

Gautam Gambhir On Pant: भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने अखेर ऋषभ पंतला उपकर्णधारपदावरून काढून टाकण्यााबबतचं मौन सोडलं आहे. ऋषभ पंतला भारतीय कसोटी संघाच्या उपकर्णधारपदावरून काढून त्याच्याऐवजी केएल राहुलला संघाचा उपकर्णधार करण्यात आलं आहे. नुकतेच अफगाणिस्तानविरूद्धच्या एकमेव कसोटी सामन्यासाठी संघाची घोषणा झाली त्यावेळी हे जाहीर करण्यात आलं होतं. आता केएल राहुल हा शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील संघाचा उपकर्णधार असणार आहे. याबाबत आता गौतम गंभीरने आपली प्रतिक्रिया दिली आहे.
भारताने शेवटची कसोटी मालिका दक्षिण अफ्रिकेविरूद्ध खेळली होती. भारताने ही मालिका २-० ने जिंकली होती. त्यावेळी ऋषभ पंतला चांगली कामगिरी करता आली नव्हती. गुवाहाटीमधील दुसऱ्या सामन्यात तो बेजबाबदार फटका मारून बाद झाला होता. यंदाचा आयपीएल हंगाम देखील त्याला फारसा चांगला गेलेला नाही. दरम्यान, गौतम गंभीरने पंतला आपले उपकर्णधारपद गमवावे लागल्याबद्दल वक्तव्य केलं.
सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत तो म्हणाला, 'भारताकडून खेळणे हीच एक जबाबदारी आहे. बाकीच्या गोष्टी या बाय प्रोडक्ट आहेत. ज्यावेळी तुम्ही भारताकडून खेळायला सुरूवात करता त्यावेळी तुम्ही उपकर्णधारपदाबाबत विचार करत नाही. तुम्ही भारतासाठी चांगलं खेळण्याबाबत विचार करत असता. त्यामुळं तुम्ही एका रोलमधून दुसऱ्या रोलमध्ये जाता हे फक्त बाय प्रोडक्ट आहे. त्यामुळं प्रत्येकाचे मुल्यमापन हे कामगिरीवरच होते. मग तो मी असो किंवा सपोर्ट स्टाफ असो किंवा खेळाडू असो. आंतरराष्ट्रीय क्रिकेट असंच आहे. ऋषभच्या बाबतीत बोलायचं झालं तर तो जसा आहे तशीच आम्ही त्याच्याकडून अपेक्षा करत आहोत.
गौतम गंभीर पुढे म्हणाला, 'आम्ही तू तुझा गेम खेळू नकोस असं सांगणार नाही. मात्र आतंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परिस्थितीनुसार खेळणं अत्यंत गरजेचं असतं. परिस्थिती काय आहे याची जाण सर्वात महत्वाची असते. संघ कोणत्या परिस्थिती आहे आणि ती परिस्थिती आपण कसं खेळलं पाहिजे कोणते शॉट्स खेळले पाहिजेत याचे भान असलं पाहिजे. मात्र याचा अर्थ असा नाही की प्रत्येक खेळाडूला तू सक्तीनं तुझ्या नैसर्गिक खेळापेक्षा वेगळा गेम खेळ असं सांगितलं जाणार नाही. मग ते कसोटी क्रिकेट असो वनडे क्रिकेट असो किंवा टी २० क्रिकेट शेवटी एकच ध्येय असते ते म्हणजे धावा करणं आणि विकेट्स घेणं. तुम्ही ते ध्येय गमावून चालणार नाही.'
भारतीय क्रिकेट संघाचे सहाय्यक प्रशिक्षक रेयान यांनी सांगितलं की कसोटी संघाचे उपकर्णधारपद गेल्यानंतर पंतकडून कोणतीही तक्रार करण्यात आलेली नाही. त्याने गौतम गंभीरसोबत चर्चा केली. त्यावेळी त्याला जर पंतने परिस्थितीनुसार आपल्या खेळात बदल केला तर ते संघ व्यवस्थापनाला जास्त आवडेल असं सांगितलं आहे.
रेयान म्हणाले, 'अशा संघात लिडर होण्यासाठी तुम्हाला कोणत्याही टायटलची गरज नाही. मला वाटतं की ऋषभ पंतला या गोष्टी कळतात. मला वाटतं की तो चांगला रोल मॉडेल आणि अनुभवी खेळाडू होण्यासाठी कमिटेड असेल.'