

विशाखापट्टणम : भारतीय फलंदाज सध्या तुफान फॉर्ममध्ये असले, तरी यष्टिरक्षक फलंदाज संजू सॅमसनने निराशा केली आहे. त्याचा खराब फॉर्म संघ व्यवस्थापनासाठी चिंतेचा विषय ठरत आहे. दरम्यान, न्यूझीलंड विरुद्धचा मालिकेतील चौथा टी-२० सामना बुधवारी (दि. २७) खेळवला जाणार असून, या सामन्यात सॅमसनवर विश्वास कायम ठेवला जातो की श्रेयस अय्यरला प्लेइंग-११ मध्ये स्थान मिळते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
भारतीय संघाने पाच सामन्यांच्या मालिकेत ३-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. टी-२० विश्वचषकापूर्वी तालीम करण्यासाठी आता टीम इंडियासाठी केवळ दोनच सामने उरले आहेत. सॅमसनने सुरुवातीच्या तीन सामन्यांत घोर निराशा केली आहे. अशातच त्याला आता विश्वचषक स्पर्धेतील प्लेईंग 11 साठी आपला दावा भक्कम करायचा असेल तर त्याला उर्वरीत सामन्यांत मोठी खेळी करणे अनिवार्य आहे.
पोटाच्या शस्त्रक्रियेनंतर तिलक वर्मा अद्याप पूर्णपणे तंदुरुस्त नसल्याने तो उर्वरित दोन सामन्यांतूनही बाहेर झाला आहे. त्याच्या जागी संघात समावेश असलेल्या श्रेयस अय्यरला अद्याप अंतिम अकरामध्ये संधी मिळालेली नाही. सध्या सॅमसन आणि अभिषेक शर्मा डावाची सुरुवात करत असून, ईशान किशन तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येत आहे.
ईशानने दमदार कामगिरी करत आपले स्थान जवळपास निश्चित केले आहे. अशा परिस्थितीत सॅमसनला पुन्हा अपयश आल्यास, विश्वचषकात ईशानला सलामीला पाठवून तिलक वर्माला तिसऱ्या क्रमांकावर खेळवण्याचा विचार संघ व्यवस्थापन करू शकते.
या मालिकेत भारतीय फलंदाजांनी आक्रमकतेची नवी व्याख्या मांडली आहे. तिसऱ्या सामन्यात भारताने अवघ्या १० षटकांत विजय मिळवला. अभिषेक शर्माने ३०० हून अधिक स्ट्राइक रेटने धावा कुटल्या आहेत, तर सूर्यकुमार यादव आणि ईशान किशन २३० च्या स्ट्राइक रेटने खेळत आहेत. भारताने गेल्या दोन सामन्यांत ३६३ धावांचा पाठलाग करण्यासाठी केवळ २५.२ षटके घेतली, यावरूनच भारताच्या फलंदाजीची धार स्पष्ट होते. विशाखापट्टणमची खेळपट्टी आणि दवाचा परिणाम पाहता येथेही धावांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
फलंदाजी भक्कम असली तरी फिरकीपटूंची कामगिरी भारतासाठी डोकेदुखी ठरत आहे. कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती यांना अद्याप अपेक्षित प्रभाव पाडता आलेला नाही. कुलदीपने दोन सामन्यांत प्रति षटक ९.५ च्या सरासरीने धावा दिल्या आहेत. दुसरीकडे, जसप्रीत बुमराह, रवी बिश्नोई आणि हार्दिक पंड्या यांच्या अचूक माऱ्यामुळे तिसऱ्या सामन्यात न्यूझीलंडला १५३ धावांवर रोखणे शक्य झाले. चौथ्या सामन्यात कुलदीपला विश्रांती देऊन वरुण चक्रवर्तीला परत बोलावले जाऊ शकते, तसेच रवी बिश्नोईला संघात कायम ठेवण्यावर भर दिला जाईल. अक्षर पटेलच्या तंदुरुस्तीवरही संघ लक्ष ठेवून आहे.
भारत : संजू सॅमसन (यष्टिरक्षक), अभिषेक शर्मा, ईशान किशन, सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पंड्या, शिवम दुबे, रिंकू सिंह, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंह/हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती/रवि बिश्नोई.
न्यूझीलंड : डेव्हॉन कॉनवे, टिम सीफर्ट (यष्टिरक्षक), रचिन रवींद्र, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, डॅरेल मिचेल, मिचेल सँटनर (कर्णधार), झॅकरी फोल्क्स, मॅट हेन्री, ईश सोढी, जेकब डफी.