IND vs AUS : वारंवार टॉस गमावण्याबद्दल गिलचा मनोरंजक खुलासा, म्हणाला; ‘माझ्या कुटुंबालाही...’
सिडनी : भारताने सलग १८ टॉस गमावण्याचा एक नकोसा विक्रम नोंदवला आहे. युवा फलंदाज शुभमन गिल याने कर्णधार म्हणून सलग तीन वेळा टॉस गमावला आहे. भारताचे कर्णधारपद भूषवत असताना टॉसमध्ये सतत होत असलेल्या अपयशाबद्दल आपले कुटुंबही चिंतित असून, त्यांना हा पराभवाचा सिलसिला थांबवण्यासाठी अनेक उपाय सुचवत असल्याची माहिती शुभमन गिलने दिली आहे.
सिडनी येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात गिलने कर्णधार म्हणून तिसरा टॉस गमावला, ज्यामुळे भारताने सलग १८ व्यांदा टॉस हरण्याचा नकोसा विक्रम केला. गिलच्या आधी रोहित शर्माने सलग १५ वेळा टॉस गमावला होता. टॉस हरण्याची ही मालिका २०२३ च्या विश्वचषक फायनलपासून सुरू झाली होती.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनीमध्ये नऊ गडी राखून विजय मिळवल्यानंतर आणि मालिकेत 'क्लीन स्वीप' होण्यापासून वाचल्यानंतर गिलने सामन्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले की, ‘माझे कुटुंबीयही टॉससाठी काहीतरी उपाय सांगत आहेत.’
दोन लाख ६२ हजारांत एकदाच होण्याची संभाव्यता
टॉस आपल्या बाजूने येण्याची संभाव्यता नेहमी ५०-५० टक्के असते, परंतु सलग १८ टॉस हारण्याची संभाव्यता केवळ ०.०००३८१४७% आहे. कर्णधार म्हणून गिलची ही पहिली एकदिवसीय मालिका फारशी खास राहिली नाही. भारताला या मालिकेत २-१ ने पराभव पत्करावा लागला. गिलने तीन सामन्यांमध्ये केवळ ४३ धावा केल्या, ज्यात २४ ही त्याची सर्वोच्च धावसंख्या होती. मात्र, यामुळे त्याच्या आत्मविश्वासावर कोणताही विपरीत परिणाम झालेला नाही.
पराभवानंतरही गिलचा आत्मविश्वास कायम
कर्णधाराने सांगितले की, ‘पहिल्या सामन्यात मी लेग साइडला बाद झालो. त्यामुळे मी माझ्या फलंदाजीबद्दल फारसा विचार करत नाहीये. कधीकधी असे घडते. अर्थात, प्रत्येक सामन्यात तुम्हाला संघासाठी चांगली कामगिरी करायची असते, पण मी माझ्या कामगिरीबद्दल फारसा चिंतित नाही.’
कोहली आणि रोहितचे कौतुक
सिडनीतील मोठ्या विजयासाठी निर्णायक ठरलेल्या रोहित शर्मा (१२१*) आणि विराट कोहली (७४*) यांच्या १६८ धावांच्या भागीदारीचे गिलने मनमोकळेपणाने कौतुक केले. गिल म्हणाला, ‘ते गेल्या १५ वर्षांपासून हे करत आले आहेत. त्यांना अशा प्रकारे खेळताना आणि संघाला मिळवून देताना पाहणे हा खरोखरच एक सुखद अनुभव आहे.’

