

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा उपकर्णधार शुभमन गिल तळपायाच्या दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या उर्वरित दोन टी-20 सामन्यांतून बाहेर पडला. चौथ्या टी-20 लढतीच्या नाणेफेकीला तासभराचा अवधी बाकी असताना ‘पीटीआय‘ने सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले. सराव सत्रादरम्यान गिलला ही दुखापत झाली असून, यातून सावरण्यासाठी संघ व्यवस्थापनाकडून सर्व आवश्यक खबरदारी घेतली जात आहे, असे या वृत्तात नमूद आहे. गिलच्या अनुपस्थितीत संजू सॅमसन सलामीला येण्याची शक्यता आहे.
शुभमन गिलसाठी अल्प कालावधीतील ही दुसरी गंभीर दुखापत आहे. कसोटी आणि वन-डे संघांचा कर्णधार असलेल्या गिलला यापूर्वी नोव्हेंबरच्या मध्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कोलकाता येथील पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान मानेची गंभीर दुखापत झाली होती. या दुखापतीनंतर त्याला तातडीने मैदानाबाहेर नेऊन वुडलँडस् रुग्णालयात निरीक्षणाखाली ठेवण्यात आले होते. यामुळे त्याला पहिल्या कसोटीतील उर्वरित खेळासह गुवाहाटीतील दुसऱ्या कसोटीला मुकावे लागले होते. तसेच, तो वन-डे मालिकेतही खेळू शकला नव्हता.
बंगळूर येथील ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’मध्ये प्रदीर्घ पुनर्वसन प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर गिलला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी तंदुरुस्त घोषित करण्यात आले होते. 8 डिसेंबर रोजी गिल म्हणाला होता, मला आता खूप चांगले वाटत आहे. येथे आल्यापासून मी अनेक सराव सत्रे पूर्ण केली असून, माझ्या कौशल्यांवर काम केले आहे. मात्र, पुनरागमन केल्यानंतर लगेचच झालेल्या या दुखापतीमुळे गिलच्या अडचणी पुन्हा एकदा वाढल्या आहेत.
दरम्यान, ‘आयसीसी’ टी-20 विश्वचषक स्पर्धा केवळ सात-एक आठवड्यांच्या उंबरठ्यावर असताना गिलचे दुखापतीतून न सावरणे भारतासाठी चिंतेचे ठरू शकते. आगामी ‘आयसीसी’ टी-20 विश्वचषक स्पर्धा दि. 7 फेब्रुवारी ते दि. 8 मार्च या कालावधीत खेळवली जाणार आहे.