India vs England Test 2025 Yashasvi Jaiswal
लंडन : भारत आणि इंग्लंड यांच्यात लंडनच्या 'द ओव्हल' मैदानावर सुरू असलेल्या तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीच्या पाचव्या कसोटीत दुसऱ्या दिवशी हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. यशस्वी जैस्वालच्या आक्रमक फलंदाजीने इंग्लंडचा कर्णधार ओली पोप इतका धास्तावला की, त्याने पंचांपुढे फिरकी गोलंदाज वापरण्यास नकार दिला आणि खेळ थांबवणं पसंत केलं. यावेळी त्याने पंचांशी खोटं बोलल्याचाही आरोप होत आहे, ज्याचा व्हिडिओ सध्या चर्चेत आहे.
भारतीय संघाने पहिल्या डावात २२४ धावा केल्या होत्या, ज्याला प्रत्युत्तर देताना इंग्लंडने २४७ धावा करून २३ धावांची नाममात्र आघाडी घेतली. दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा भारताने २ गडी गमावून ७५ धावा केल्या होत्या आणि इंग्लंडवर ५२ धावांची भक्कम आघाडी मिळवली होती.
शुक्रवारी ( दि. १ ) दुसऱ्या दिवसाचा खेळ संपायला १५ मिनिटे शिल्लक असताना, खराब प्रकाशामुळे पंचांनी खेळ थांबवण्याचे संकेत दिले. पंच कुमार धर्मसेना यांनी इंग्लंडचा कर्णधार ओली पोपला केवळ फिरकी गोलंदाजांनाच गोलंदाजी करण्याची परवानगी दिली. मात्र, पोप याला तयार झाला नाही. वेळ 'ओव्हरटाईम'मध्ये असल्याने पंचांनी अखेर दिवसाचा खेळ संपल्याचे जाहीर केले. खरं तर, पोपच्या निर्णयामागे यशस्वी जायसवालची आक्रमक फलंदाजी हे मुख्य कारण होते. जायसवालने आत्मविश्वासाने सात चौकार आणि दोन षटकारांसह ५१ धावा करत इंग्लिश फिरकी गोलंदाजांचा धुव्वा उडवला होता. इंग्लंडच्या संघात जो रूट, हॅरी ब्रूक आणि जेकब बेथेल यांच्या रूपाने फिरकीचे पर्याय उपलब्ध होते. पण जैस्वालसमोर फिरकी गोलंदाज आल्यास महागात पडेल, हे पोपला समजले. त्यामुळे त्याने फिरकी गोलंदाजी टाळून अंधाराचा आधार घेत सामना लवकर संपवणेच पसंत केले.
जेव्हा पंच धर्मसेना यांनी पोपला 'तुम्ही फक्त फिरकी गोलंदाजी करू शकता, अन्यथा आजचा खेळ संपला असे मानले जाईल' असे सांगितले, तेव्हा पोप म्हणाला, "आमच्याकडे स्पिनर्स नाहीत." त्याच्या या उत्तराने पंचांनाही आश्चर्य वाटले. मात्र, काही क्षणातच त्याने "मी मस्करी करत आहे" असे म्हणत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा खरा हेतू स्पष्ट दिसत होता.