

IND vs PAK Pakistan Players Mock Babar Azam in TV Show
कोलंबो : एकेकाळी पाकिस्तानचा 'बॅटिंग बॅकअप' मानला जाणारा बाबर आझम आता टीकेच्या रडारवर आहे. त्याच्या संथ खेळीमुळे वैतागलेल्या माजी पाक क्रिकेटपटूंनी थेट टीव्हीवरच त्याची फिरकी घेतली. भारताविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवून दाखव, मग बघू... अशा शब्दांत त्यांनी बाबरला डिवचले असून खास पैजाही लावण्यात आल्या आहेत.
टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये बाबर आझमची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली. नेदरलँडविरुद्ध अवघ्या १५ धावा (१८ चेंडू) करून त्याने आपली विकेट फेकली. फहीम अश्रफच्या फटकेबाजीमुळे पाकिस्तानने तो सामना वाचवला, अन्यथा नामुष्की ओढवली असती. अमेरिकेविरुद्ध त्याने ३२ चेंडूंत ४६ धावा केल्या असल्या, तरी मोहम्मद आमीर, अहमद शहजाद आणि राशिद लतीफ यांसारख्या दिग्गजांचे समाधान झाले नाही.
एका टीव्ही शोमध्ये पाकिस्ताने माजी खेळाडू अहमद शहजाद, मोहम्मद आमीर आणि राशिद लतीफ यांनी बाबरला १५ फेब्रुवारी रोजी कोलंबोतील आर. प्रेमदासा स्टेडियमवर होणाऱ्या भारताविरुद्धच्या सामन्यात 'मॅच विनिंग' खेळी करण्याचे आव्हान दिले. यावेळी या त्रयीने काही मजेशीर अटी आणि पैजाही लावल्या.
अहमद शहजादची घोषणा : ‘जर बाबर आझमने भारताविरुद्ध पाकिस्तानला विजय मिळवून दिला, तर स्टुडिओतील संपूर्ण प्रेक्षकांसाठी जेवणाची मेजवानी माझ्याकडून असेल,’ असे शहजाद म्हणाला.
मोहम्मद आमीरचा निवृत्तीवर विचार : निवेदकाने आमीरला विचारले की बाबरने मोठी खेळी केल्यास तो काय करणार? त्यावर आमीरने सांगितले की, ‘जर बाबरने ३० पेक्षा जास्त धावा करून सामना जिंकवला, तर मी माझ्या आंतरराष्ट्रीय निवृत्तीच्या निर्णयाचा पुनर्विचार करेन.’
या चर्चेदरम्यान जेव्हा अहमद शहजादने ‘बाबर रविवारी अर्धशतक करेल’ अशी पैज लावली, तेव्हा राशिद लतीफने उपरोधिक टोला लगावला. तो म्हणाला, ‘बाबर खेळपट्टीवर इतका वेळ टिकतच नाही, त्यामुळे या पैजा आताच बदलून घ्या.’ या विधानानंतर स्टुडिओमध्ये एकच हशा पिकला. निवेदकासह आमीर आणि शहजादही आपले हसू रोखू शकले नाहीत.
भारताविरुद्ध बाबर आझमची कामगिरी आकडेवारीच्या निकषावर बेभरवशाची राहिली आहे. ५ टी-२० सामन्यांत त्याने केवळ २६.२५ च्या सरासरीने १०५ धावा जोडल्या आहेत. २०२१ च्या विश्वचषकातील त्या एका नाबाद ६८ धावांच्या खेळीचा अपवाद वगळता, मागील दोन विश्वचषकांत त्याने अनुक्रमे ० आणि १३ धावा करून घोर निराशा केली आहे. बाबरच्या याच खराब कामगिरीमुळे पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आगा याने 'संघहितासाठी बाबरला डच्चू देण्यासही आपण कचरणार नाही', असा स्पष्ट इशारा दिला आहे.