

Fact Check Gautam Gambhir-Virat Kohli Viral Video: भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली आणि टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्याशी संबंधित एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये स्टेडियममध्ये प्रेक्षक “गौतम गंभीर, हाय-हाय” अशा घोषणा देतात आणि त्यावर विराट रागाने प्रतिक्रिया देतो, असा दावा केला जात आहे. मात्र आता या व्हिडीओबाबत महत्त्वाची माहिती समोर आली असून हा व्हिडीओ डिजिटल पद्धतीने एडिट (Altered) करण्यात आला असल्याचे फॅक्ट चेकमध्ये स्पष्ट झाले आहे.
फॅक्ट चेकनुसार, व्हायरल व्हिडीओमधले दृश्य इंदूरच्या होळकर स्टेडियमवरचे आहेत. भारताचा सामना संपल्यानंतर पोस्ट-मॅच प्रेझेंटेशनदरम्यान स्टँडमधून हा व्हिडीओ कुणीतरी रेकॉर्ड केला होता. त्या वेळी विराट कोहली हा गौतम गंभीर, श्रेयस अय्यर, हर्षित राणा, के.एल. राहुल यांच्यासोबत मैदानात उभा असलेला दिसत आहे.
पण या व्हिडीओमध्ये ऐकू येणारा “गंभीर हाय-हाय”चा आवाज मात्र इंदूरच्या स्टेडियमवरचा नाही, असे तपासात उघड झाले आहे. म्हणजेच व्हिडीओवर दुसऱ्या घटनेचा ऑडिओ लावून तो व्हिडीओ व्हायरल केला आहे.
फॅक्ट चेकमध्ये आढळून आले की, “गंभीर हाय-हाय”च्या घोषणा गेल्या वर्षी गुवाहाटीमध्ये भारत-दक्षिण आफ्रिका कसोटी सामन्यादरम्यान दिल्या होत्या. त्या वेळी भारताला पराभव स्वीकारावा लागला होता आणि स्टेडियममध्ये काही चाहत्यांनी गंभीरविरोधात घोषणाबाजी केली होती.
त्या घटनेदरम्यान भारतीय संघाचे बॅटिंग कोच सितांशू कोटक आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज यांनी चाहत्यांना थांबवण्याचा प्रयत्न केल्याचेही समोर आले होते. ही घटना त्या वेळी मैदानात उपस्थित असलेल्या माध्यमांनीही नोंदवली होती.
इंदूरमध्ये काही चाहत्यांनी गंभीरवर टीका केली का, हे ठामपणे सांगता येत नाही. कारण फॅक्ट चेकनुसार, मैदानात उपस्थित अनेक माध्यमसंस्थांकडून याबाबत कोणतीही अधिकृत किंवा खात्रीशीर माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे “इंदूरमध्ये गंभीरविरोधात घोषणा दिल्या” असा दावा करणारा व्हिडीओ खरा मानता येत नाही.
दरम्यान, संघाच्या कामगिरीमुळे गौतम गंभीरवर दबाव वाढल्याची चर्चा क्रिकेट वर्तुळात सुरू आहे. भारताने घरच्या मैदानावर आणखी एक मालिका गमावल्याने टीकेची धार वाढली आहे.
रिपोर्टनुसार, गंभीरचा करार 2027 वनडे वर्ल्डकपपर्यंत असण्याची शक्यता असून त्याचे लक्ष्य 2026 टी-20 वर्ल्डकपमध्ये भारताला यश मिळवून देणे असेल. मात्र अशाच प्रकारचे पराभव सुरू राहिले, तर भविष्यात गंभीरचे पद अडचणीत येऊ शकते, अशीही चर्चा आहे.
व्हायरल व्हिडीओमधील व्हिडीओ क्लिप इंदूरची आहे, पण त्यावर लावलेला “गंभीर हाय-हाय”चा ऑडिओ दुसऱ्या घटनेचा आहे. त्यामुळे विराट कोहली इंदूरमध्ये त्या घोषणांवर चिडला, हा दावा भ्रामक/एडिटेड असल्याचे फॅक्ट चेकमध्ये स्पष्ट झाले आहे.