

Ind vs Eng Test Match
लीडस् : बेन डकेट-क्राऊली यांनी 188 धावांची तडाखेबंद सलामी रचत विजयाची भक्कम पायाभरणी केल्यानंतर अनुभवी जो रूटने नाबाद 53 धावांची खेळी साकारत त्यावर भक्कम कळस चढवला आणि याच बळावर इंग्लंडने भारताला येथील पहिल्या कसोटी सामन्यात चारीमुंड्या चीत केले. विजयासाठी तब्बल 371 धावांचे तगडे आव्हान असतानादेखील इंग्लंडने 82 षटकांत 5 बाद 373 धावांसह सनसनाटी बाजी मारली. या निकालासह भारताचा कर्दनकाळ ठरत आलेला जो रूट पुन्हा एकदा भारताच्या मुळावर आल्याचे अधोरेखित झाले.
या विजयासह इंग्लंडने 5 सामन्यांच्या या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. या लढतीत इंग्लंडने 371 धावांचा पाठलाग करताना बिनबाद 21 वरून आश्वासक, महत्त्वाकांक्षी सुरुवात केली. मधल्या षटकात शार्दूल ठाकूरने बेन डकेट व हॅरी ब्रूक, तर प्रसिद्ध कृष्णाने ओली पोप, झॅक क्राऊली यांचे बळी घेत इंग्लिश फलंदाजीला भगदाड पाडण्यास सुरुवात केली होती; पण याचवेळी जो रूट व बेन स्टोक्स यांनी 49 धावा जोडत संघाला विजयाच्या उंबरठ्यावर आणले. पुढे स्टोक्सला जडेजाने गिलकरवी झेलबाद केले, त्यावेळी इंग्लंडची 5 बाद 302 अशी स्थिती होती. यावेळी भारत आणि भारताचा विजय यात केवळ रूटचाच अडसर होता; पण हा अडसर नंतर एखाद्या भक्कम तटबंदीप्रमाणे अभेद्य राहिला आणि भारताच्या हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिसकावला गेला. जेमी स्मिथने षटकार खेचत इंग्लंडच्या स्वप्नवत विजयावर शिक्कामोर्तब केले, त्यावेळी त्या षटकाराकडे पाहत राहण्याशिवाय, भारतीय क्षेत्ररक्षकांकडे काहीच पर्याय नव्हता.
एरवी, बुमराह हा जलद गोलंदाजीचा बादशाह असतो. तो आला, त्याने पाहिले, तो जिंकला, हे म्हणावे, ते या बुमराहसाठीच...इतका त्याचा दबदबा. मंगळवारचा दिवस मात्र कदाचित अलिखित ब्रिदाला जागणारा नव्हता. येथे बुमराह आला. त्याने सर्वस्व पणाला लावून, जीव ओतून गोलंदाजीही केली; पण जे अपेक्षित यश होते, ते हाताशी लागलेच नाही, उलटपक्षी ते दूर दूर पळत गेले. बुमराहचे प्रयत्न थकताना पाहण्याची भारतीय क्रिकेटरसिकांना सवयच नाही; पण बुमराहदेखील कधी कधी अपयशी ठरू शकतो, याची प्रचिती यावेळी आली.
एकीकडे, बुमराह सपशेल अपयशी ठरत असताना शार्दूल व प्रसिद्ध कृष्णा यांनी प्रत्येकी दोन-दोन गडी बाद करत भारतासाठी जणू विजयाचे कवडसे खुले केले; पण अनुभवी रूटला नवख्या जेमी स्मिथची हवीहवीशी साथ मिळाली आणि या जोडीने सहाव्या गड्यासाठी 14.3 षटकांत 71 धावांची अभेद्य भागीदारी साकारत भारताच्या विजयाच्या आशाअपेक्षांवर विरजण टाकले!
इंग्लिश फलंदाजीचा भक्कम आधारस्तंभ जो रूटची फलंदाजी दडपणाखाली, भारताविरुद्ध नेहमीच बहरते, हा पूर्वानुभव आहे. त्याचीच पुनरावृत्ती येथील लीडस् क सोटीतही झाली. रूटने येथे 84 चेंडूंत 6 चौकारांसह नाबाद 53 धावांची अभेद्य खेळी साकारली आणि हाच या सामन्यातील निर्णायक क्षण ठरला.
या सामन्यात भारतीय संघातर्फे प्रथमच एकाच सामन्यात 5 शतके झळकीवली गेली होती; पण ती पाच शतकेही भारताला विजय मिळवून देण्यास असमर्थ ठरल्याचे निकालावरून सुस्पष्ट झाले.
बेन डकेट आणि झॅक क्राऊली यांनी इंग्लंडच्या दुसर्या डावातही महत्त्वपूर्ण शतकी भागीदारी रचली. यासह तब्बल 41 वर्षांनंतर हेडिंग्लेच्या मैदानावर चौथ्या डावात 100 पेक्षा जास्त धावांची सलामी भागीदारी नोंदवली गेली. यापूर्वी 1984 मध्ये वेस्ट इंडिजचे दिग्गज सलामीवीर डेसमंड हेन्स आणि गॉर्डन ग्रीनिज यांनी 106 धावांची भागीदारी केली होती. 5 सामन्यांच्या मालिकेत इंग्लंड 1-0 फरकाने आघाडीवर