

IND vs RSA Match Cancelled: लखनौमधील भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यातील चौथा टी २० सामना दाट धुक्यामुळं रद्द करावा लागला. सामना रद्द झाल्यानंतर चाहते प्रचंड नाराज झाले होते. त्यांनी बीसीसीआयकडे तिकीटाची रक्कम परत देण्याची मागणी केली आहे. इकाना स्टेडियमवर चौथ्या टी २० सामन्यासाठी प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली होती. त्यांना सामना होईल अन् दर्जेदार खेळ पाहायला मिळेल अशी अपेक्षा होती.
भारतासाठी इकाना स्टेडियम लकी स्टेडियम आहे. या मैदानावर भारत सामना जिंकण्याची शक्यता अधिक असते. इथं भारतानं तीन सामने जिंकले आहेत. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारतीय टीमचे या सामन्यात पारडे जड मानले जात होते. मात्र धुक्यानं सगळा खेळ बिघडवून टाकला. मैदानावर इतकं धुकं पडलं होतं की साधी नाणेफेक देखील होऊ शकली नाही.
मैदानावर खेळाडूंना उतरण्याची संधी देखील मिळाली नाही. त्यामुळे स्टेडियममधील प्रेक्षक प्रचंड नाराज झाले होते. सामना रद्द झाल्यानंतर स्टेडियमबाहेर आलेल्या प्रेक्षकांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांनी अधिकाऱ्यांकडे तिकीटाचे पैसे परत करण्याची देखील मागणी केली. याबाबतचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
एका व्हिडिओत चाहता म्हणतो की, 'मी तीन पोती गहू विकून सामना पाहण्यासाठी तिकीट खरेदी केलं होतं. आता मला माझे पैसे परत पाहिजेत.'
सामन्याची वेळ ही सायंकाळी ७ वाजताची होती. नाणेफेक ६.३० वाजता होणार होता. मात्र त्यापूर्वीच इकाना स्टेडियमवर दाट धुक्याची चादर पसरली होती. पंचांनी ६.३० वाजता परिस्थितीचे परिक्षण केले. त्यावेळी मैदानावरची स्थिती खेळण्यास योग्य नव्हती. त्यांनी अर्ध्या तासाने पुन्हा परिस्थितीचा आढावा घेण्याचा निर्णय घेतला. मात्र परिस्थिती जैसे थे राहिली.
पंचांनी ७.३० आणि ८ वाजता पुन्हा आढावा घेतला मात्र परिस्थितीत कोणतीच सुधारणा झाली नाही. दरम्यान मैदानावर दव पडल्यामुळं ग्राऊंड स्टाफने खेळपट्टी सुरक्षित ठेवण्यासाठी ती झाकून ठेवली.
यानंतर पंचांनी तीनवेळा परिस्थितीचा मैदानावर जाऊन आढावा घेतला. मात्र परिस्थिती खेळण्यायोग्य नसल्यामुळं अखेर सामना कोणताही रिझल्ट न लागता रद्द करण्याचा निर्णय घेतला. मात्र यानंतर बीसीसीआयवर सामन्याच्या शेड्युलवरून जोरदार टीका होत आहे. आता भारत आणि दक्षिण अफ्रिका मालिकेचा शेटवचा सामना हा अहमदाबादमध्ये १९ डिसेंबर रोजी होणार आहे.