

IND vs PAK U19 Asia Cup
दुबई : १९ वर्षांखालील आशिया कप 2025 मध्ये भारतीय युवा फलंदाज एरॉन जॉर्जने (Aaron George) पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध धमाकेदार खेळी केली. आज (14 डिसेंबर ) दुबईच्या आयसीसी अकादमी ग्राउंडवर झालेल्या या सामन्यात 19 वर्षीय जॉर्जने 88 चेंडूंवर 12 चौकार आणि एका षटकारासह 85 धावांची स्मरणीय खेळी केली. जॉर्जला शतकाने हुलकावणी दिली असली तरी टीम इंडियासाठी तो भावी संजू सॅमसन असल्याची चर्चा क्रिकेट वर्तुळात रंगली आहे.
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात वैभव सूर्यवंशीकडून मोठ्या अपेक्षा होत्या;पण तो केवळ ५ धावा काढून बाद झाला. अशावेळी एरॉन जॉर्जने संयमाने खेळी करत पाकिस्तानच्या भदक गोलंदाजीसमोर किल्ला लढवला. अचूक टायमिंग हेच त्याचे फलंदाजीचे वैशिष्ट रहिले. त्याच्या दमदारी खेळीमुळे भारत कठीण परिस्थितीतून बाहेर पडू शकला. जॉर्जने आधी आयुष म्हात्रेसोबत दुसऱ्या विकेटसाठी 49 धावांची भागीदारी केली. त्यानंतर त्याने पाचव्या विकेटसाठी अभिज्ञान कुंडूसह 60 धावांची भर घातली.
एरॉन जॉर्जची फलंदाजी वैभव सूर्यवंशी किंवा आयुष म्हात्रे यांच्यासारखी नव्हती. तो फटाकेबाजचा मोह त्याला झाला नाही. फलंदाजी करताना त्याचे शानदार फुटवर्क आणि गॅपमध्ये खेळत राहिला. अचूक टायमिंग साधत त्याने धावफलक हालता ठेवला. याच कौशल्यामुळे सोशल मीडियावर लोक त्याची तुलना भारताचा अनुभवी फलंदाज संजू सॅमसन याच्याशी करू लागले आहेत.
सध्याच्या स्पर्धेत एरॉन जॉर्जचा हा सलग दुसरा पन्नासहून अधिक धावांची खेळी केली आहे. यापूर्वी त्याने संयुक्त अरब अमिराती (UAE) विरुद्धच्या पहिल्या सामन्यात 73 चेंडूंवर 69 धावा केल्या होत्या, जिथे वैभव सूर्यवंशीच्या विक्रमी 171 धावांच्या जोरावर भारताने 433 धावांचा मोठा डोंगर उभा केला होता.
केरळमध्ये जन्मलेला आणि हैदराबादकडून खेळणारा जॉर्जचा हा दमदार खेळीच्या जोरावर भारतीय ज्युनियर क्रिकेटमधील चर्चेत आलेले नाव आहे. त्याने हैदराबादचे नेतृत्व करत वीनू मांकड ट्रॉफी जिंकली. तब्बल ३८ वर्षानंतर हैदराबादने मोठी ट्रॉफी जिंकली आहे. जॉर्जने वीनू मांकड ट्रॉफीच्या मागील दोन हंगामात अनुक्रमे 341 आणि 373 धावा केल्या आहेत. आता अंडर-19 स्तरावर हैदराबादचा सर्वात भरवशाचा फलंदाज बनला आहे. त्याच्या नेतृत्वाच्या क्षमतेचा अंदाज यावरून लावता येतो की, यावर्षी बंगळूरमधील भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळाच्या (BCCI) सेंटर ऑफ एक्सलन्स (COE) येथे आयोजित अंडर-19 तिरंगी मालिकेसाठी त्याला इंडिया-बी चा कर्णधार बनवण्यात आले होते.
एरॉन जॉर्जच्या या यशामागे त्याच्या कुटुंबाचा, विशेषत: त्याचे वडील ईसो वर्गीस यांचा मोठा आधार आहे. ईसो हे स्वतः क्रिकेटपटू होऊ इच्छित होते, परंतु पाठिंब्याच्या कमतरतेमुळे ते व्यावसायिक क्रिकेट खेळू शकले नाहीत. इंग्रजी वृत्तपत्र 'द हिंदू'च्या अहवालानुसार, जॉर्जचे वडील हे लीग क्रिकेट खेळले. त्यानंतर पोलीस दलात भरती झाले. मात्र मुलाच्या क्रिकेट कारकीर्दीसाठी ते कॉर्पोरेट क्षेत्रात गेले. टेबल टेनिस आणि बास्केटबॉल खेळण्याचा छंद असलेल्या एरॉन जॉर्जचा आर्दश क्रिकेटपटू हा दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डिव्हिलियर्स आहे.