ICC T20 rankings : भारत अव्वल स्थानी कायम, इंग्लंड दुसऱ्या तर ऑस्ट्रेलिया तिसऱ्या क्रमांकावर

ताज्या मानांकन यादीचीघोषणा, अव्वल 7 संघांमध्ये फेरबदल नाही
ICC T20 rankings : भारत अव्वल स्थानी कायम, इंग्लंड दुसऱ्या तर ऑस्ट्रेलिया तिसऱ्या क्रमांकावर
Published on
Updated on

दुबई : आयसीसीने जाहीर केलेल्या ताज्या मानांकन यादीत जगज्जेत्या भारतीय क्रिकेट संघाने आपले अव्वल स्थान यशस्वीरीत्या कायम राखले आहे. या क्रमवारीत इंग्लंड दुसऱ्या, तर ऑस्ट्रेलिया तिसऱ्या क्रमांकावर आहे. यापूर्वी, मार्च महिन्यात टी-20 विश्वचषकात टीम इंडियाने नवा इतिहास रचला होता. त्याचे प्रतिबिंब या मानांकनात उमटले.

क्रमवारीचे गणित

आयसीसीने स्पष्ट केल्यानुसार, या ताज्या क्रमवारीत मे 2025 पासून खेळल्या गेलेल्या सर्व सामन्यांना 100 टक्के महत्त्व, तर मागील दोन वर्षांतील सामन्यांना 50 टक्के महत्त्व देण्यात आले आहे. भारताचे सध्या 275 रेटिंग पॉईंटस्‌‍ असून, दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या इंग्लंडपेक्षा (262 पॉईंटस्‌‍) भारतीय संघ 13 पॉईंटस्‌‍ने आघाडीवर आहे. ऑस्ट्रेलिया 258 पॉईंटस्‌‍सह तिसऱ्या स्थानी असून इंग्लंडच्या अगदी जवळ पोहोचली आहे.

उत्तर अमेरिकेतील क्रिकेटची नवी ताकद म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमेरिकेने 6 गुणांची कमाई करत थेट 13 व्या स्थानावर झेप घेतली आहे. त्यांनी नेदरलँड (14 वे) आणि स्कॉटलंड (15 वे) या संघांना मागे टाकले आहे. नामिबिया 16 व्या स्थानी स्थिर असून, नेपाळ (17 वे) आणि ओमानने (19 वे) प्रत्येकी एका स्थानाची प्रगती केली आहे.

आयसीसी टी-20 क्रमवारी

भारत : 275 गुण

इंग्लंड : 262 गुण

ऑस्ट्रेलिया : 258 गुण

न्यूझीलंड : 247 गुण

द. आफ्रिका : 244 गुण

पाकिस्तान : 240 गुण

वेस्ट इंडिज : 233 गुण

बांगला देश : 225 गुण

श्रीलंका : 221 गुण

अफगाण : 220 गुण

काही संघ रँकिंगबाहेर

आयसीसीने दिलेल्या माहितीनुसार, क्रमवारीत सहभागी असलेल्या संघांची संख्या आता 102 वरून 98 वर आली आहे. मागील तीन वर्षांत किमान 8 टी-20 सामने खेळण्याच्या अटीची पूर्तता करू न शकलेल्या फिजी, गॅम्बिया, ग्रीस आणि इस्रायल या संघांना रँकिंगमधून वगळण्यात आले आहे.

श्रीलंकेची घसरण; बांगला देशची भरारी

आशियाई देशांच्या कामगिरीत मात्र उलथापालथ पाहायला मिळाली आहे. श्रीलंका संघाला 6 रेटिंग पॉईंटस्‌‍चे नुकसान सोसावे लागल्याने त्यांची 9 व्या क्रमांकावर घसरण झाली आहे. याचा फायदा बांगलादेशला मिळाला असून त्यांनी एका स्थानाची झेप घेत 8 वे स्थान पटकावले आहे. अफगाणिस्तान 220 गुणांसह 10 व्या स्थानावर असून श्रीलंकेच्या अगदी जवळ आहे. झिम्बाब्वे 11 व्या आणि आयर्लंड 12 व्या क्रमांकावर आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news