पुढारी ऑनलाईन डेस्क : रचिन रविंद्र (Rachin Ravindra) याच्या दमदार शतकी खेळीच्या जोरावर पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी न्यूझीलंडने भारताविरुद्ध (IND vs NZ 1st Test) ३५६ धावांची भक्कम आघाडी घेतली. पहिल्या डावात भारताला ४६ धावांत गुंडाळल्यानंतर न्यूझीलंडने चांगली फलंदाजी केली. न्यूझीलंडचा पहिला डाव आज ४०२ धावांवर आटोपला.
रचिनने १५७ चेंडूत १३४ धावांची खेळी केली. पण कुलदीप यादवच्या फिरकीत रचिन रविंद्र अडकला. कुलदीपने रचिनला झेलबाद केले. ध्रुव जुरेलने त्याचा झेल टिपला. दरम्यान, बंगळूर येथील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवरील पहिल्या सामन्यात २०१२ नंतर भारतात कसोटी शतक झळकावणारा रचिन रविंद्र हा न्यूझीलंडचा पहिला फलंदाज ठरला आहे.
याआधी अशी कामगिरी रॉस टेलर ह्या न्यूझीलंडच्या खेळाडूने केली होती. त्याने २०१२ मध्ये याच मैदानावर १२७ चेंडूत ११३ धावा केल्या होत्या. रचिन रविंद्रने १३ चौकार आणि ४ षटकार ठोकत विस्फोटक खेळी केली. त्याने टीम साउदीसोबत भक्कम भागीदारी केली.
बंगळूरच्या मैदानावर शतक झळकावणारा रचिन रविंद्र हा पाचवा परदेशी खेळाडू आहे. त्याच्या आधी येथे ऑस्ट्रेलियाचा मायकेल क्लार्क, ॲडम गिलख्रिस्ट, रिकी पाँटिंग आणि न्यूझीलंडचा रॉस टेलर यांनाच ही कामगिरी करता आली होती. आता २४ वर्षीय रचिन देखील या यादीत सामील झाला आहे.
रविंद्रने २०२१ मध्ये भारताविरुद्ध कानपूर कसोटीत पदार्पण केले होते. या वर्षाच्या सुरुवातीला त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिले शतक केले होते. आता हे त्याचे १९ डावांमधील दुसरे कसोटी शतक आहे. रचिनने आई- वडील मूळचे भारतीय आहेत. पण त्यांचा जन्मू न्यूझीलंडची राजधानी वेलिंग्टनमध्ये झाला. रचिनचे आजी-आजोबा आजही बंगळूरमध्ये राहतात. त्यामुळे रचिनसाठी बंगळूर हे घरच्या मैदानासारखे आहे. आतापर्यंत त्याने कसोटी ३६६ चेंडूत २४० धावा पूर्ण केल्या आहेत.