

दिल्ली कसोटीच्या चौथ्या दिवशी वेस्ट इंडिजने फलंदाजीत लक्षणीय सुधारणा दर्शवली आणि यजमान भारताला कडवी झुंज दिली. जॉन कॅम्पबेल आणि शाई होप यांच्या शतकी खेळीमुळे पाहुण्या विंडिजने सामन्याला पाचव्या दिवसापर्यंत खेचले. त्यांच्या तळाच्या फलंदाजांनीही प्रदीर्घ काळ संघर्ष केला, विशेषतः जस्टिन ग्रीव्ह्सने अखेरच्या विकेटसाठी जेडन सील्सच्या साथीने अर्धशतकी भागिदारी रचून स्वत: 50 धावांची खेळी साकारली. अखेरच्या सत्रात भारताकडून कुलदीप यादवने (3 बळी) आपला प्रभावी मारा कायम ठेवला, तर जसप्रीत बुमराहनेही (3 बळी) उत्तम गोलंदाजी करत विंडिजचा दुसरा डाव 390 धावांवर संपवला. 121 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने दिवसाचा खेळ संपेपर्यंत 1 बाद 63 धावा केल्या.
चौथ्या दिवसाच्या सकाळच्या सत्रात झटपट बळी मिळवण्याचा भारताचा प्रयत्न कॅम्पबेल आणि होप यांच्या चिवट प्रतिकारामुळे यशस्वी झाला नाही. खेळपट्टी पूर्णपणे सपाट झाली होती आणि या जोडीने बुमराहच्या भेदक गोलंदाजीचा समर्थपणे सामना केला. बुमराहला रिव्हर्स स्विंगचा थोडासा फायदा मिळाला, ज्यात कॅम्पबेल एकदा पायचीत होण्यापासून थोडक्यात बचावला. त्याला रिह्यूने वाचवले.
रवींद्र जडेजाने बुमराहच्या साथीने गोलंदाजीला सुरुवात केली, पण त्यालाही विकेट काढण्यात अपयश आले. खेळपट्टीवर कोणतीही मदत नसताना, जडेजाने फलंदाजांकडून चूक घडवून आणण्यासाठी गोलंदाजीचा अँगल बदलला. कॅम्पबेलने ९० धावांच्या टप्प्यावर बराच वेळ घालवल्यानंतर जडेजाने टाकलेल्या चेंडूवर मिड-विकेटवरून शानदार षटकार मारत आपले पहिले कसोटी शतक पूर्ण केले. मात्र, विश्रांतीनंतरच्या पहिल्याच षटकात रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न करताना कॅम्पबेल जडेचाच्या जाळ्यात अडकला आणि पायचीत झाला. यानंतर कर्णधार रोस्टन चेसने मैदानात येत संघाचा डाव सावरला. त्याने आणि होपने संघाला उपहारापर्यंत 3 बाद 252 धावांपर्यंत पोहोचवले.
नवीन चेंडू मिळताच भारताने तो त्वरित घेतला, पण यानंतर लगेचच शाई होपने ५८ डावांनंतर आपले पहिले कसोटी शतक पूर्ण केले. मात्र, मोहम्मद सिराजने अनपेक्षितरित्या त्याला त्रिफळाचीत केले; कारण चेंडू खेळपट्टीवर आदळल्यानंतर खाली राहिला आणि बॅटवर आदळून थेट यष्टींवर गेला. बुमराहचा नव्या चेंडूवरचा स्पेल विकेट न मिळवता संपला. यानंतर कर्णधार गिलने कुलदीप यादवकडे चेंडू सोपवला. इमलाकने दोनदा पुढे येत फटकेबाजी करून कुलदीपची लय बिघडवली. त्या षटकात १० धावा काढल्या. परंतु, पुढच्याच षटकात कुलदीपने इमलाकला बॅकफुटवर खेळण्यास प्रवृत्त करून पायचीत पकडले. कुलदीपने अशाचप्रकारे त्याला पहिल्या डावातही बाद केले होते.
वेस्ट इंडिजच्या लढतीचा भार चेसने उचलला. त्यानेही ७२ चेंडूंत ४० धावांची खेळी करून चांगला आत्मविश्वास दाखवला, पण कुलदीपच्या चेंडूवर शॉर्ट मिड-विकेटला उभ्या असलेल्या देवदत्त पडिक्कलकडे झेल देऊन तो बाद झाला. यानंतर बुमराहच्या 'इनस्विंगर' चेंडूवर जोमेल वारिकनची मधली स्टंप उखडली गेली. त्यानंतर बुमराहने अँडरसन फिलिप विकेटकिपर जुरेलकडे झेल देण्यास भाग पाडले. या विकेटनंतर वेस्ट इंडिजचा डाव लवकरच संपुष्टात येईल असे वाटले.
