ICC Rankings : शुभमन गिल बनला जगातील नंबर-1 फलंदाज! टॉप-5 मध्ये विराट-रोहितचाही दबदबा

ICC ODI Rankings : अभिषेक शर्माला फटका, श्रेयस अय्यरने केली सात स्थानांची सुधारणा
ICC Rankings : शुभमन गिल बनला जगातील नंबर-1 फलंदाज! टॉप-5 मध्ये विराट-रोहितचाही दबदबा
Published on
Updated on

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) बुधवारी (दि. २९) जाहीर केलेल्या ताज्या जागतिक क्रमवारीत भारतीय फलंदाजांचे वर्चस्व पाहायला मिळत आहे. भारताचा एकदिवसीय संघाचा कर्णधार शुभमन गिलने फलंदाजांच्या क्रमवारीत एका स्थानाची झेप घेत पुन्हा एकदा जगातील पहिल्या क्रमांकाचा फलंदाज होण्याचा मान मिळवला आहे. गिलने ८०१ गुणांसह न्यूझीलंडच्या डॅरिल मिचेलला (७९४ गुण) दुसऱ्या स्थानावर ढकलत हे अव्वल स्थान काबीज केले. डॅरिल मिचेल चालू वर्षातील जानेवारी महिन्यापासून या स्थानावर विराजमान होता.

टॉप-५ मध्ये तीन भारतीय फलंदाज

आयसीसीच्या एकदिवसीय फलंदाजांच्या ताज्या क्रमवारीत भारताचे वर्चस्व स्पष्टपणे दिसून येत आहे. अव्वल पाच फलंदाजांमध्ये भारताचे तीन खेळाडू समाविष्ट आहेत. शुभमन गिल पहिल्या स्थानावर विराजमान झाला असतानाच, अनुभवी फलंदाज विराट कोहली ७६७ गुणांसह तिसऱ्या आणि रोहित शर्मा ७५८ गुणांसह चौथ्या स्थानावर कायम आहेत. तर अफगाणिस्तानचा इब्राहीम झाद्रान ७१२ गुणांसह पाचव्या क्रमांकावर आहे.

गिलची जबरदस्त कामगिरी

शुभमन गिलने अलीकडच्या काळात चमकदार कामगिरी केली आहे. जून महिन्यात अफगाणिस्तानविरुद्ध झालेल्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत त्याने दोन डावांमध्ये २३८ च्या सरासरीने २३८ धावा कुटल्या होत्या, ज्यामध्ये पहिल्या सामन्यातील नाबाद ८४ आणि दुसऱ्या सामन्यातील १५४ धावांच्या खेळीचा समावेश होता. तो या मालिकेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. त्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतही त्याने तीन डावांमध्ये ९४ च्या सरासरीने १८८ धावा (८०*, ३१, ७७) करत उत्कृष्ट सातत्य दाखवले.

गिलच्या एकदिवसीय कारकिर्दीवर नजर टाकल्यास, त्याने आतापर्यंत ६७ सामन्यांच्या ६६ डावांत ६०.३३ च्या दमदार सरासरीने ३,३७९ धावा केल्या आहेत. यात ९ शतके आणि २० अर्धशतकांचा समावेश असून २०८ ही त्याची सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे.

टी-२० फलंदाजांच्या क्रमवारीत १५ वर्षीय युवा सलामीवीर वैभव सूर्यवंशीने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. झिम्बाब्वे दौऱ्यातील तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत ५०.३३ च्या सरासरीने सर्वाधिक १५१ धावा करणाऱ्या सूर्यवंशीने २३० स्थानांची मोठी झेप घेत ४८ व्या क्रमांकावर स्थान मिळवले आहे. सध्या त्याच्या खात्यात ५३६ रेटींग जमा झाले आहे. मालिकेतील तिसऱ्या सामन्यात ८१ धावांची मॅचविनिंग खेळी करणाऱ्या सूर्यवंशीला 'प्लेयर ऑफ द मॅच' आणि 'प्लेयर ऑफ द सिरीज' या दोन्ही पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. हे दोन्ही वैयक्तिक पुरस्कार पटकावणारा तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे.

इशान किशन अव्वल स्थानी; अभिषेक शर्माला फटका

टी-२० फलंदाजांच्या क्रमवारीत भारताचा इशान किशन ९१० रेटींगसह पहिल्या स्थानावर कायम आहे. ही त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम रेटिंग आहे. झिम्बाब्वेविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात ८१ धावा ठोकत त्याने ९१६ रेटींगपर्यंतचा टप्पा गाठला होता. आंतरराष्ट्रीय टी-२० च्या इतिहासातील सर्वोत्तम रेटिंग मिळवणाऱ्या फलंदाजांमध्ये सूर्यकुमार यादव (९१२ रेटींग), डेव्हिड मलान (९१९) आणि अभिषेक शर्मा (९३१) यांच्यानंतर इशान चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. इशानने या मालिकेत एकूण १४५ धावा केल्या.

दुसरीकडे, संपूर्ण मालिकेत अपयशी ठरलेल्या अभिषेक शर्माला रेटिंगचा मोठा फटका बसला आहे. तीन सामन्यांत अवघ्या ११ धावा करू शकल्याने तो एका स्थानाने घसरून तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला आहे, तर पाकिस्तानचा साहिबजादा फरहान (८४८) दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.

इतर खेळाडूंची क्रमवारीतील प्रगती

झिम्बाब्वेविरुद्ध भारताने ३-० असा मालिकाविजय मिळवला. या मालिकेतील कामगिरीच्या जोरावर टी-२० फलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय उपकर्णधार तिलक वर्मा दोन स्थानांनी वर जात सहाव्या, तर कर्णधार श्रेयस अय्यर सात स्थानांच्या सुधारणेसह २४ व्या क्रमांकावर पोहोचला आहे. गोलंदाजांच्या क्रमवारीत भारताच्या रवी बिश्नोईने ३१ स्थानांची मोठी झेप घेत ४१ वे स्थान पटकावले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news