

दुबई; वृत्तसंस्था : आतापर्यंत रोलर कोस्टर प्रवास अनुभवणार्या पाकिस्तानने गुरुवारी येथे रंगलेल्या व्हर्च्युअल सेमीफायनलमध्ये बांगला देशचा एकतर्फी धुव्वा उडवला आणि आशिया चषकाच्या अंतिम फेरीत जोरदार धडक मारली. या निकालासह आशिया जेतेपदासाठी भारत व पाकिस्तान हे कट्टर प्रतिस्पर्धी पुन्हा एकदा आमने-सामने भिडणार, हे देखील सुस्पष्ट झाले. रविवार, दि. 28 रोजी ही ब्लॉकबस्टर फायनल रंगेल. आश्चर्य म्हणजे या 15 दिवसांत भारत-पाकिस्तान हे कट्टर प्रतिस्पर्ध्यांनी आमने-सामने भिडण्याची ही चक्क तिसरी वेळ असेल.
गुरुवारी येथील दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर रंगलेल्या व्हर्च्युअल सेमीफायनलमध्ये पाकिस्तानला निर्धारित 20 षटकांत 8 बाद 135 अशा किरकोळ धावसंख्येवर समाधान मानावे लागले. मात्र, प्रत्युत्तरात बांगला देशसाठी हे आव्हानही न पेलवणारे ठरले. त्यांना निर्धारित 20 षटकांत 9 बाद 124 धावांवर समाधान मानावे लागले.
विजयासाठी 136 धावांचा पाठलाग करताना बांगला देश संघाला एकदाही विजयाच्या अगदी आसपासही फिरकता आले नाही. सातत्याने गडी बाद होत राहिल्याचा त्यांना फटका बसल्याचे या निकालावरून अधोरेखित झाले. शमिम होसेनने 25 चेंडूंत सर्वाधिक 30 धावा जमवल्या. सैफ हसनने 18 व नरुल हसनने 16 धावा केल्या. शाहिन शाह आफ्रिदी व रौफ बांगला देशच्या डावाचे कर्दनकाळ ठरला. शाहिननेे 17 धावांत 3, तर रौफने 33 धावांत 3 बळी घेतले.
तत्पूर्वी, तस्किन अहमदच्या भेदक मार्याच्या बळावर बांगला देशने पाकिस्तानला 8 बाद 135 धावांवर रोखून धरण्याचा पराक्रम गाजवला. व्हर्च्युअल सेमीफायनल ठरलेल्या या लढतीत तस्किनने अवघ्या 28 धावांत 3 बळी घेत पाकिस्तानच्या डावाला खिंडार पाडले.
त्याला मेहदी हसन आणि रिशाद हुसेन या दोन फिरकीपटूंनी प्रत्येकी दोन बळी घेऊन समयोचित साथ दिली, तर मुस्तफिजूर रहमानने 33 धावांत 1 बळी मिळवला. पाकिस्तानकडून मोहम्मद हॅरिसने सर्वाधिक 31 धावा केल्या, तर मोहम्मद नवाजने 25 धावा जोडल्या. पाकिस्तानी फलंदाजांनी उत्तम सुरुवात केली असली, तरी बांगला देशी गोलंदाजांच्या काटेकोर गोलंदाजीमुळे त्यांना कोणतीही मोठी भागीदारी करता आली नाही.
एरवी, भारत-पाकिस्तान यांच्यात द्विपक्षीय मालिका ठप्पच झाल्या आहेत. यामुळे, दोन्ही संघ केवळ ‘आयसीसी’ स्पर्धांमध्येच आमने-सामने भिडतात. यंदा आशिया चषकात मात्र हेच दोन्ही प्रतिस्पर्धी रविवारी केवळ 15 दिवसांच्या कालावधीत तिसर्यांदा आमने-सामने भिडतील, हे पाकिस्तानच्या विजयाने स्पष्ट झाले.