मात्र, अखेरच्या जोडीतील सील्स आणि ग्रीव्ह्सने वेगळी योजना आखली होती. त्यांनी 22 षटकांत 79 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. ग्रीव्ह्सने आपले अर्धशतक पूर्ण केले आणि सील्सनेही 30 हून अधिक धावा केल्या, पण वॉशिंग्टन सुंदरला डीप स्क्वेअर लेगवर झेल देऊन तो बाद झाला आणि वेस्ट इंडिजचा डाव संपुष्टात आला. तत्पूर्वी, भारताने एकूण 118.5 षटके गोलंदाजी केली. हा 2023 च्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध अहमदाबाद कसोटीतील पहिल्या डावानंतरचा सर्वाधिक मोठा स्पेल ठरला.
भारताला विजयासाठी 121 धावांचे माफक लक्ष्य मिळाले. लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने सुरुवातीलाच आक्रमक इरादा दाखवला. यशस्वी जैस्वालने सुरुवातीपासूनच फटकेबाजी केली, परंतु दुसऱ्याच षटकात तो वारिकनच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर मात्र केएल राहुल आणि साई सुदर्शन यांनी शांत आणि संयमी फलंदाजी करत डाव सावरला. त्यांनी कोणताही पुढील धोका न पत्करता भारताला पाचव्या दिवशीच्या सहज विजयाच्या दिशेने नेले. विजयासाठी केवळ 58 धावांची आवश्यकता आणि 9 गडी हाती असल्याने, भारतीय संघ हा सामना सहजपणे जिंकेल, असे चित्र आहे.
वेस्ट इंडिजचा गोलंदाज वारिकन याने चौथ्या डावाच्या दुस-याच षटकात भारताला मोठा झटका दिला. भारताचा सलामीवीर यशस्वी जैस्वाल केवळ ८ धावा काढून बाद झाला. जैस्वालने आक्रमक फलंदाजी करत झटपट धावा करण्याची क्षमता दर्शवली होती, परंतु त्याने लवकर विकेट गमावली. जैस्वालने क्रीझमधून पुढे सरकत मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. त्याने चेंडू लॉन्ग-ऑनच्या दिशेने हवेत टोलवला, जेथे क्षेत्ररक्षण करत असलेल्या अँडरसन फिलिपने कोणतीही चूक न करता सहज झेल पकडला. सलामीवीर जैस्वालने दोन चौकार मारले. वारिकनची अचूक गोलंदाजी आणि फिलिपचा उत्कृष्ट झेल यामुळे भारताची धावसंख्या वाढत असतानाच एक महत्त्वपूर्ण गडी बाद झाला आहे.
जॉन कॅम्पबेल आणि शाई होप यांनी दिलेल्या झुंजार प्रतिकारानंतर, वेस्ट इंडिजचा दुसरा डाव अखेर ३९० धावांवर संपुष्टात आला. तिसऱ्या दिवसाचे अखेरचे सत्र या दोन फलंदाजांनी गाजवले; ज्यांच्या तिसऱ्या विकेटच्या भागीदारीने सामन्यात जिद्द आणि नजाकत यांचा मिलाफ साधला. त्यांनी चौथ्या दिवसाच्या सकाळच्या सत्रातही तीच लय कायम ठेवली, जिथे कॅम्पबेलने आपले पहिले कसोटी शतक झळकावले, तर होपने आठ वर्षांची प्रतीक्षा संपवत शतक पूर्ण केले. या दोन्ही खेळी संयम आणि आत्मविश्वासाने परिपूर्ण होत्या.
सकाळच्या सत्राचा बराच काळ भारतीय गोलंदाजांना यश मिळाले नाही, मात्र कॅम्पबेलने जडेजाविरुद्ध रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न केला आणि तो एलबीडब्ल्यू झाला. त्यानंतर होपने रोस्टन चेसच्या रूपात सक्षम भागीदार मिळवला. या जोडीने भारताला दीर्घकाळ त्रस्त केले, पण दुसऱ्या नव्या चेंडूने डावाचे चित्र बदलले. सिराजने होपला बाद करताच वेस्ट इंडिजचा डाव कोसळण्यास सुरुवात झाली. पुन्हा एकदा खालच्या फळीतील फलंदाजांना फिरकी गोलंदाजीविरुद्ध संघर्ष करावा लागला, तर कुलदीप यादवने महत्त्वपूर्ण बळी मिळवले.
