

नवी दिल्ली ; वृत्तसंस्था : भारताचा (Ind vs SA) उगवता स्पीडस्टार उमरान मलिक याची पदार्पणापूर्वीच धास्ती निर्माण झाली असून, आगामी मालिकेत उमरान मलिकच्या गोलंदाजीचा सामना करणे फारच कठीण जाईल, असे दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बवुमा म्हणाला आहे.
येत्या 9 जूनपासून भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान (Ind vs SA) पाच टी-ट्वेंटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. या टी-ट्वेंटी मालिकेसाठी पाहुण्या दक्षिण आफ्रिकन संघाचे नवी दिल्लीत आगमन झाले आहे. कर्णधार टेम्बा बवुमाच्या नेतृत्वाखाली आफ्रिकेचा संघ भारतात दाखल झाला असून, त्यांनी जोरदार सरावाला सुरुवात केली आहे. मालिकेतील पहिला सामना नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहे. त्यापूर्वीच दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधाराचे हे वक्तव्य चर्चेत आले आहे.
दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार माध्यमांशी चर्चा करताना म्हणाला, उमरान मलिक हा भारतीय संघाला मिळालेले मोठे अस्त्र आहे. भारतीय संघासाठी आयपीएलचा खूप चांगला फायदा झाला आहे. कारण, त्यातून त्यांना वेगवान गोलंदाजीचे पर्याय मिळाले आहेत. दक्षिण आफ्रिकेत आम्ही वेगवान गोलंदाजांना तोंड देत मोठे झालो आहोत; पण तरीदेखील आमच्यापैकी कोणत्याही फलंदाजाला ताशी 150 कि.मी. वेग असलेल्या चेंडूंचा सामना करण्याची इच्छा नसेल.
आमच्या संघातदेखील ताशी 150 प्रतिकि.मी. वेगाने गोलंदाजी करणारे गोलंदाज आहेत; पण उमरान मलिक हा भारतीय संघाला सापडलेला एक विशेष खेळाडू आहे. मला आशा आहे की, तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आयपीएलमधील कामगिरीचे अनुकरण करेल, असेही टेम्बा बवुमा म्हणाला.
हा उकाडा सोसवेना..
दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंना दिल्लीतील उष्णतेचा त्रास
भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान मालिकेतील पहिला सामना नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहे. दिल्लीतील तापमानाचा विचार केल्यास, तेथील वातावरणामध्ये प्रचंड उष्णता आहे. अगदी रात्रीचे तापमानदेखील 40 अंश सेल्सिअसच्या आसपास असते. त्यामुळे पाहुण्या खेळाडूंना राजधानीतील उष्णतेशी जुळवून घेताना कसरत करावी लागणार आहे. दक्षिण आफ्रिकेचा फिरकीपटू तबरेझ शम्सीला दिल्लीच्या हवेतील उष्णता त्रासदायक वाटू लागली आहे. याबद्दल त्याने एक ट्विट केले आहे. 'बाहेर फक्त 42 अंश तापमान आहे… अजिबात उष्णता नाही,' असे उपहासात्मक ट्विट त्याने केले आहे.