट नाही, ही फक्त फलंदाजी आहे'

सामन्यानंतर स्टार स्पोर्ट्सशी बोलताना गौतम गंभीर यांनी खेळपट्टीबाबत आपली नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, "खरं सांगायचं तर मला वाटतं की बॅट आणि बॉलमध्ये थोडी अधिक स्पर्धा असायला हवी. कारण आपण क्रिकेटबद्दल बोलतोय. पण हे क्रिकेट नाही, ही फक्त फलंदाजी आहे."

गंभीर पुढे म्हणाले, "जरा विचार करा, या खेळपट्टीवर एखादा युवा गोलंदाज गोलंदाजी करत आहे. समोरची टीम 400 धावा करते आणि त्यानंतर आम्हीही 400 धावांचा पाठलाग करतो. विक्रमाच्या दृष्टीने हे नक्कीच शानदार आहे. चाहत्यांसाठीही हे शानदार आहे. ब्रॉडकास्टर्ससाठीही हे चांगले आहे."

"पण तुम्ही मला एक खरा क्रिकेट चाहता आणि प्रशिक्षक म्हणून विचाराल, तर मला गोलंदाजांचीही काळजी वाटते. अशा खेळपट्टीवर गोलंदाजी करणे गोलंदाजांसाठी योग्य नाही. त्यामुळे गोलंदाजांनाही काहीतरी संधी मिळायला हवी. त्यांना कमीत कमी अशी परिस्थिती मिळायला हवी, ज्यावर ते आपल्या कौशल्याचा वापर करू शकतील," असे गंभीर यांनी स्पष्ट केले.

Gautam Gambhir
Kuldeep Yadav Record : कुलदीप @200, अशी कामगिरी करणारा दुसरा सर्वात जलद भारतीय गोलंदाज

एका सामन्यात 811 धावांचा पाऊस

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या वनडे सामन्यात अक्षरशः धावांचा पाऊस पडला. वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करताना 405 धावांचा मोठा डोंगर उभा केला.

वेस्ट इंडिजच्या डावात तीन फलंदाजांनी शतके झळकावली. जोन कॅम्बेल, कर्णधार शे होप आणि अमीर जंगू यांनी शतकी खेळी करत संघाला 400 धावांचा टप्पा पार करून दिला. वनडे क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिजच्या एका डावात तीन फलंदाजांनी शतके करण्याची ही पहिलीच वेळ ठरली.

वेस्ट इंडिजने दिलेले 406 धावांचे लक्ष्य पाहता सामना चुरशीचा होईल, अशी अपेक्षा होती. भारताने यापूर्वी वनडेमध्ये 400 हून अधिक धावांचे लक्ष्य कधीही पार केले नव्हते. त्यामुळे वेस्ट इंडिजला मालिकेत पुनरागमनाची मोठी संधी असल्याचे मानले जात होते. मात्र, शुभमन गिलच्या मनात काही वेगळेच होते.

गिलच्या द्विशतकाने इतिहास घडवला

भारताच्या डावाची सुरुवात रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी केली. दोघांनीही वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांवर सुरुवातीपासूनच दबाव निर्माण केला.

रोहित शर्माने आक्रमक फलंदाजी करत 101 धावा केल्या. त्यानंतर शुभमन गिलने डावाची सूत्रे आपल्या हातात घेतली. त्याने वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांचा समाचार घेत नाबाद 223 धावांची विक्रमी खेळी केली.

गिलने आपल्या खेळीत चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. त्याच्या या शानदार खेळीच्या जोरावर भारताने 406 धावांचे लक्ष्य अवघ्या 44 व्या षटकात पार केले.

Gautam Gambhir
Shubman Gill Century : कॅप्टन गिलचा ‘रुद्रअवतार’! ४०६ धावांच्या आव्हानावर पडला तुटून; भारतीय कर्णधार म्हणून सर्वात वेगवान शतक

भारताने हा सामना जिंकत वनडे मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली. मात्र, भारताच्या विक्रमी रनचेजपेक्षा गौतम गंभीर यांनी मांडलेला मुद्दा आता चर्चेत आला आहे.

कारण एका बाजूला 811 धावांचा हा विक्रमी सामना चाहत्यांसाठी रोमांचक ठरला, तर दुसऱ्या बाजूला गंभीर यांच्या मते अशा सपाट खेळपट्ट्यांवर गोलंदाजांसाठी सामना अधिकाधिक कठीण होत आहे. त्यांच्या मते, फलंदाज आणि गोलंदाज यांच्यात योग्य संतुलन असेल, तरच क्रिकेट खेळण्यात मजा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news