

ICC women's ODI rankings Smriti Mandhana reclaims number 1 batting spot
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC)ने महिलांच्या ताज्या एकदिवसीय क्रमवारीत भारताची स्टार सलामीवीर स्मृती मानधना हिने एका स्थानाचा फायदा घेत पुन्हा एकदा अव्वल स्थान पटकावले आहे. विश्वचषक सुरू होण्याच्या अवघ्या दोन आठवड्यांआधी स्मृतीने इंग्लंडची कर्णधार नॅट सिवर-ब्रंटला मागे टाकत नंबर-१ एकदिवसीय फलंदाज होण्याचा मान मिळवला आहे.
चंदीगढ येथे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात मानधनाने ५८ धावांची दमदार खेळी केली. या खेळीमुळे तिच्या क्रमवारीत सुधारणा झाली आणि तिच्या खात्यात ७ रेटिंगची भर पडली. यासह तिने इंग्लंडच्या कर्णधाराला मागे टाकले. स्मृतीचे रेटिंग ७३५ झाले आहे. मानधनाने याआधी जून-जुलै २०२५ मध्येही पहिले स्थान पटकावले होते. याशिवाय २०१९ मध्येही ती महिला एकदिवसीय क्रिकेटमध्ये अव्वल स्थानावर होती.
मानधनाशिवाय भारताची प्रतिका रावल ४२व्या (४ स्थानांचा फायदा), तर हरलीन देओल ४३व्या (५ स्थानांचा फायदा) क्रमांकावर पोहोचली आहे. अव्वल-१० एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत मानधना ही एकमेव भारतीय खेळाडू आहे. एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना आठ गडी राखून जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंच्या क्रमवारीतही सुधारणा झाली आहे. बेथ मूनीला ३ स्थानांचा फायदा झाला आहे. ती पाचव्या क्रमांकावर पोहोचली आहे. अॅनाबेल सदरलँड आणि फोबी लिचफिल्ड यांनी अर्धशतके झळकावून एकत्रितपणे २५वे स्थान मिळवले आहे.
एकदिवसीय गोलंदाजांच्या क्रमवारीतही ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना फायदा झाला आहे. वेगवान गोलंदाज किम गार्थ एक चौथ्या, तर फिरकीपटू अलाना किंग पाचव्या स्थानावर पोहोचली आहे. भारताची ऑफ स्पिनर स्नेह राणा हिनेही ५ स्थानांची झेप घेऊन १३वे स्थान मिळवले आहे. इंग्लंडची सोफी एक्लेस्टोन अद्यापही नंबर-१ गोलंदाज आहे. अष्टपैलूंच्या क्रमवारीत ऑस्ट्रेलियाची अॅश गार्डनर अव्वल स्थानी कायम आहे. अॅनाबेल सदरलँड ६व्या आणि अॅलिस पेरी १३व्या स्थानावर पोहोचली आहे.