

भारत 'अ' आणि ऑस्ट्रेलिया 'अ' यांच्यात दोन सामन्यांची अनौपचारिक कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात, तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने पहिल्या डावात ४ बाद ४०३ धावा केल्या असून अजूनही ऑस्ट्रेलियाच्या धावसंख्येपेक्षा १२९ धावांनी मागे आहेत. ऑस्ट्रेलियाने आपला पहिला डाव ६ बाद ५३२ धावांवर घोषित केला होता. दरम्यान, हा चार दिवसीय सामना आता अनिर्णित (ड्रॉ) होण्याची शक्यता आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या डावात तिसऱ्या दिवशी ध्रुव जुरेलने १३२ चेंडूंमध्ये ४ षटकार आणि १० चौकारांच्या मदतीने नाबाद ११३ धावांची शानदार खेळी केली. तसेच, देवदत्त पडिक्कलनेही १७८ चेंडूंमध्ये ८ चौकारांसह नाबाद ८६ धावा केल्या आहेत. हे दोघेही अजूनही मैदानावर आहेत. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी १८१ धावांची अभेद्य भागीदारी रचली आहे.
या सामन्यात भारताकडून तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या साई सुदर्शनने १२४ चेंडूंमध्ये १० चौकारांच्या मदतीने ७३ धावांची खेळी केली. त्याचप्रमाणे, सलामीवीर एन. जगदीशनने ११३ चेंडूंमध्ये ६४ धावा केल्या. मात्र, भारतीय कर्णधार श्रेयस अय्यरने पहिल्या डावात निराशा केली. तो केवळ ८ धावांवर बाद झाला.
ऑस्ट्रेलिया 'अ' संघाविरुद्धच्या या सामन्यात कर्णधार श्रेयस अय्यरचे अपयशी प्रदर्शन सुरूच राहिले. दिलीप करंडकातील खराब फॉर्म त्याने येथेही कायम ठेवला. दुसरीकडे, सुदर्शन, जगदीशन आणि जुरेल यांनी केलेल्या अर्धशतकी खेळीमुळे भारतीय संघाने चांगली स्थिती गाठली.