

Irfan Pathan on Shahid Afridi dog meat
नवी दिल्ली : भारताचा माजी क्रिकेटपटू आणि अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. बिनधास्त आणि स्पष्ट वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या इरफानने अलीकडेच त्याचे यूट्यूब चॅनल सुरू केले असून, तिथे तो वेगवेगळ्या आठवणी शेअर करत आहे. अलीकडेच त्याने एक किस्सा सांगितला, जो त्याच्या आणि पाकिस्तानचा माजी अष्टपैलू शाहिद आफ्रिदी याच्याशी संबंधित आहे.
इरफान पठानने सांगितलं की, "2006 मध्ये आम्ही पाकिस्तान दौऱ्यावर होतो. कराचीहून लाहोरला जाताना दोन्ही संघ एकाच फ्लाइटमध्ये प्रवास करत होते.
तेव्हा आफ्रिदीने इरफानच्या डोक्यावर हात ठेवत म्हटलं, "कसा आहेस बच्चा?"
हे ऐकून इरफान आश्चर्यचकित झाला आणि म्हणाला की, "बच्चा कोण आहे? आणि तू कधीपासून बाप झालास? माझं तुझ्याशी काही नातं नाही, मग हा बिनधास्तपणा का?"
इरफानच्या म्हणण्यानुसार, आफ्रिदीने त्यानंतर काही अपशब्द वापरले. त्याच वेळी त्याच्या शेजारी पाकिस्तानी क्रिकेटपटू अब्दुल रझाक बसले होते. इरफानने त्यांना विचारलं की, "इथे काय काय मांस मिळतं?"
रज्जाकने काही पर्याय सांगितले. तेव्हा इरफान म्हणाला की, "कुत्र्याचं मांस मिळतं का? कारण आफ्रिदीला बघून वाटतं, की त्याने ते नक्की खाल्लंय. म्हणून तर इतका वेळ भुंकतोय."
हे ऐकून शाहिद अफरीदी संतापून गेला आणि पूर्णपणे गप्प झाला. इरफानच्या मते, त्यानंतर अफरीदीने त्याच्याशी पुन्हा कधीही उलटसुलट बोलण्याचा प्रयत्न केला नाही.
दरम्यान, ऑस्ट्रेलिया विरुद्ध डिसेंबर 2024 मध्ये झालेल्या कसोटी मालिकेदरम्यान विराट कोहली आणि रोहित शर्मावर केलेल्या टीकेनंतर इरफानला आयपीएलच्या ब्रॉडकास्ट टीममधून वगळण्यात आलं.
मात्र, अलीकडे The Lallantop ला दिलेल्या मुलाखतीत इरफान पठाणनं या चर्चांना पूर्णविराम दिला. त्याच्या म्हणण्यानुसार, ना कोहली ना रोहित, तर हार्दिक पांड्याला त्याच्या टीकेचा त्रास झाला होता.
इरफान म्हणाला, “मी जर 14 सामन्यांपैकी 7 सामन्यांत टीका केली असेल, तर मी अजूनही सौम्य आहे. हे आमचं काम आहे. ब्रॉडकास्टर म्हणून प्रेक्षकांसमोर वस्तुस्थिती मांडणं. हार्दिकशी त्याचा कोणताही व्यक्तिगत वाद नाही. उलट, बडोद्यातून आलेल्या सर्व खेळाडूंना – मग ते दीपक हूडा असो, क्रुणाल पांड्या असो किंवा हार्दिक पांड्या – त्याने आणि युसुफ पठाणने कायम पाठिंबा दिला आहे.
2012 मध्ये त्याने सनरायझर्स हैदराबाद संघाला हार्दिकचं नाव सुचवलं होतं. मात्र त्यावेळी संघाच्या मार्गदर्शक मंडळाने ते ऐकलं नाही. नंतर व्हीव्हीएस लक्ष्मणनं स्टार स्पोर्ट्सवर कबूल केलं की, त्याने माझं ऐकलं नाही, ही चूक झाली, असेही इरफानने सांगितले.
रोहित शर्माकडून मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदाची सूत्रं घेतल्यानंतर हार्दिकवर चाहत्यांकडून टीका झाली होती. त्या वेळी इरफान पठाणनं उघडपणे हार्दिकचं समर्थन केलं होतं.