

इस्लामाबाद : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (पीसीबी) अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी केलेल्या एका ट्विटर पोस्टमुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. वेगवान गोलंदाज हॅरिस रौफने भारतीय चाहत्यांकडे पाहून केलेल्या प्रक्षोभक हातवार्यानंतर नक्वी यांनी हे ट्विट केले होते. त्यांच्या या ट्विटमध्ये क्रिस्तियानो रोनाल्डोच्या ‘जेट क्रॅश’ हावभावाचा उल्लेख होता.
यामुळे त्यांना भारतीय आणि पाकिस्तानी अशा दोन्ही चाहत्यांच्या टीकेला सामोरे जावे लागले आहे. नक्वी यांच्या या वादग्रस्त ट्विटवर अनेक क्रिकेट चाहत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. एका चाहत्याने लिहिले, मला वाटते हे ट्विट डिलिट करावे. अशा प्रकारची क्षुल्लक राजकारण तुमच्या पदाला शोभत नाही. अन्य एका यूजरने कठोर शब्दांत टीका केली, असेच क्रिकेट संघाचे अपयश लपवत राहा, असे तो म्हणाला. इतके कमी की काय म्हणून तुम्ही रंगमंचावरचे अभिनेते व्हा...आता तेच तुम्हाला शोभेल, असा उपहासात्मक टोला अन्य एका यूजरने मारला.