
Team India ODI and T20 ICC Annual Rankings 2025
दुबई : आयसीसीने वार्षिक संघ क्रमवारी जाहीर केली आहे. टीम इंडियाने एकदिवसीय आणि टी-20 फॉरमॅटमध्ये वर्चस्व कायम ठेवले असून ऑस्ट्रेलिया कसोटी क्रिकेटमध्ये अव्वल स्थानावर आहे. कसोटी फॉरमॅटमध्ये सलग दोन मालिका गमावल्याने टीम इंडियाला मोठा फटका बसला आहे.
आयसीसी कसोटी क्रमवारीत भारतीय संघ टॉप 3 मधून बाहेर पडला आहे. तर, ऑस्ट्रेलियन संघ तिन्ही फॉरमॅटमध्ये टॉप 3 मध्ये कायम आहे, जी कांगारू संघासाठी एक मोठी कामगिरी आहे. इंग्लंडचा संघ कसोटी फॉरमॅटमध्ये ऑस्ट्रेलियाच्या जवळ पोहचला आहे.
ऑस्ट्रेलियाने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये भारताचा 3-1 असा पराभव केला आणि श्रीलंकेतही कसोटी मालिका 2-0 अशी जिंकली. याशिवाय, संघाने सलग दुसऱ्यांदा जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. अशाप्रकारे कांगारू संघ कसोटीत अव्वल स्थानावर कायम आहे.
त्याच वेळी, भारत एकदिवसीय आणि टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आघाडीवर आहे, तर श्रीलंका मोठा विजेता म्हणून उदयास येत आहे. श्रीलंकेच्या वार्षिक आयसीसी क्रमवारीत मोठे बदल झाले आहेत.
नवीनतम क्रमवारीत मे 2024 पासून खेळल्या गेलेल्या सर्व सामन्यांसाठी 100 टक्के रेटिंग आणि गेल्या दोन वर्षातील सामन्यांसाठी 50 टक्के रेटिंग समाविष्ट आहे.
ऑस्ट्रेलिया सध्या आयसीसी कसोटी क्रमवारीत 126 गुणांसह अव्वल स्थानावर आहे. इंग्लंडचे 113 गुण आहेत आणि हा संघ दुसऱ्या स्थानावर आहे. द. आफ्रिका संघ 111 गुणांसह दुसऱ्या स्थानावरून तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे तर भारतीय संघाची 105 गुणांसह चौथ्या स्थानावर घसरण झाली आहे. यानंतर न्यूझीलंड (95 गुण) पाचव्या, श्रीलंका (87) सहाव्या, पाकिस्तान (78) सातव्या, वेस्ट इंडिज (73) आठव्या, बांगलादेश (62) नवव्या आणि आयर्लंड (30) दहाव्या स्थानावर आहे.
आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत, टीम इंडिया 124 गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे, तर न्यूझीलंडचे 109 गुण आहेत आणि ते दुसऱ्या स्थानावर आहेत. ऑस्ट्रेलिया 109 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. चौथ्या क्रमांकावर श्रीलंकेचा संघ आहे. त्यांच्या खात्यात 104 गुण जमा आहेत. पाकिस्तान (104 गुण) पाचव्या, द. आफ्रिका (96) सहाव्या, अफगाणिस्तान (91) सातव्या, इंग्लंड (84) आठव्या, वेस्ट इंडिज (83) नवव्या आणि बांगलादेश (76) दहाव्या स्थानावर आहे.
आयसीसी टी-20 क्रमवारीतही टीम इंडियाचे वर्चस्व आहे. भारतीय संघ (271 गुण) अव्वल तर ऑस्ट्रेलिया (262) दुसऱ्या स्थानावर आहे. इंग्लंडच्या खात्यात 254 गुण आहेत. हा संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे. न्यूझीलंडचे गुण 249 असून ते चौथ्या स्थानावर आहेत. यानंतर वेस्ट इंडिज (246) पाचव्या, द. आफ्रिका (245) सहाव्या, श्रीलंका (235) सातव्या, पाकिस्तान (228) आठव्या, बांगलादेश (225) नवव्या आणि अफगाणिस्तान (223) गुणांसह दहाव्या स्थानावर आहे.