

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ 1st Test) यांच्यात बंगळूर येथे सुरु असलेल्या पहिल्या कसोटीत शनिवारी (दि.१९) टीम इंडियाचा फलंदाज सरफराज खान (Sarfaraz Khan) याने इतिहास रचला. कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी सरफराजने शतक झळकावले. त्याने ११० चेंडूत १३ चौकार, ३ षटकार ठोकत शतकी खेळी केली. आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्दीतील त्याचे हे पहिले शतक आहे.
सरफराज खानने शनिवारी बंगळूर येथील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात पहिले आंतरराष्ट्रीय शतक झळकावले. २६ वर्षीय सरफराजने ९०.९१ च्या स्ट्राइक रेटने शतक पूर्ण केले. सरफराज खान आज (दि. १९) टीम इंडियाकडून चौथा कसोटी सामना खेळत आहे. त्याने आतापर्यंत ७ डाव खेळले असून त्याच्या बॅटमधून ३०० धावा झाल्या आहेत. त्याच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये १ शतक आणि ४ अर्धशतके आहेत.
फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये त्याने ५१ सामने खेळले असून त्यात त्याने ७६ डावांत ६९.०९ सरासरीने ४,४२२ धावा केल्या आहेत. सरफराजच्या नावावर फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये १५ शतके, १४ अर्धशतकांची नोंद आहे. त्याची वैयक्तिक सर्वोत्तम धावसंख्या ३०१ एवढी आहे. त्याशिवाय सरफराज खानने टी-२० मध्येही चांगली कामगिरी केली आहे. त्याचा एकूण ९६ सामन्यांत सहभाग राहिला. त्याने ७४ डावांत २२.४१ च्या सरासरीने १,१८८ धावा केल्या आहेत. टी-२० मध्ये त्याच्या नावावर ३ अर्धशतके आहेत.
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने पहिल्या डावातील अपयश विसरून आपल्या दुसऱ्या डावात जोरदार कमबॅक केले. गुरुवारी भारताचा पहिला डाव अवघ्या ४६ धावांत गारद झाला होता. प्रत्युत्तरात न्यूझीलंडने रचिन रवींद्रच्या शतकाच्या (१३४) बळावर ४०२ धावा केल्या. यानंतर, शुक्रवारी तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने आपल्या दुसऱ्या डावात ३ बाद २३१ धावा केल्या होत्य़ा. आज शनिवारी खेळाचे पहिले सत्र सरफराज खान आणि ऋषभ पंतने गाजवले. सरफराज खानच्या शतकाच्या जोरावर भारताने आपला डाव सावरला आहे.