

Gujarat team former captain Priyank Panchal Announces Retirement
अहमदाबाद : आयपीएलनंतर भारतीय संघ इंग्लंड दौरा करणार आहे. या दौर्यात भारतीय संघ इंग्लंडशी पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. याआधीच भारताचा क्रिकेटपटू प्रियांक पांचाळने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याचा रेकॉर्ड उत्कृष्ट राहिला आहे, पण त्याला भारतीय संघाकडून एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही.
प्रियांक पांचाळ हा देशांतर्गत क्रिकेटमध्ये गुजरात संघाकडून खेळायचा. प्रियांकने निवृत्तीची घोषणा केल्यानंतर गुजरात क्रिकेट असोसिएशनने त्याला शुभेच्छा दिल्या. गुजरात क्रिकेट असोसिएशनने आपल्या अधिकृत एक्स हँडलवरून केलेल्या पोस्टमध्ये असे लिहिले आहे की, हा एका युगाचा अंत आहे. प्रियांकने भारत ‘अ’ आणि गुजरात संघाचे सर्व फॉरमॅटमध्ये नेतृत्व केले. आम्ही त्याच्या समर्पणाला सलाम करतो आणि त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो.’
प्रियांक पांचाळने 2008 मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेट खेळायला सुरुवात केली. त्याने 127 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 8 हजार 856 धावा केल्या, ज्यात 29 शतके आणि 34 अर्धशतकांचा समावेश आहे. लिस्ट-ए मध्ये त्याच्या नावावर 3 हजार 672 धावांची नोंद आहे.
2016-17 मध्ये गुजरातला पहिले रणजी करंडक जिंकण्यास प्रियांक पांचाळने महत्त्वाची भूमिका बजावली. याशिवाय, त्याने विजय हजारे ट्रॉफी (2015-16) आणि सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी (2012-13 आणि 2013-14) देखील जिंकली.