

jhandu kumar Glasgow Commonwealth Games 2026 para powerlifting: ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धा २०२६ मध्ये भारताचे पदकांचे खाते झंडू कुमारने उघडून दिलं. २८ वर्षाच्या या खेळाडूने शुक्रवारी ग्लासगोमध्ये पुरूषांच्या हेवीवेट पॅरा पॉवरलिफ्टिंगमध्ये १९० किलो वजन उचलून भारताला कांस्य पदक जिंकून दिले. झंडू कुमारने अत्यंत हालाखीच्या परिस्थितीवर मात करत भारताच्या शिरपेचात हा मानाचा तुरा खोवला आहे. त्याला पोलिओ आणि आर्थिक संकटांचा सामना करावा लागला होता. त्याची संघर्षाची कहानी अनेकांसाठी प्रेरणा देणारी आहे.
झंडू कुमार ज्यावेळी पाच वर्षाचा होता त्यावेळी पोलिओ झाल्यामुळे त्याचे शरीर कमजोर झाले होते. मात्र पोलिओला आपली दुर्बलता न बनवता त्याने संघर्षाचा पर्याय निवडला. कौटुंबिक पार्श्वभूमी देखील हालाखीचीच होती. घर चालवण्यासाठी झंडूला हरनौत बाजारात भाजी विकावी लागत होती. कोविड काळात ओव्हरब्रिजच्या कामामुळे त्यांच्या कुटुंबाचे भाजी विकण्याचे दुकान बंद झालं. त्यावेळी पोट भरण्यासाठी तो झंडूने ई-रिक्षा चालवण्यास सुरूवात केली.
झंडू कुमार याचे आयुष्य सोपं नव्हतं. सकाळी जवळपास २० किलोमीटर दूर बिहार शरीफ जाऊन भाज्या खरेदी करायच्या. त्यानंतर ते सायंकाळी जाऊन बाजारात विकणे हे त्याचे आयुष्य झाले होते. मात्र दिवसाच्या या थकवणाऱ्या कामानंतरही झंडू हा वेटलिफ्टिंगची प्रॅक्टिस करत होता. त्याचे एकच ध्येय होते भारताची जर्सी घालून भारतासाठी मेडल जिंकायचं.
झंडूची दिवसाची कमाई ही ४०० ते ५०० रूपये असयाची. याच पैशातून तो घर खर्च चालवत होता. एका खेळाडूसाठी प्रोटीन सप्लीमेंटवरच दिवसाला १००० रूपये खर्च होतात. २०२३ मध्ये त्याने राष्ट्रीय पॅर पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये सहभाग घेतला होता. मात्र यासाठी त्याला आपला ई-रिक्षा विकावी लागली होती.
नशिबानं त्यावेळी साथ दिली नाही. झंडू हा एकही क्लीन लिफ्ट करू शकला नाहीत. अनेकांना त्याचा पॉवरलिफ्टिंगचा प्रवास इथंच संपला असं वाटलं. मात्र झंडूने नव्याने सुरूवात करत स्वतःला सिद्ध केलं.
राष्ट्रीय स्पर्धेदरम्यान झंडू कुमारच्या मेहनीतवर माजी पॅरा पॉवर लिफ्टर आणि राष्ट्रीय कोच राजिंदर सिंह राहेली यांची नजर पडली. त्यांनी झंडूला भारतीय क्रीडा प्राधिकरण अर्थात (SAI) च्या गांधीनगरमधील नॅशनल सेंटर फॉर एक्सलेंसमध्ये सराव करण्याची संधी दिली. तिथंच झंडूच्या कारकिर्दीला कलाटणी मिळाली.
यानंतर झंडूने मागे वळून पाहिलं नाही. त्यांनी खेलो इंडिया गेम्समध्ये रौप्य पदक पटकावलं. त्यानंतर त्याने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सातत्याने चांगली कामगिरी केली. एशिया ओशिनिया ओपन पॅरा पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये त्याने कांस्य पदकाची कमाई केली.
ग्लासगोमध्ये झंडू कुमारने पहिल्याच प्रयत्नात १८१ किलो वजन यशस्वीरित्या उचललं. त्यानंतर त्याने १९० किलो वजन उचलून कांस्य पदक निश्चित केलं. जर त्याने १९६ किलो वजन उचललं असं तर त्याने नवीन कॉमनवेल्थ गेम रेकॉर्ड प्रस्थापित केलं असतं. मात्र त्याच्या प्रयत्नांना यश आले नाही. तरी देखील त्याच्या चेहऱ्यावर कोणती निराशा नव्हती. त्याने आपले सर्वात मोठे स्वप्न पूर्ण केले होते.
पदक जिंकल्यावर झंडू कुमार म्हणाला की, मला असं वाटतंय की मी हवेत उडत आहे. हे माझे पहिले कॉमनवेल्थ गेम पदक आहे. माझ्या डोक्यात एकच गोष्ट सुरू होती. मला कोणत्याही परिस्थिती भारतासाठी पदक जिंकायचं होतं. आपल्या या यशात साई आणि टॉप्स या दोन व्यासपीठांचा मोठा वाटा असल्याचं सांगितलं. तिथं जर ट्रेनिंग घेण्याची संधी मिळाली नसती तर हे स्वप्न पूर्ण होऊ शकलं नसतं.'