

Gautam Gambhir Slams IPL Team Owner
विशाखापट्टणम : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टीम इंडियाचा कसोटी मालिकेत नामुष्कीजनक पराभव झाला. यानंतर सर्वच स्तरातून संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर ( Gautam Gambhir ) यांच्यावर टीकेची झोड उठली. शनिवारी टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा वनडे मालिकेत पराभव केल्यानंतर गौतम गंभीर यांनी आपल्या टीकाकारांना सडेतोड उत्तर दिले. कसोटीतील पराभवावरून टीका करणाऱ्या आयपीएल मालकास खडेबोल सुनावले तसेच माध्यमांवर निशाणा साधला.
टीम इंडियाने शनिवारी वनडे मालिकेतील तिसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर एकतर्फी विजय मिळवला. ३९.५ षटकांत २७१ धावांचे लक्ष्य पूर्ण केले. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत गौतम गंभीर म्हणाले की, “असे काही गोष्टी बोलल्या गेल्या ज्यांचा क्रिकेटशी काहीही संबंध नव्हता. एका आयपीएल मालकानेही स्प्लिट कोचिंगबद्दल लिहिले. हे खूप आश्चर्यकारक आहे. लोकांनी त्यांच्या क्षेत्रात राहणे महत्त्वाचे आहे. आम्ही त्यांच्या क्षेत्रात जात नाही. म्हणून, आम्ही जे करतो त्यात हस्तक्षेप करण्याचा त्यांना कोणताही अधिकार नाही,” असेही त्यांनी सुनावले.
गंभीर म्हणाले की, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतील सामन्यांचे निकाल मनासारखे लागले नाहीत. मात्र यानंतर प्रशिक्षकपदावरील टीकेचे स्वरूप पाहून मला धक्का बसला आहे. भारतीय संघाचे माजी सलामीवीराने आपली 'रेषा ओलांडत' क्रिकेटमधील फॉर्मेटनुसार प्रशिक्षण सुचवले. तसेच गंभीर यांनी आयपीएलमधील संघमालकाचे नाव घेणे टाळले. तरी त्यांचा रोख दिल्ली कॅपिटल्सचे सह-मालक पार्थ जिंदाल यांच्याकडेच होता. कारण दक्षिण आफ्रिकेकडून कसोटी मालिकेत ०-२ असा पराभव झाल्यानंतर भारताच्या कसोटी संघासाठी विशेष प्रशिक्षक असावा, असे मत त्यांनीच सुचवले होते.
गंभीर म्हणाले की, "भारताने पहिली कसोटी गमावल्यानंतर बरेच काही बोलले गेले; परंतु दोन्ही डावांमध्ये त्यांचा सर्वोत्तम फलंदाज गिल नसल्याच्या वृत्तावर माध्यमांनी पुरेसा प्रकाश टाकला नाही. बरेच काही बोलले गेले आहे, यात काही शंका नाही. हो, निकाल आमच्या मनासारखे गेले नाहीत; पण, या सगळ्यातील सर्वात धक्कादायक भाग म्हणजे एकाही माध्यम संस्थेने, एकाही पत्रकाराने असा उल्लेख केला नाही की आम्ही खेळलेल्या पहिल्या कसोटीत आमचा कर्णधार नव्हता, ज्याने दोन्ही डावात फलंदाजी केली नाही. फरक ३० धावांचा होता. मी पत्रकार परिषदेत येऊन सबबी देत नाही, याचा अर्थ असा नाही की तुम्ही सर्वजण जगासमोर तथ्ये आणणार नाही. जेव्हा तुम्ही संक्रमणातून जात असता आणि जेव्हा तुम्ही तुमचा कर्णधार गमावता, जो एक फॉर्मात असलेला फलंदाज आहे, ज्याने गेल्या सहा कसोटी सामन्यांमध्ये सुमारे १००० धावा केल्या आहेत. जेव्हा तुम्ही एका दर्जेदार विरोधी संघाचा सामना करत असता आणि तुम्ही कसोटीच्या मध्यभागी तुमचा कर्णधार गमावता तेव्हा ते कठीण होते. सर्वात आश्चर्यकारक भाग म्हणजे कोणीही यावर चर्चा केली नाही. "सर्व चर्चा खेळपट्टीबद्दल होती."
भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय मालिकेत उत्कृष्ट कामगिरी केली. आता ९ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या आगामी पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत भारत चांगली कामगिरी करेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.