

ind vs eng 4th test akash deep ruled out of manchester test
मँचेस्टर : इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यापूर्वी भारतीय क्रिकेट संघाला एक मोठा धक्का बसला आहे. संघाचा वेगवान गोलंदाज आकाश दीप दुखापतीमुळे या महत्त्वपूर्ण सामन्यात खेळू शकणार नाही, हे आता स्पष्ट झाले आहे. भारतीय संघ 23 जुलै रोजी मँचेस्टरच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध चौथ्या कसोटीसाठी उतरणार असून, मालिकेत आधीच पिछाडीवर असलेल्या संघापुढील अडचणी कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत.
मँचेस्टर कसोटीला अवघे काहीच तास शिल्लक असताना, आकाश दीप बाहेर झाल्याचे वृत्त समोर आले आहे. याविषयीची शक्यता आधीपासूनच वर्तवण्यात येत होती, मात्र आता या वृत्ताला दुजोरा मिळाला आहे. त्यामुळे, कर्णधार शुभमन गिलसमोर संघाची घडी बसवण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.
इंग्लंड दौऱ्यावर असलेला भारतीय संघ सध्या संकटात सापडला आहे. अर्शदीप सिंग आणि नितीश कुमार रेड्डी चौथ्या कसोटीत संघाचा भाग नसतील, हे दोन दिवसांपूर्वी स्पष्ट करण्यात आले होते. आता आकाश दीपदेखील या सामन्यातून बाहेर झाला असून, त्याच्या नावाचा निवडीसाठी विचार केला जाणार नाही, हे स्पष्ट झाले आहे.
आकाश दीपने या मालिकेत आतापर्यंत दोन सामन्यांमध्ये सहभाग घेतला आहे. मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताने मिळवलेल्या विजयात आकाश दीपचे योगदान मोठे आणि महत्त्वपूर्ण होते. परंतु, तिसऱ्या कसोटीत त्याची गोलंदाजी निष्प्रभ ठरली. त्या सामन्यात जसप्रीत बुमराहने उत्कृष्ट गोलंदाजी केली, मात्र आकाश दीपकडून तशी प्रभावी कामगिरी झाली नाही. हेच संघाच्या पराभवाचे एक प्रमुख कारण ठरले, ज्यामुळे भारतीय संघ मालिकेत पिछाडीवर गेला.
मालिकेतील चौथा सामना मँचेस्टरच्या मैदानावर खेळवला जाईल. विशेष म्हणजे, या मैदानावर भारतीय संघाला आजपर्यंत एकही कसोटी सामना जिंकता आलेला नाही. या इतिहासाची कर्णधार शुभमन गिलला निश्चितच कल्पना असेल. त्यातच, जे खेळाडू अंतिम 11 मध्ये खेळण्याची दाट शक्यता होती, तेच आता संघाबाहेर झाल्याने संघावर ओढवलेले संकट अधिकच गडद झाले आहे.
मँचेस्टर कसोटीत जसप्रीत बुमराहचे खेळणे जवळपास निश्चित मानले जात आहे, परंतु आकाश दीपची उणीव कशी भरून काढायची, याचे उत्तर कर्णधार गिलला शोधावे लागेल. जर हा सामना भारताने गमावला, तर संघाला मालिकाही गमवावी लागेल आणि इंग्लंडमध्ये दीर्घ कालावधीनंतर कसोटी मालिका जिंकण्याचे भारतीय संघाचे स्वप्न पुन्हा एकदा अधुरे राहील.