IND vs SL 3rd Day : तिसर्‍या दिवशी टीम इंडियाच्‍या सामन्‍यावर पकड, सुतार-जाडेजाची चमकदार कामगिरी

सोनल आणि डिकवेलाने श्रीलंकाला फॉलोऑनपासून वाचवले
IND vs SL 3rd Day
भारतीय संघाने सामन्यावर पकड मजबूत करत मोठी आघाडी मिळवली आहे.BCCI x
Published on
Updated on

IND vs SL Test 3rd Day : सोनल दिनुषा आणि निरोशन डिकवेला यांच्या झुंजार फलंदाजीच्या जोरावर श्रीलंकेने तिसऱ्या दिवशी फॉलोऑनचा धोका टाळला; पण भारतीय संघाने सामन्यावर पकड मजबूत करत मोठी आघाडी मिळवली आहे. भारताच्या पहिल्या डावातील ४६२ धावांच्या प्रत्युत्तरात श्रीलंकेचा पहिला डाव २८४ धावांत गारद झाला. भारताला १७८ धावांची भक्कम आघाडी मिळाली. श्रीलंकेचा डाव आटोपताच पावसाच्या आगमनामुळे तिसऱ्या दिवसाचा खेळ वेळेआधीच थांबवण्यात आला.

भारतीय गोलंदाजांचा मारा; श्रीलंकेची घसरगुंडी

भारताचा पहिला डाव संपल्यानंतर श्रीलंकेला दमदार सुरवातीची गरज होती, मात्र वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने डावाच्या दुसऱ्याच चेंडूवर दणका दिला. निशान फर्नांडो (००) सिराजच्या स्विंग चेंडूचा अंदाज न आल्याने पहिल्या स्लिपमध्ये उभ्या असलेल्या देवदत्त पडिक्कलकडे झेल देऊन बसला.

IND vs SL 3rd Day
Sunil Gavaskar : "IPLबाबत संशय घेणाऱ्यांना संधी देऊ नका.." : सुनील गावस्‍कर यांनी BCCIकडे केली मोठी मागणी

भारतीय फिरकीपटूंची चमकदार कामगिरी

सुरुवातीच्या धक्क्यानंतर भारतीय फिरकीपटूंनी दबावाचा पुरा फायदा घेतला. फिरकीपटू मानव सुतारने अचूक मारा केला. त्याने पहिल्याच चेंडूवर अनुभवी दिनेश चांदीमलला (०४) यष्टिरक्षक रिषभ पंतकरवी झेलबाद केले.त्यानंतर लाहिरू उदरा (२७) आणि कामिंदू मेंडिस (१४) खेळपट्टीवर स्थिरावलेले दिसले. मेंडिसने प्रसिद्ध कृष्णाच्या चेंडूवर एक षटकारही खेचला, तर उदराने सुतारच्या चेंडूंवर काही चौकार मारले. मात्र, सुतारने वेगाने वळणाऱ्या चेंडूवर उदराला गल्लीत यशस्वी जायसवालकरवी झेलबाद केले. दुसरीकडे, कुलदीप यादवच्या चेंडूवर मेंडिसने मारलेला उंच फटका शुभमन गिलने डाईव्ह मारून अप्रतिम झेलमध्ये बदलला. त्यानंतर रवींद्र जाडेजाच्या चेंडूवर श्रीलंकेचा कर्णधार धनंजय डी सिल्व्हा (२१) स्लिपमध्ये के. एल. राहुलकडे झेल देऊन बाद झाला.

डिकवेला-सोनलची शतकी भागीदारी

सततच्या पडझडीनंतर सोनल दिनुषा आणि निरोशन डिकवेला यांनी श्रीलंकेचा डाव सावरला. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी शतकी भागीदारी रचत दुसऱ्या सत्रात भारतीय गोलंदाजांना ताटकळत ठेवले. एका वेळी ९० धावांत ५ बाद अशा अडचणीत सापडलेल्या श्रीलंकेला या जोडीने चहापानापर्यंत दिलासा दिला. चहापानानंतर अखेर प्रसिद्ध कृष्णाने ही जोडी फोडली. त्याने डिकवेलाला रिषभ पंतकरवी झेलबाद केले. डिकवेलाने ११५ चेंडूंत ७ चौकारांच्या मदतीने ८० धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. त्याने सोनलसोबत सहाव्या विकेटसाठी १४६ धावांची भागीदारी केली.

IND vs SL 3rd Day
Ravindra Jadeja : रवींद्र जडेजाचा 'वर्ल्ड रेकॉर्ड'! १०० व्या कसोटीआधीच 'असा' पराक्रम करणारा ठरला जगातील पहिला क्रिकेटपटू

सोनलचे पहिले वहिले कसोटी शतक

डिकवेला बाद झाल्यानंतर भारताने पुन्हा सामन्यावर नियंत्रण मिळवले. रवींद्र जाडेजाने केशारा नुवांथाला गिलकरवी झेलबाद करत श्रीलंकेला सातवा धक्का दिला. यानंतर प्रभात जयसूर्या (१०) याला मानव सुतारने ध्रुव जुरेलकरवी झेलबाद केले.श्रीलंकेसाठी दिलासादायक बाब म्हणजे त्यांनी फॉलोऑन टाळला, ज्यासाठी त्यांना २६३ धावांची गरज होती. दरम्यान, सोनल दिनुषाने १६७ चेंडूंत आपल्या कसोटी कारकिर्दीतील पहिले शतक पूर्ण केले. मात्र, शतक पूर्ण करताच तो बाद झाला. सोनलने १६८ चेंडूंत ४ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने १०० धावा केल्या. श्रीलंकेची ९ वी विकेट म्हणून तो बाद झाला. त्याने सुमारे साडेचार तास खेळपट्टीवर झुंज दिली. भारताकडून पहिल्या डावात मानव सुतारने ४ बळी घेतले, तर रवींद्र जाडेजाने ३ बळी मिळवले. मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news