

Suryakumar Yadav IND vs PAK :
भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवची हस्तांदोलन नकार प्रकरणी आयसीसीकडून सुनावणी झाली. यावेळी आयीसीसनं सूर्यकुमार यादवला राजकीय वक्तव्य करणं टाळा असं सांगितलं आहे. ही सुनावणी पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं केलेल्या तक्रारीनंतर घेण्यात आली होती.
पाकिस्तानचे खेळाडू साहिबजादा फरहान आणि हारिस रौफ यांच्याविरूद्धची सुनावणी आज होणार आहे. या दोघांविरूद्ध बीसीसीआयनं तक्रार केली होती. ते काल आशिया कपमधील श्रीलंकेविरूद्धचा सामना खेळत असल्यानं त्यांच्याबाबत आज सुनावणी होणार आहे.
पाकिस्ताननं भारताविरूद्धच्या १४ सप्टेंबर सामन्यानंतर आयसीसीकडं तक्रार नोंदवली होती. भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव आणि भारीतय संघानं पाकिस्तान संघातील खेळाडूंसोबत हस्तांदोलन करणं टाळलं होतं. यामुळं पाकिस्तानची नाचक्की झाली होती. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ भारतीय संघानं ही कृती केली होती.
दरम्यान, पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, 'सूर्यकुमार यादवनं आयसीसीच्या सुनावणीला हजेरी लावली होती. त्याच्या सोबतीला बीसीसीआयचे सीओओ आणि क्रिकेट ऑपरेशन्स मॅनेजर देखील होते. त्यावेळी सामनाधिकारी रिचर्ड्सन यांनी सूर्याला राजकीय असं कोणतंही वक्तव्य करू नकोस असं सांगितलं. सूर्यकुमार यादववर सध्या तरी कोणतीही कारवाई झाली नसल्याचं समोर आलेलं नसलं तरी त्याला वॉर्निंग किंवा सामना मानधनातून १५ टक्के दंड कपात अशी शिक्षा होऊ शकते.'
भारतीय क्रिकेट असोसिएशननं देखील पाकिस्तान संघाविरूद्ध तक्रार नोंदवली आहे. भारतानं रौफ आणि फरहान यांच्याविरूद्ध तक्रार केली आहे. या दोघांनीही सामन्यादरम्यान उकसवणारी कृती केली होती. बीसीसीआयने बुधवारी या दोघांविरूद्ध तक्रार केली होती. आयसीसीला याबाबत मेल पाठवण्यात आला होता.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नक्वी यांनी देखील एक क्रिप्टिक ट्विट केलं होतं. मोहसीन नक्वी हे एशियन क्रिकेट काऊन्सीलचे चेअरमन देखील आहेत. त्यांनी ख्रिस्तियानो रोनाल्डोचा एक व्हिडिओ शेअर केला होता. त्यात हा फुटबॉलपटू देखील विमान कोसळ्याचे हावभाव करत होता. अशाच प्रकारचे हावभाव रौफनं गेल्या रविवारी मैदानावर सामना सुरू असताना केले होते.
नक्वी हे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे चेअरमन तसंच देशाचे मंत्री देखील आहेत. रोनाल्डोने त्याची फ्री कीक कशी डीप झाली हे दाखवलं होतं.
विशेष म्हणजे पाकिस्तान आणि भारत हे दोन्ही देश आता आशिया कपच्या फायनलमध्ये पोहचले आहेत. हा सामना येत्या रविवारी होणार आहे. त्यामुळं या सामन्यात अजून काय ड्रामा होतो याकडं सर्वांच लक्ष आहे.