Virender Sehwag : धोनीने टीममधून काढलं, मी निवृत्ती घेणार होतो...; वीरेंद्र सेहवागचा मोठा गौप्यस्फोट

धोनीने संघातून बाहेर केल्यामुळे क्रिकेटमधून निवृत्ती घेणार होतो, पण सचिन तेंडुलकरच्या एका सल्ल्यामुळे माझं करिअर वाचलं," असा खळबळजनक खुलासा वीरेंद्र सेहवागने केला आहे.
Virender Sehwag
Virender Sehwagfile photo
Published on
Updated on

Virender Sehwag

नवी दिल्ली : "महेंद्रसिंह धोनीने संघातून बाहेर काढल्यामुळे मी एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार होतो, पण मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या एका सल्ल्यामुळे माझं करिअर वाचलं," असा खळबळजनक खुलासा भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने केला आहे. सेहवागच्या या गौप्यस्फोटाची भारतीय क्रिकेट वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.

भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील महान सलामीवीरांमध्ये वीरेंद्र सेहवागची गणना होते. आपल्या धडाकेबाज फलंदाजीने त्याने जगभरातील गोलंदाजांमध्ये दहशत निर्माण केली होती. कसोटी क्रिकेटमध्ये ८२.२३ च्या स्ट्राईक रेटने, तर एकदिवसीय सामन्यांमध्ये १०४.३३ च्या अविश्वसनीय स्ट्राईक रेटने धावा जमवणाऱ्या सेहवागने भारताच्या २०११ विश्वचषक विजयात महत्वाची भूमिका बजावली होती. मात्र, या विश्वचषकाच्या तीन वर्षे आधीच तो निवृत्ती घेणार होता.

काय म्हणाला वीरेंद्र सेहवाग?

समालोचक पद्मजीत सेहरावत यांच्या यूट्यूब चॅनलवर बोलताना सेहवागने हा खुलासा केला. तो म्हणाला, "२००८ साली ऑस्ट्रेलियात झालेल्या मालिकेवेळी मला सुरुवातीच्या काही सामन्यांनंतर कर्णधार धोनीने संघातून वगळले. त्यानंतर काही काळ माझी संघात निवड झाली नाही. त्यावेळी माझ्या मनात विचार आला की, जर मी प्लेइंग इलेव्हनचा भागच होऊ शकत नसेल, तर एकदिवसीय क्रिकेट खेळण्यात काहीच अर्थ नाही."

निवृत्तीच्या विचारांनी निराश झालेला सेहवाग थेट सचिन तेंडुलकरकडे गेला. याबद्दल बोलताना तो म्हणाला, "मी सचिन पाजींकडे गेलो आणि त्यांना सांगितले की, मला वनडे क्रिकेटमधून निवृत्त व्हायचे आहे. तेव्हा त्यांनी मला शांत केले आणि सांगितले की, १९९९-२००० च्या काळात त्यांच्यावरही असाच कठीण प्रसंग ओढवला होता आणि ते सुद्धा निवृत्तीचा विचार करत होते. पण तो वाईट काळ निघून गेला. सचिनने मला सल्ला दिला की, 'भावनेच्या भरात कोणताही मोठा निर्णय घेऊ नकोस. स्वतःला १-२ मालिकांचा वेळ दे आणि मग विचार कर.'"

सचिनच्या सल्ल्याने करिअर वाचले!

२००८ च्या त्या मालिकेत सेहवागची कामगिरी खरोखरच खराब झाली होती. त्याने ५ सामन्यांत केवळ ८१ धावा केल्या होत्या. दुसरीकडे, गौतम गंभीरने ५५ च्या सरासरीने ४४० धावा करत मालिका गाजवली होती, तर सचिन तेंडुलकरने ४४.३३ च्या सरासरीने ३९९ धावा केल्या होत्या. भारताने ती मालिका जिंकली होती. सचिनचा सल्ला सेहवागसाठी संजीवनी ठरला. त्याने पुढे धमाकेदार पुनरागमन करत धावांचा पाऊस पाडला. सेहवागने आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना मार्च २०१३ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला. अखेर, २० ऑक्टोबर २०१५ रोजी आपल्या वाढदिवसादिवशी त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news