Asia Cup 2025 | ‘आरंभ हैं प्रचंड!’ यूएईचा धुव्वा..!

भारताचा आशिया चषकात 9 गडी राखून वादळी विजय; दुबळ्या यूएई संघावर चारीमुंड्या चीत होण्याची नामुष्की
Asia Cup 2025
India Vs UAE(Pudhari File Photo)
Published on
Updated on

दुबई : वृत्तसंस्था

आशिया चषक स्पर्धेसाठी आपणच जेतेपदाचे प्रबळ दावेदार का आहोत, याचा मूर्तिमंत दाखला देत भारताने येथील सलामी लढतीत दुबळ्या यूएईवर 9 गडी राखून अक्षरश: वादळी विजय साकारला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला पाचारण करत भारताने यूएईचा डाव 13.1 षटकांत अवघ्या 57 धावांत संपुष्टात आणला आणि त्यानंतर विजयाचे लक्ष्य अवघ्या 4.3 षटकांत साध्य करत यूएईच्या उरल्यासुरल्या मर्यादाही चव्हाट्यावर आणल्या.

भारताने गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्ही आघाड्यांवर केलेल्या प्रभावी कामगिरीमुळे यूएईचा संघ पूर्णपणे बॅकफूटवर फेकला जाणार, हे साहजिकच होते. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा भारताचा निर्णय अचूक ठरला. यूएईच्या फलंदाजांनी सुरुवातीला काही चांगले फटके मारले. पॉवरप्लेमध्ये त्यांनी 2 बाद 41 धावा करून भारतावर दडपण आणण्याचा प्रयत्न केला; पण त्यानंतर मात्र भारताच्या गोलंदाजांनी सामन्याचे चित्र पूर्णपणे पालटले.

Asia Cup 2025
Cricket News : दुखापतग्रस्त खेळाडूच्या जागी संघात अष्टपैलूचा समावेश! कसोटी मालिकेपूर्वी मोठा बदल

फिरकीपटू कुलदीप यादव (4/7) आणि मध्यमगती गोलंदाज शिवम दुबे (3/4) यांनी यूएईच्या मधल्या फळीला अक्षरश: सुरुंग लावला. कुलदीपने आपल्या दुसर्‍याच षटकात तीन विकेटस् घेऊन यूएईला मोठा धक्का दिला. त्याचे चेंडू फलंदाजांना कळालेच नाहीत आणि त्याचा परिणाम म्हणून एकापाठोपाठ एक गडी बाद होत गेले. शिवम दुबेनेही अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत तळाच्या फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला.

या दोघांव्यतिरिक्त वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी एक विकेट घेऊन सुरुवातीलाच यूएईला अडचणीत आणले होते. एकूणच, भारताच्या सर्वच गोलंदाजांनी केलेल्या एकत्रित प्रयत्नांमुळे यूएईचा संघ 13.1 षटकांत अवघ्या 57 धावांवर गुंडाळला गेला.

अभिषेकची वादळी सुरुवात, भारताचा लक्षवेधी विजय

अवघ्या 58 धावांचे सोपे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या भारताने हे लक्ष्य 4.3 षटकांत 1 गडी गमावून सहज पूर्ण केले. भारताचा सलामीवीर अभिषेक शर्माने 16 चेंडूंत 30 धावांची धमाकेदार खेळी केली. त्याने यूएईच्या गोलंदाजांवर सुरुवातीपासूनच आक्रमण करत भारताच्या विजयाचा पाया रचला. त्याच्या खेळीतील 2 चौकार आणि 3 उत्तुंग षटकार भारताच्या आक्रमक इराद्यांचे संकेत देणारे ठरले.

अभिषेक बाद झाल्यावर शुभमन गिलने केवळ 9 चेंडूंत नाबाद 20 धावा करून विजयाची औपचारिकता पूर्ण केली. गिलने आपल्या खेळीत काही सुरेख फटके मारले आणि संघाला कमीतकमी वेळेत विजय मिळवून दिला.

Asia Cup 2025
Lord's Cricket Ground | लॉर्डस्च्या ‘त्या’ स्लोपमुळे नेमका काय फरक पडतो?

आता बारी पाकिस्तानची

भारताने यूएईविरुद्ध सलामी लढतीत दणकेबाज विजय संपादन केल्यानंतर एका अर्थाने हा पाकिस्तान संघासाठी गर्भित इशारादेखील ठरला आहे. या स्पर्धेत भारत-पाकिस्तान यांच्यातील स्पर्धेतील सर्वात महत्त्वाची लढत रविवार, दि. 14 रोजी खेळवली जाणार आहे. मदर ऑफ ऑल बॅटल्स म्हणून ओळखल्या जाणार्‍या या उभय, कट्टर प्रतिस्पर्ध्यातील लढतीकडे अवघ्या क्रिकेट वर्तुळाचे लक्ष लागून असणार आहे.

यूएई 79 चेंडूंत ऑलआऊट, भारत अवघ्या 27 चेंडूंत विजयी!

या लढतीत यूएईचा डाव अक्षरश: पत्त्याचा बंगला कोसळावा, तसा अवघ्या 79 चेंडूंत कोसळला, तर आणखी कहर म्हणजे भारताने 58 धावांचे आव्हान अवघ्या 27 चेंडूंत सर केले. यामुळे, हा सामना केवळ 106 चेंडूंत म्हणजेच जेमतेम 17.4 षटकांतच निकाली झाल्याचे सुस्पष्ट झाले.

Asia Cup 2025
Asia Cup : भारताच्या मोहिमेचा आज श्रीगणेशा! यजमान यूएईविरुद्ध रंगणार भारताची सलामी लढत

थोडक्यात महत्त्वाचे

यूएईची 57 धावांची धावसंख्या ही टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारताविरुद्धची सर्वात कमी धावसंख्या ठरली.

भारताने 4.3 षटकांत लक्ष्य गाठून टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वात कमी षटकांत विजय मिळवण्याचा विक्रम प्रस्थापित केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news