

भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. आता निमित्त आहे त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर केलेल्या एका पोस्टचे.
Gautam Gambhir on Shashi Tharoor post
नागपूर : भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. आता निमित्त आहे त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर केलेल्या एका पोस्टचे. आपल्याकडे संघाचे पूर्ण अधिकार नसल्याचे संकेत गंभीरने या माध्यमातून दिले आहेत. गुरुवारी, २२ जानेवारी रोजी नागपूरमध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी-२० विजयानंतर गंभीर यांनी केलेल्या टिप्पणीमुळे सोशल मीडियावर चर्चेचा धुरळा उडला आहे.
काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी सामन्यापूर्वी नागपूरमध्ये गंभीरची भेट घेतली होती. या भेटीचा फोटो शेअर करताना थरूर यांनी लिहिले होते की, "पंतप्रधानानंतर भारतातील सर्वात कठीण काम सांभाळणारे माझे जुने मित्र गौतम गंभीर यांच्याशी नागपूरमध्ये मनमोकळी चर्चा झाली. दररोज लाखो लोकांकडून त्यांच्या निर्णयांवर शंका घेतली जाते, तरीही ते शांत राहून धैर्याने पुढे जात आहेत. त्यांच्या जिद्दीचे आणि नेतृत्वाचे कौतुक! त्यांना भविष्यासाठी शुभेच्छा."
शशी थरूर यांच्या या कौतुकास्पद पोस्टला उत्तर देताना गंभीरने टीकाकारांवर निशाणा साधला. त्यांनी केलेल्या पोस्टमध्ये नमूद केले की, "जेव्हा परिस्थिती निवळेल, तेव्हा प्रशिक्षकाच्या तथाकथित 'अमर्याद अधिकारां'मागचे सत्य आणि तर्क स्पष्ट होईल. तोपर्यंत, माझ्याच लोकांविरुद्ध मला उभे केले जात आहे, हे पाहून मला आश्चर्य वाटते."
आपल्याकडे प्रशिक्षक म्हणून अमर्यादित अधिकार नाहीत, हे गंभीर यांनी आपल्या पोस्टमध्ये स्पष्ट केले आहे. तसेच त्यांनी अन्य कोणाचे नावही घेतले नाही. तरीही त्याचा रोख भारतीय निवड समिती आणि विशेषतः अध्यक्ष अजित आगरकर यांच्याकडे असल्याच्या चर्चा चाहत्यांमध्ये रंगल्या आहेत.
गौतम गंभीरने पदभार स्वीकारल्यापासून भारतीय संघात मोठे फेरबदल पाहायला मिळाले आहेत. टीम इंडियाच्या टी-२० संघाच्या कर्णधारपदी सूर्यकुमार यादवची निवड झाली. तसेच त्यांच्या कार्यकाळात टीम इंडियाचे स्टार फलंदाज रोहित शर्मा, विराट कोहली आणि रविचंद्रन अश्विन यांनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. यानंतर एकीकडे वनडे आणि कसोटी संघाचा कर्णधार शुभमन गिल याला थेट आगामी विश्वचषक स्पर्धेसाठीच्या टी-२० संघातून वगळण्यात आले आहे. त्याचबरोबर भारतात आणि ऑस्ट्रेलियात झालेल्या कसोटी मालिकांमधील पराभव, तसेच न्यूझीलंडविरुद्धचा ऐतिहासिक वनडे मालिका पराभव यामुळे गंभीर यांच्यावर टीकेची चौफेर झोड उठली आहे. अशा परिस्थितीत, "आपल्याकडे पूर्ण अधिकार नाहीत" असे सुचवून गंभीरने बीसीसीआयमधील अंतर्गत वादाचे संकेत दिल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.