

ICC announce massive prize money hike for Women s ODI World Cup 2025
मुंबई : भारतामध्ये 30 सप्टेंबरपासून महिला एकदिवसीय वर्ल्ड कप स्पर्धेला धमाकेदार सुरुवात होत आहे. स्पर्धेचा अंतिम सामना 2 नोव्हेंबर रोजी खेळला जाईल. या बहुप्रतिक्षित स्पर्धेसाठी यापूर्वीच भारतीय संघाची घोषणाही झाली आहे. दरम्यान, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) सोमवारी (दि. 1) बक्षिसाची रक्कम जाहीर केली आहे.
विजेत्या संघावर यंदा पैशांचा पाऊस पडणार आहे. ICC ने वर्ल्ड कप जिंकणाऱ्या संघासाठी 4.48 दशलक्ष डॉलर्स (सुमारे 39.4 कोटी रुपये) इतकी मोठी रक्कम जाहीर केली आहे. ही रक्कम 2022 मध्ये खेळल्या गेलेल्या वर्ल्ड कपच्या तुलनेत तब्बल चारपट जास्त आहे. त्यावेळी ऑस्ट्रेलियाने विजेतेपद पटकावले होते.
महिला क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच, महिला वर्ल्ड कप स्पर्धेच्या एकूण बक्षिसाची रक्कम पुरुषांच्या वर्ल्ड कप स्पर्धेपेक्षा जास्त आहे. तसेच मागील महिला वर्ल्ड कपच्या तुलनेत, यंदा बक्षिसाच्या रकमेत तब्बल 297 टक्के वाढ झाली आहे, जी क्रिकेट जगतासाठी एक ऐतिहासिक क्षण आहे.
या वर्षीच्या महिला वर्ल्ड कपसाठी सुमारे 115 कोटी रुपये इतकी बक्षिसाची रक्कम निश्चित करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, ही रक्कम 2023च्या पुरुष वर्ल्ड कपच्या बक्षिसापेक्षा जास्त आहे.
या वर्ल्ड कपमध्ये उपविजेत्या संघाला 19.71 कोटी रुपये मिळतील. तर उपांत्य फेरीत पराभूत होणा-या दोन्ही संघांना प्रत्येकी 9.8 कोटी रुपये मिळतील. साखळी फेरीत प्रत्येक सामना जिंकणाऱ्या संघाला 30.19 लाख रुपये दिले जातील. तसेच, पाचव्या आणि सहाव्या स्थानावरील संघांना प्रत्येकी 6.16 कोटी तर सातव्या आणि आठव्या स्थानावरील संघांना प्रत्येकी 2.46 कोटी रुपये मिळतील. या स्पर्धेत भाग घेणाऱ्या प्रत्येक संघाला 2.20 कोटी रुपये मिळणार आहेत.
विजेता संघा : 4.48 दशलक्ष डॉलर्स : 39.4 कोटी रुपये
उपविजेता संघ : 2.24 दशलक्ष डॉलर्स : 19.71 कोटी रुपये
उपांत्य फेरीत पराभूत झालेले संघ : 1.12 दशलक्ष डॉलर्स : 9.8 कोटी रुपये
साखळी फेरीत प्रत्येक सामना जिंकलेल्या संघांना : 34,314 डॉलर्स : 30.19 लाख रुपये
पाचव्या आणि सहाव्या क्रमांकाचे संघ : 700,000 डॉलर्स : 6.16 कोटी रुपये
सातव्या आणि आठव्या क्रमांकाचे संघ : 280,000 डॉलर्स : 2.46 कोटी रुपये
सहभागी प्रत्येक संघ : 250,000 डॉलर्स : 2.20 कोटी रुपये
महिला क्रिकेट वर्ल्ड कपसाठी बक्षिसाची रक्कम जाहीर करताना, आयसीसीचे अध्यक्ष जय शाह यांनी एक महत्त्वपूर्ण विधान केले. ते म्हणाले, ‘बक्षिसाच्या रकमेत केलेली ही चारपट वाढ महिला क्रिकेटसाठी एक ऐतिहासिक क्षण आहे. महिला क्रिकेटचा विकास व्हावा, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत हे यातून दिसून येते. आमचा संदेश अगदी स्पष्ट आहे, जर महिलांनी क्रिकेटला व्यावसायिक कारकिर्दी म्हणून निवडले, तर त्यांच्यासोबत पुरुषांप्रमाणेच समान वागणूक दिली जाईल. कोणताही भेदभाव होणार नाही.’