

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय (ODI) मालिकेदरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) नुकतीच ताज्या ODI क्रमवारीची घोषणा केली. या नवीन क्रमवारीनुसार, भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली याला जबरदस्त फायदा झाला असून, त्याने पुन्हा एकदा अव्वल स्थानाच्या दिशेने वेगाने वाटचाल सुरू केली आहे.
रांची येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या पहिल्या ODI सामन्यात विराट कोहलीने १२० चेंडूत १३५ धावांची दमदार शतकी खेळी केली होती. या विस्फोटक खेळीच्या बळावर कोहलीने आयसीसी वनडे वनडे फलंदाजांच्या क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे.
ताज्या क्रमवारीनुसार, कोहलीने आता चौथे स्थान पटकावले आहे. त्याचे रेटिंग गुण वाढून ७५१ झाले आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, तो आता अव्वल स्थानी असलेल्या रोहित शर्मा याच्यापासून केवळ ३२ गुणांनी मागे आहे.
यामुळे विराट कोहली पुन्हा एकदा जगातील नंबर १ वनडे फलंदाज बनण्याची शक्यता प्रबळ झाली आहे. रोहित आणि विराटच्या मध्ये न्यूझीलंडचा डॅरिल मिचेल (दुसरा) आणि अफगाणिस्तानचा इब्राहिम जादरान (तिसरा) हे दोनच खेळाडू आहेत.
मागील दशकाच्या अखेरीस कोहलीने सलग तीन वर्षांहून अधिक काळ नंबर १ चा ताज आपल्याकडे ठेवला होता. एप्रिल २०२१ मध्ये पाकिस्तानच्या बाबर आझमने त्याला मागे टाकले होते.
टॉप-१० वनडे फलंदाजांमध्ये रोहित आणि विराट यांच्या व्यतिरिक्त भारताचा युवा फलंदाज शुभमन गिल देखील आहे. मात्र, या ताज्या क्रमवारीत गिलला एका स्थानाचे नुकसान झाले आहे आणि तो आता पाचव्या स्थानावर घसरला आहे. सहाव्या क्रमांकापासून दहाव्या क्रमांकापर्यंत इतर कोणत्याही फलंदाजाच्या क्रमवारीत बदल झालेला नाही.
फलंदाजांसोबतच गोलंदाजांच्या क्रमवारीतही भारतीय खेळाडूला फायदा झाला आहे. 'चायनामॅन' गोलंदाज कुलदीप यादव याने ODI गोलंदाजांच्या क्रमवारीत एक स्थानाची झेप घेत सहावा क्रमांक गाठला आहे. त्याची सातत्यपूर्ण आणि प्रभावी गोलंदाजी भारतीय संघाला बळ देत आहे.
यामुळे न्यूझीलंडचा मिचेल सँटनर एका स्थानाने खाली येत आता सातव्या क्रमांकावर गेला आहे. अफगाणिस्तानचा राशिद खान हा नंबर १ ODI गोलंदाज म्हणून कायम आहे. दुसऱ्या स्थानावर जोफ्रा आर्चर तर तिसऱ्या स्थानावर केशव महाराज आहे. या ताज्या ICC क्रमवारीतील बदलांमुळे आगामी काळात ODI क्रिकेटमध्ये नंबर १ च्या स्थानासाठी भारतीय खेळाडूंमध्येच चुरस पाहायला मिळेल.