त्यानंतर ग्रीव्स आणि सील्स यांच्यात झालेली झुंजार दहाव्या विकेटची अर्धशतकी भागीदारी भारतीय खेळाडूंसाठी निश्चितच निराशाजनक ठरली. या जोडीने २२ षटके फलंदाजी करत ७९ धावा जोडल्या आणि भारतावरील आघाडी १२० धावांपर्यंत वाढवली. भारताला मिळालेले लक्ष्य माफक असून, खेळपट्टी अजूनही फलंदाजीसाठी अनुकूल असल्याने यजमान संघ हे लक्ष्य सहज पूर्ण करेल असा विश्वास आहे. भारत आजच हे लक्ष्य गाठतो की, सामना अखेरच्या दिवसाकडे सरकतो? वेस्ट इंडिजचे गोलंदाज लवकर विकेट्स मिळवून भारतावर दडपण आणू शकतील का? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
वेस्ट इंडिज संघाने या कॅलेंडर वर्षात दहाव्या विकेटसाठी एकापेक्षा अधिक वेळा ५० हून अधिक धावांची भागीदारी नोंदवली आहे. त्यांच्या या वर्षातील दहाव्या विकेटची सरासरी २२.७१ इतकी आहे. केवळ तिसऱ्या विकेटची सरासरी (२७.३५) यापेक्षा जास्त असून, याचे श्रेय कॅम्पबेल आणि होप यांच्यातील १७७ धावांच्या भागीदारीला जाते.
भारतीय गोलंदाजांना अखेरच्या दहाव्या विकेटसाठी बराच वेळ प्रतीक्षा करावी लागत आहे. वेस्ट इंडिजच्या जेडन सील्स आणि जस्टिन ग्रीव्स या जोडीने दहाव्या विकेटसाठी आतापर्यंत ५० धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी पूर्ण केली आहे. वेस्ट इंडिजने भारतावर आता ९१ धावांची आघाडी घेतली आहे. चौथ्या दिवसाच्या चहापानापर्यंत संघाने नऊ गडी गमावून ३६१ धावा केल्या आहेत.
जेडन सील्स आणि जस्टिन ग्रीव्स यांच्यामुळे वेस्ट इंडिजची आघाडी ६० धावांहून अधिक झाली आहे. वेस्ट इंडिजचा स्कोर नऊ गड्यांच्या मोबदल्यात ३४० धावांच्या पुढे गेला आहे.
३११ धावांच्या स्कोअरवर वेस्ट इंडिजला नववा झटका बसला. जसप्रीत बुमराहने अँडरसन फिलिपला त्रिफळाचीत केले. सध्या जेडन सील्स आणि जस्टिन ग्रीव्स क्रीझवर आहेत.
वेस्ट इंडिजला ३०७ धावांवर आठवा धक्का बसला. बुमराहने जोमेल वारिकनला क्लीन बोल्ड केले. सध्या अँडरसन फिलिप आणि जस्टिन ग्रीव्स क्रीजवर आहेत. वेस्ट इंडिजची भारतावर ३७ धावांची आघाडी आहे.
२९८ धावांवर वेस्ट इंडिजचा सातवा गडी बाद झाला. कुलदीप यादवने इमलाक आणि चेझ यांच्यानंतर खेरी पियरेला झेलबाद केले. पियरेला खातेही उघडता आले नाही. सध्या जस्टिन ग्रीव्स आणि जोमेल वारिकन मैदानात आहेत. वेस्ट इंडिजने सात गडी गमावून ३०३ धावा केल्या असून त्यांची आघाडी ३३ धावांवर पोहोचली आहे.
२९८ धावांच्या स्कोअरवर वेस्ट इंडिजला सहावा झटका बसला. कुलदीप यादवने इमलाक पाठोपाठ कर्णधार रोस्टन चेझला बाद केले. चेझने ४० धावा केल्या. सध्या खेरी पियरे आणि जस्टिन ग्रीव्स मैदानात आहेत. वेस्ट इंडिजची भारतावर २८ धावांची आघाडी आहे.
२९३ धावांवर वेस्ट इंडिजचा पाचवा गडी पडला. कुलदीप यादवने तेविन इमलाकला एलबीडब्ल्यू (LBW) बाद केले. त्याने १२ धावा केल्या. सध्या कर्णधार रोस्टन चेझ याच्यासोबत जस्टिन ग्रीव्स क्रीझवर आहे.
