

गुवाहाटी : भारताचा कसोटी कर्णधार शुभमन गिल हा मानेच्या दुखापतीतून पूर्णपणे सावरला नसल्यामुळे तो शनिवारी सुरू होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत खेळू शकणार नाही. उपकर्णधार ऋषभ पंत गुवाहाटी कसोटीत संघाचे कर्णधार म्हणून नेतृत्व करेल. वैद्यकीय सल्ल्यानुसार, गिल इतक्या लवकर खेळल्यास त्याला मानेचा ताण पुन्हा येण्याचा धोका आहे, त्यामुळे त्याला अधिक विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे.
दरम्यान, या घडामोडीचा परिणाम 30 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांसाठी गिलच्या निवडीवरही होऊ शकतो. या मालिकेसाठीचा संघ 23 नोव्हेंबर रोजी निवडला जाण्याची शक्यता आहे. गिलच्या अनुपस्थितीत भारत संघात बी. साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल किंवा नितीश कुमार रेड्डी यापैकी एकाची निवड केली जाऊ शकते.
द. आफ्रिकेविरुद्धच्या कोलकाता येथे झालेल्या पहिल्या कसोटीत पहिल्या डावात फक्त तीन चेंडू खेळल्यानंतर शुभमन गिलच्या मानेला दुखापत झाली होती. त्यामुळे तो निवृत्त (रिटायर्ड हर्ट) झाला होता. दुसऱ्या दिवशी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर ‘बीसीसीआय’ने तो उर्वरित कसोटीत भाग घेणार नसल्याचे स्पष्ट केले होते. कोलकाता कसोटीत असमान उसळी असलेल्या खेळपट्टीवर 124 धावांचा पाठलाग करताना भारत 93 धावांत बाद झाला आणि सामना 30 धावांनी गमावला. गिलने ऑक्टोबर 2024 मध्ये न्यूझीलंडविरुद्धची कसोटीही मानेच्या ताणामुळे गमावली होती.
भारतीय संघाचे फलंदाजी प्रशिक्षक सितांशु कोटक यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत सांगितले होते की, मानेचा ताण पुन्हा येण्याची थोडीशीही शक्यता असल्यास गिलला खेळविण्याचा धोका संघ पत्करणार नाही. गिलच्या जागी येणारे साई सुदर्शन आणि पडिक्कल हे दोघेही डावखुरे फलंदाज आहेत. कोलकाता कसोटीत भारताच्या पहिल्या आठ फलंदाजांमध्ये पाच डावखुरे फलंदाज होते. यामुळे दक्षिण आफ्रिकेचा ऑफस्पिनर सिमॉन हार्मरला (सामनावीर) मोठा फायदा मिळाला होता, या प्रश्नावर कोटक यांनी ऑफस्पिनर विरुद्ध डावखुरा फलंदाज या समीकरणावर जास्त लक्ष केंद्रित करणे अनावश्यक असल्याचे म्हटले. ते म्हणाले, दक्षिण आफ्रिकेकडे डावखुरा फिरकीपटू केशव महाराजही होता, ज्याचा फायदा भारतीय डावखुऱ्या फलंदाजांना व्हायला हवा होता.
गुवाहाटीची खेळपट्टी कोलकातापेक्षा फलंदाजांना अधिक अनुकूल असेल, अशी अपेक्षा आहे. गुरुवारच्या सराव सत्रात सुरुवातीला नेटस्मध्ये फलंदाजीला आलेले यशस्वी जैस्वाल, के. एल. राहुल, वॉशिंग्टन सुंदर, ध्रुव ज्युरेल यांच्या क्रमावरून अंतिम संघ निवडीबद्दल संकेत मिळाले नसले, तरी शुभमन गिलच्या अनुपस्थितीत आणि खेळपट्टी अधिक संतुलित राहण्याची अपेक्षा असल्याने भारत संघात चौथा फिरकीपटू घेण्याची आवश्यकता वाटणार नाही. साई सुदर्शन गिलच्या जागी आल्यास नितीश कुमार रेड्डी (वेगवान गोलंदाजी अष्टपैलू) अक्षर पटेलच्या जागी येऊन संघातील डावखुऱ्या-उजव्या हाताच्या फलंदाजांचे संतुलन राखू शकतो.