ICC Rankings : शुभमन गिलचा दबदबा.. अव्वलस्थानी कायम, विराट-रोहित यांच्यात कडवी लढत

जागतिक क्रिकेटमध्ये भारताचे वर्चस्व: पहिल्या पाचात तीन भारतीय
ICC Rankings : शुभमन गिलचा दबदबा.. अव्वलस्थानी कायम, विराट-रोहित यांच्यात कडवी लढत
Published on: 
Updated on: 

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) नुकत्याच जाहीर केलेल्या ताज्या एकदिवसीय क्रमवारीत भारताचा सलामीवीर आणि कर्णधार शुभमन गिल याने फलंदाजांच्या यादीतील आपले अव्वल स्थान यशस्वीरीत्या राखले आहे. न्यूझीलंडचा डॅरिल मिचेल त्याचा पाठलाग करत असला तरी गिलने आपले अग्रस्थान भक्कम ठेवले आहे.

दुसरीकडे, भारताचे दोन अनुभवी फलंदाज विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यात क्रमवारीत जोरदार चुरस पाहायला मिळत असून दोघांमधील गुणांमधील अंतर कमालीचे घटले आहे. विशेष म्हणजे, आयसीसीच्या ताज्या क्रमवारीतील पहिल्या पाच फलंदाजांमध्ये भारताच्या तीन खेळाडूंनी आपले स्थान कायम राखत भारतीय फलंदाजीचे वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील एकदिवसीय मालिका सुरू असतानाच आयसीसीने ही ताजी क्रमवारी जाहीर केली आहे. भारतीय संघाचा कर्णधार शुभमन गिल सध्या ८२२ रेटिंग गुणांसह अग्रस्थानी विराजमान आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात तो शून्य धावांवर बाद झाल्यामुळे त्याच्या मानांकनात किंचित घसरण झाली असून त्याचे रेटिंग ८४१ वरून ८२२ वर आले आहे. तरीही त्याच्या अव्वल स्थानाला कोणताही धोका निर्माण झालेला नाही. न्यूझीलंडचा फलंदाज डॅरिल मिचेल ७९४ रेटिंग गुणांसह या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे.

दरम्यान, माजी कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यातील गुणांची स्पर्धा अत्यंत रोमांचक वळणावर पोहोचली आहे. सध्याच्या क्रमवारीत विराट कोहली ७८१ रेटिंग गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर असून रोहित शर्मा ७५४ गुणांसह चौथ्या स्थानावर पाठोपाठ आहे. उभय खेळाडूंमधील गुणांचे अंतर अत्यंत कमी असल्याने पुढील काही सामन्यांमध्ये मोठे फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

न्यूझीलंडविरुद्धच्या उर्वरित दोन एकदिवसीय सामन्यांत शुभमन गिल आगामी कसोटी मालिकेच्या पूर्वतयारीसाठी खेळणार नसल्याने, रोहित आणि विराट या दोन्ही फलंदाजांना मोठी खेळी साकारून डॅरिल मिचेलला मागे टाकण्याची नामी संधी उपलब्ध झाली आहे. जरी मिचेल उर्वरित मालिका खेळणार असला, तरी सध्याच्या घडीला शुभमन गिलचे अव्वल स्थान कोणी हिरावून घेईल अशी शक्यता धूसर आहे.

या ताज्या क्रमवारीत मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यरला एका स्थानाचा फटका बसला आहे. ६०८ रेटिंग गुणांसह त्याची १८ व्या क्रमांकावर घसरण झाली आहे. शुभमन गिलच्या अनुपस्थितीत मालिकेतील उर्वरित दोन सामन्यांमध्ये श्रेयस अय्यरच भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. कर्णधारपदाच्या जबाबदारीसह त्याला वरच्या क्रमांकावर फलंदाजी करून मोठी धावसंख्या उभारण्याची संधी मिळणार आहे. उभय संघांमधील सुरू असलेल्या या मालिकेत तीनपैकी दोन सामने जिंकून भारतीय संघाने आधीच विजयी आघाडी घेतली असून एक सामना पावसामुळे रद्द झाला होता. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील मालिकेतील चौथा एकदिवसीय सामना येत्या शुक्रवारी रंगणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.