२७१ धावांच्या स्कोअरवर वेस्ट इंडिजला चौथा धक्का बसला. सिराजने शाई होपला त्रिफळाचीत केले. होप आणि चेझ यांच्यात चौथ्या विकेटसाठी ५९ धावांची भागीदारी झाली. होपने २१४ चेंडूंत १२ चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने १०३ धावांची शानदार खेळी साकारली. वेस्ट इंडिजने भारतावर आघाडी घेतली आहे. फॉलोऑन खेळताना जेव्हा वेस्ट इंडिजचा संघ मैदानात उतरला, तेव्हा भारत २७० धावांनी पुढे होता. सध्या रोस्टन चेझ याच्यासोबत तेविन इमलाक क्रीझवर आहे.
लचनंतर दुसऱ्या सत्राचा खेळ सुरु झाला आहे. फॉलोऑन खेळणाऱ्या वेस्ट इंडिजने दुसऱ्या डावात तीन गडी गमावून २५२ धावा केल्या आहेत. आजचा एकमेव धक्का जॉन कॅम्पबेलच्या रूपात बसला, ज्याला जडेजा ने एलबीडब्ल्यू केले. त्याने ११५ धावा केल्या. सध्या शाई होप (९२ धावा) आणि कर्णधार रोस्टन चेझ (२३ धावा) नाबाद खेळत आहेत. वेस्ट इंडिज अजूनही भारताच्या धावसंख्येपेक्षा १८ धावांनी मागे आहे.
चौथ्या दिवशी लंच ब्रेकपर्यंत फॉलोऑन खेळणाऱ्या वेस्ट इंडिजने दुसऱ्या डावात तीन गडी गमावून २५२ धावा केल्या आहेत. आजचा एकमेव गडी जॉन कॅम्पबेलच्या रूपात बाद झाला, ज्याला जडेजा ने एलबीडब्ल्यू केले. त्याने ११५ धावा केल्या. सध्या शाई होप (९२ धावा) आणि कर्णधार रोस्टन चेझ (२३ धावा) नाबाद आहेत. वेस्ट इंडिज अजूनही भारताच्या धावसंख्येपेक्षा १८ धावांनी मागे आहे.
२१२ धावांच्या स्कोअरवर वेस्ट इंडिजला तिसरा धक्का बसला. जडेजा ने जॉन कॅम्पबेलला एलबीडब्ल्यू केले. त्याने १९९ चेंडूंत १२ चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने ११५ धावा केल्या. कॅम्पबेलने शाई होपसोबत तिसऱ्या विकेटसाठी २९४ चेंडूंत १७७ धावांची भागीदारी रचली. सध्या होपला साथ देण्यासाठी कर्णधार रोस्टन चेझ क्रीझवर आला आहे.
जॉन कॅम्पबेलने आपल्या कसोटी कारकिर्दीतील पहिले शतक पूर्ण केले. त्याने जडेजाच्या गोलंदाजीवर षटकार मारून हे शतक पूर्ण केले. कॅम्पबेलला आपले पहिले कसोटी शतक करण्यासाठी ५० डावांचा सामना करावा लागला, जे सलामीवीरांमध्ये दुसरे सर्वाधिक आहे. वेस्ट इंडिजने दोन गडी गमावून १९० हून अधिक धावा केल्या आहेत. वेस्ट इंडिज अजूनही भारताच्या धावसंख्येपेक्षा ७० हून अधिक धावांनी मागे आहे.
चौथ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाली आहे. वेस्ट इंडिजचा संघ दोन गडी गमावून १७३ धावांवरून पुढे खेळत आहे. भारताने फिरकी गोलंदाजाकडून सुरुवात केली. रवींद्र जडेजाला गोलंदाजी देण्यात आली. सध्या जॉन कॅम्पबेल (९० धावा) आणि शाई होप (६७ धावा) क्रीझवर आहेत.
दिल्ली कसोटीच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ समाप्त झाला. फॉलोऑन खेळणाऱ्या वेस्ट इंडिजने दोन गडी गमावून १७३ धावा केल्या आहेत. संघ अजूनही भारताच्या धावसंख्येपेक्षा ९७ धावांनी मागे आहे. या कसोटीत किंवा या मालिकेत प्रथमच वेस्ट इंडिजच्या फलंदाजीने दमदार प्रदर्शन केले आहे. ३५ धावांत दोन गडी गमावल्यानंतर जॉन कॅम्पबेल आणि शाई होप यांनी तिसऱ्या विकेटसाठी आतापर्यंत २०७ चेंडूंत १३८ धावांची अभेद्य भागीदारी केली आहे. कॅम्पबेल ८७ आणि होप ६६ धावांवर नाबाद आहेत. तेजनारायण चंद्रपॉल १० धावांवर सिराजच्या चेंडूवर, तर एलिक एथनाजे सात धावांवर सुंदरच्या गोलंदाजीवर बाद झाले.
