ICC Test Rankings : ‘कसोटी’च्या सिंहासनावर पुन्हा रूटचा राज्याभिषेक! जैस्वाल-गिल-पंत यांची धक्कादायक घसरण
भारत विरुद्ध इंग्लंड तिसरा कसोटी सामना संपल्यानंतर आयसीसीने नवी क्रमवारी जाहीर केली आहे. याही वेळी क्रमवारीत मोठे फेरबदल दिसून येत आहेत. गेल्या आठवड्यातच कसोटी क्रिकेटला नवा अव्वल क्रमांकाचा फलंदाज मिळाला होता, ज्यात आता पुन्हा बदलला आहे. विशेष म्हणजे, संपूर्ण अव्वल 10 फलंदाजांच्या क्रमवारीत बदल झाले आहेत. दरम्यान, न्यूझीलंडचा माजी कर्णधार केन विल्यमसनला एकही सामना न खेळता एका स्थानाचा फायदा झाला आहे.
रूट पुन्हा कसोटीतील अव्वल फलंदाज
आयसीसीने जाहीर केलेल्या नव्या क्रमवारीनुसार, इंग्लंडचा जो रूट पुन्हा एकदा कसोटीतील अव्वल क्रमांकाचा फलंदाज ठरला आहे. गेल्या आठवड्यातच रूटने हे स्थान गमावले होते, परंतु लॉर्ड्स कसोटीत शतक झळकावून तो पुन्हा पहिल्या स्थानी विराजमान झाला आहे. रूटचे रेटिंग वाढून ते आता 888 पर्यंत पोहचले आहे. दुसरीकडे, केन विल्यमसन सध्या कसोटी क्रिकेटपासून दूर असूनही त्याला एका स्थानाचा फायदा झाला आहे. त्याचे रेटिंग 867 असून तो तिसऱ्या स्थानावरून दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे.
आठव्यांदा अव्वल स्थान पटकावले
रूटने कसोटी क्रिकेटमध्ये आठव्यांदा अव्वल स्थान पटकावले आहे. वयाच्या 34 व्या वर्षी त्याने हा पराक्रम केला आहे. यासह तो अव्वल स्थानी पोहोचणारा दुसरा सर्वात वयस्कर फलंदाज ठरला आहे. यापूर्वी श्रीलंकेच्या कुमार संगकाराने डिसेंबर 2014 मध्ये वयाच्या 37व्या वर्षी कसोटी क्रमवारी पहिले स्थान पटकावले होते.
ब्रूकची थेट तिसऱ्या स्थानी घसरण
मागील आठवड्यातच कसोटीतील अव्वल स्थानी पोहोचलेल्या हॅरी ब्रूकची अव्वल स्थानावरून घसरण झाली आहे. तो थेट तिसऱ्या स्थानी गेला आहे. यावेळी त्याला दोन स्थानांचे नुकसान झाले आहे. त्याचे रेटिंग 862 आहे. ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथलाही एका स्थानाचा फायदा झाला असून, तो 816 रेटिंगसह चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे.
यशस्वी जैस्वालचे नुकसान
दरम्यान, भारताच्या यशस्वी जैस्वालला एका स्थानाचे नुकसान झाले असून, तो पाचव्या क्रमांकावर आला आहे. त्याचे रेटिंग 801 आहे. दक्षिण आफ्रिकेचा टेंबा बावुमा एकही सामना न खेळता एका स्थानाने पुढे सरकला आहे. त्याचे रेटिंग 790 असून तो सहाव्या क्रमांकावर आहे.
पंत आणि गिल यांनाही फटका
श्रीलंकेच्या कामिंदू मेंडिसने दोन स्थानांची झेप घेतली आहे. तो आता 781 मानांकनासह सातव्या स्थानी पोहोचला आहे. भारताचा यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंतला एका स्थानाचे नुकसान सोसावे लागले असून, तो 779 मानांकनासह आठव्या क्रमांकावर गेला आहे. शुभमन गिलला तर एकाच वेळी तीन स्थानांचा तोटा झाला आहे. तो आता 765 मानांकनासह थेट नवव्या क्रमांकावर घसरला आहे. मात्र, इंग्लंडचा जेमी स्मिथ 7752 मानांकनासह दहाव्या क्रमांकावर कायम आहे.

