

WTC 2025 Final South Africa squad announcement
जोहान्सबर्ग : 2025 च्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना द. आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला जाणार आहे. द. आफ्रिकेने या अंतिम सामन्यासाठी मंगळवारी (दि. 13) 15 सदस्यीय संघ जाहीर केला. संघाचे नेतृत्व टेम्बा बावुमा सोपवण्यात आले आहे. तर डोपिंगमुळे नुकतीच एक महिन्याची बंदी घालण्यात आलेल्या वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाचे संघात पुनरागमन झाले आहे.
इंग्लंडमधील ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर WTC फायनचा थरार रंगणार आहे. हा सामना 11 ते 15 जून दरम्यान खेळला जाणार आहे. बावुमाच्या नेतृत्वाखालील द. आफ्रिका संघ जलद गोलंदाजांनी सुसज्ज झाला आहे. 15 खेळाडूंच्या संघात अर्धा डझन वेगवान गोलंदाजांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये दुखापतीतून परतलेल्या लुंगी एनगिडीसह मार्को जॉन्सन, कॉर्बिन बॉश आणि विआन मुल्डर हे वेगवान गोलंदाजीचे नेतृत्व करताना दिसतील. फिरकी विभागाची धुरा केशव महाराज आणि सेनुरन मुथुस्वामी यांच्याकडे असेल.
‘द. आफ्रिका संघ जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी पूर्णपणे तयार आहे. संघात कोणतीही कमतरता नाही,’ असा विश्वास संघाचे मुख्य प्रशिक्षक शुक्री कॉनराड यांनी व्यक्त केला आहे.
प्रोटीज संघाने पाकिस्तानविरुद्ध खेळलेल्या 16 जणंच्या संघात संघात 2 बदल केले आहेत. क्वेना म्फाका आणि मॅथ्यू ब्रेट्झके यांना वगळण्यात आले.
2023-25 च्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या चक्रात द. आफ्रिकेने एकूण 12 कसोटी सामने खेळले. त्यापैकी त्यांनी 8 सामने जिंकून 69.44 गुणांची टक्केवारी गाठली. यासह प्रोटीज संघ टेबल टॉपर राहिला.
डोपिंग चाचणीत पॉझिटिव्ह आढळल्यानंतर कागिसो रबाडावर एक महिन्याची बंदी घालण्यात आली. त्याने SA20 लीगपूर्वी कोकेनचे सेवन केले होते, चौकशीत ही बाब समोर आली. त्यानंतर आयपीएल 2025 मध्ये खेळताना त्याला मायदेशी परतावे लागले. यादरम्यान त्याच्यावर एक महिन्याची बंदी घालण्यात आली होती.
टोनी डी झोर्झी, रायन रिकेलटन आणि एडेन मार्कराम हे टॉप-ऑर्डर पर्याय आहेत. ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड बेडिंगहॅम आणि बावुमा हे मधल्या फळीत खेळताना दिसतील. काइल व्हेरेन यष्टीरक्षक असेल. अष्टपैलू खेळाडू वायम मुल्डर आणि मार्को जॅन्सन हे देखील फलंदाजीमध्ये योगदान देऊ शकतात.
टेम्बा बावुमा (कर्णधार), टोनी डी झोर्झी, एडन मार्कराम, विआन मुल्डर, मार्को जॅन्सन, कागिसो रबाडा, केशव महाराज, लुंगी एनगिडी, कॉर्बिन बॉश, काइल वेरेने, डेव्हिड बेडिंगहॅम, ट्रिस्टन स्टब्स, रायन रिकेल्टन, सेनुरान मुथुसामी, डॅन पॅटरसन.