भारताने आपल्या पहिल्या डावात पाच गडी गमावून ५१८ धावा करून डाव घोषित केला होता. यानंतर वेस्ट इंडिजचा पहिला डाव २४८ धावांत संपुष्टात आला. त्यांना फॉलोऑन टाळण्यासाठी ३१९ धावा करायच्या होत्या, परंतु संघ ७१ धावांनी मागे राहिला. भारताला पहिल्या डावात २७० धावांची मोठी आघाडी मिळाली आणि संघाने वेस्ट इंडिजला फॉलोऑन खेळायला लावले. तथापि, तिसऱ्या सत्रात होप आणि कॅम्पबेलने उत्कृष्ट मनोबल दाखवत आक्रमक क्रिकेट खेळले आणि एकही विकेट पडू दिली नाही. कॅम्पबेलने आतापर्यंत नऊ चौकार आणि दोन षटकार मारले आहेत, तर होपने आठ चौकार आणि दोन षटकार लगावले आहेत.
कॅम्पबेल आणि होप ही जोडी २०१६ नंतर भारताच्या विरोधात एखाद्या कसोटीत संपूर्ण एक सत्रभर क्रीजवर टिकून राहणारी पहिली वेस्ट इंडिज जोडी बनली आहे. यापूर्वी, २०१६ मध्ये किंग्स्टन कसोटीत चेझ आणि होल्डर यांनी पाचव्या दिवशीच्या अखेरच्या सत्रात १९ षटके खेळून सामना अनिर्णित राखला होता.
गेल्या सहा कसोटी सामन्यांमध्ये वेस्ट इंडिजने भारतीय भूमीवर भारताच्या विरोधातील कसोटी सामना चौथ्या दिवसापर्यंत खेचून नेण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी वेस्ट इंडिजने २०१३ आणि २०१८ मध्ये भारताचा दौरा केला होता. त्यावेळी झालेले दोन-दोन कसोटी सामने तीन दिवसांतच संपले होते. यापूर्वी भारतीय भूमीवर दोन्ही संघांमधील कोणताही कसोटी सामना चौथ्या दिवसापर्यंत २०११ मध्ये गेला होता. त्यावेळी वानखेडे येथे झालेला सामना पाचव्या दिवसापर्यंत चालून अनिर्णित राहिला होता.
यापूर्वी वेस्ट इंडिजचा पहिला डाव २४८ धावांत संपुष्टात आला होता. वेस्ट इंडिजच्या संघाने रविवारी चार गडी गमावून १४० धावांवरून पुढे खेळायला सुरुवात केली आणि १०८ धावा जोडताना उर्वरित सहा गडी गमावले. कुलदीप यादवने भेदक गोलंदाजी करत पाच विकेट्स घेतल्या. हा त्याच्या कसोटी कारकिर्दीतील पाचवा 'फाइव्ह विकेट हॉल' ठरला.
रविवारी वेस्ट इंडिजला सुरुवातीचे तीन धक्के कुलदीपनेच दिले. त्याने शाई होप (३६), तेविन इमलाक (२१) आणि जस्टिन ग्रीव्स (१७) यांना तंबूत पाठवले. यानंतर सिराजने जोमेल वारिकनला क्लीन बोल्ड केले. वारिकनने एक धाव केली. त्यानंतर बुमराहने खेरी पियरेला बोल्ड केले. पियरेने २३ धावा केल्या. अखेरीस कुलदीपने जेडन सील्सला (१३) एलबीडब्ल्यू करत वेस्ट इंडिजचा डाव ८१.५ षटकांत २४८ धावांवर संपवला.
अँडरसन फिलिप २४ धावांवर नाबाद राहिला. यापूर्वी जॉन कॅम्पबेल १०, तेजनारायण चंद्रपॉल ३४ आणि एलिक एथनाजे ४१ धावांवर बाद झाले होते. कर्णधार रोस्टन चेझला खाते उघडता आले नाही. भारताकडून कुलदीप यादव व्यतिरिक्त रवींद्र जडेजाने तीन विकेट्स, तर बुमराह आणि सिराजने प्रत्येकी एक विकेट घेतली.