

मँचेस्टर : भारत आणि इंग्लंड यांच्यात मँचेस्टरच्या ऐतिहासिक ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर कसोटी मालिकेतील चौथा सामना खेळवला जात आहे. हे मैदान अनेक ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार राहिले आहे; पण या मैदानावर असा एक विक्रम आहे, जो गेल्या 60 वर्षांपासून अबाधित आहे. तो विक्रम म्हणजे कसोटी सामन्यात त्रिशतक झळकावण्याचा. ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार बॉब सिम्पसन हे ओल्ड ट्रॅफर्डवर त्रिशतक झळकावणारे एकमेव फलंदाज आहेत.
ही ऐतिहासिक घटना घडली होती 23 ते 28 जुलै 1964 दरम्यान ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या कसोटी सामन्यात. त्यावेळी ऑस्ट्रेलियन कर्णधार बॉब सिम्पसन यांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता, जो पुढे जाऊन ऐतिहासिक ठरला.
सिम्पसन यांनी तब्बल 743 चेंडूंचा सामना करत 311 धावांची मॅरेथॉन खेळी साकारली. त्यांनी 762 मिनिटे (12 तास आणि 42 मिनिटे) फलंदाजी केली. या खेळीत त्यांनी 23 चौकार आणि एक षटकार लगावला. सिम्पसन यांच्या या शानदार फलंदाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने 8 बाद 656 धावांवर आपला पहिला डाव घोषित केला.
हा सामना अनिर्णीत राहिला असला, तरी तो बॉब सिम्पसन यांच्या ऐतिहासिक त्रिशतकासाठी कायमचा स्मरणात राहिला. आज 60 वर्षांनंतरही ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानावर कोणत्याही फलंदाजाला त्रिशतक झळकावता आलेले नाही, ज्यामुळे सिम्पसन यांचा हा विक्रम क्रिकेटच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरला गेला आहे.