

भारतीय क्रिकेट संघ आपल्या घरच्या मैदानावर आणखी एक कसोटी मालिका गमावण्याच्या उंबरठ्यावर उभा आहे. कोलकाता येथे झालेल्या मानहानिकारक पराभवानंतर गुवाहाटी कसोटीचे निराशाजनक चित्रही फारसे उत्साहवर्धक नाही. धार नसलेली गोलंदाजी, विखुरलेली फलंदाजी आणि सततचे संशयास्पद निर्णय... यामुळे क्रिकेट चाहत्यांसह माजी खेळाडू भडकले आहेत. सोशल मीडियावर ते आपली संतप्त भावना व्यक्त करता आहेत. पण, हा संताप जास्त काळ टीकणार नाही, हेही तितकेच वास्तव आहे.
आपण सारेजण दोन-चार दिवस भारताच्या कसोटी क्रिकेटच्या भविष्यावर शोक व्यक्त करू. त्यानंतर लगेचच एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरू होईल. रोहित शर्मा आणि विराट कोहली पुन्हा एकदा झगमगाटात मैदानात दिसतील. त्यांना केवळ बघूनच चाहत्यांचा आनंद ओसंडून वाहील आणि मागचे लाजीरवाणे पराभव विसरून जाईल. तीच गत खेळाडूंचीही असेल.
त्याही पुढचा विचार केल्यास, टीम इंडिया कदाचित पुढील वर्षी मायदेशात होणारा T20 विश्वचषकही मोठ्या दिमाखात जिंकेल. त्यानंतर, IPL चा जल्लोष पुन्हा एकदा 'राष्ट्रीय सणा'च्या रूपात देशभर धुमधडाक्यात साजरा होईल. आणि मग... ऑगस्ट महिन्यात जेव्हा पुढील कसोटी मालिकेची चाहूल लागेल, तेव्हा मात्र भूतकाळात झालेल्या जुन्या पराभवांच्या जखमांवर, नव्या यशाची एक चकचकीत झालर चढलेली असेल. भारतीय क्रिकेटमध्ये 'विसरण्याची कला' ही काही नवीन गोष्ट नाही; किंबहुना, ती एक जुनी आणि अंगवळणी पडलेली सवय आहे.
कसोटी क्रिकेट हे भारतीय क्रिकेट विश्वातील ते निरागस 'बाळ' आहे, ज्याचा आदर घरातील प्रत्येकजण करतो खरा, पण त्याला देण्यासाठी मात्र वेळ कोणाकडेच नाही. टी-२० ची लोकप्रियता, आयपीएल (IPL)चे ग्लॅमर आणि त्यातून दर आठवड्याला उगवणारे झटपट 'सुपरस्टार'... या सर्वांच्या झगमगाटात, पाच दिवसांच्या या मूळ आणि महान खेळाचा 'राजमुकुट' मात्र हळूहळू आपली चमक गमावून बसत आहे.
हा संघर्ष केवळ मैदानावरील तयारीचा नाही, तर थेट मानसिकतेचा आहे. कसोटी क्रिकेटसाठी आवश्यक असणारा सराव कमी, नियोजन तोकडे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, पाच दिवसांच्या खेळासाठी लागणारे धैर्य तर सर्वात अल्प.
पराभवानंतर मात्र, 'दोष कुणाचा?' हे शोधण्याचे काम वेगाने सुरू होते. कधी बळीचा बकरा खेळपट्टी तयार करणाऱ्याला बनवले जाते, कधी टीम कॉम्बिनेशनवर चर्चा होते, कधी खेळाडूंच्या ‘वर्कलोड’चे कारण दिले जाते, तर कधी हवामानावर खापर फोडले जाते. पण, हा मूलभूत प्रश्न कोणीही विचारत नाही की, ‘पाच दिवस खेळणाऱ्या संघाला आपण वीस षटकांच्या क्रिकेटच्या विचारसरणीतून का चालवत आहोत?’
कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर जे दृश्य दिसले, त्याचीच पुनरावृत्ती गुवाहाटीच्या मैदानावर होण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. अपरिचित वाटणाऱ्या खेळपट्ट्या, खेळाडूंमधील अनिश्चित 'टेंपरामेंट' आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, 'बॅकअप प्लॅन' शिवाय मैदानात उतरलेला संघ, सर्वांनाच निराश करून गेला.
चाहत्यांच्या गगनाला भिडलेल्या अपेक्षांच्या ओझ्याखाली संघाचा आत्मविश्वास डगमगताना स्पष्टपणे जाणवला. बाहेरून पाहणाऱ्या कोणालाही हे जाणवेल की, भारत आपल्याच घरात, स्वतःच्या सोयीनुसार तयार केलेल्या परिस्थितीत देखील वाचू शकत नाहीये.
'चकाकणारी प्रत्येक गोष्ट सोने नसते.' आजच्या काळात याचे सर्वात मोठे भारतीय उदाहरण म्हणजे ‘टी-२० क्रिकेट’ आहे. सामने जिंकले जातात, रेटिंग्ज वाढतात, जाहिराती मिळतात, खेळाडू रातोरात ब्रँड बनतात. पण कसोटी क्रिकेटचे काय?
एखाद्या जुन्या नात्याला फक्त सणासुदीला आठवावे, तसे कसोटी क्रिकेटला फक्त पराभवानंतर आठवले जाते. एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेटमध्ये यंत्राप्रमाणे, स्वयंचलितपणे खेळणाऱ्या याच खेळाडूंकडून कसोटीच्या मैदानावर अचानक 'दर्जात्मक' खेळ दाखवण्याची अपेक्षा केली जाते. परंतु, असा 'दर्जा' विकत घेता येत नाही, तो कमवावा लागतो आणि त्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट लागते, ती म्हणजे वेळ. आज भारतीय क्रिकेटच्या या धावपळीच्या दिनचर्येत याच 'वेळेची' सर्वात मोठी आणि मूलभूत कमतरता जाणवत आहे.
जोपर्यंत भारतीय क्रिकेटचे संपूर्ण वेळापत्रक हे T20 च्या ग्लॅमरभोवती फिरत राहील आणि देशांतर्गत क्रिकेट हंगामात कसोटी सामन्यांना खरे महत्त्व दिले जाणार नाही, तोपर्यंत ही परिस्थिती अशीच राहणार. खेळाडूही टी-२० आणि कसोटी या दोन पूर्णपणे भिन्न फॉरमॅटच्या गरजांमध्ये आणि मागण्यांमध्ये अडकलेले राहतील. परिणामी, कसोटी क्रिकेटचे हे संकट भारतीय संघासमोर वारंवार परत येत राहील. या चक्रव्यूहातून बाहेर पडण्यासाठी क्रिकेट प्रशासनाला धोरणात्मक निर्णय घेण्याची नितांत आवश्यकता आहे.
कसोटीतील प्रत्येक पराभवानंतर आपण म्हणू, ‘संघात सुधारणा झाली पाहिजे,’ पण आयपीएल सुरू होताच सर्व काही पुन्हा ‘ऑल इज वेल’ वाटायला लागेल.
कसोटी क्रिकेटमध्ये भारताला पराभवाच्या कितीही वेदना झाल्या, तरी T20 च्या पहिल्याच सामन्यातील झगमगीत चमक दिसताच, सारे दुःख तात्काळ विसरले जाते. यामुळेच, भारतीय कसोटी क्रिकेटचे खरे संकट पराभव नाहीये, तर आपली ती ‘शॉर्ट टर्म मेमरी लॉस’ आहे.