

Vaibhav Sooryavanshi K Srikkanth : आशिया कप राईजिंग स्टार स्पर्धेत वैभव सूर्यवंशीने युएईविरूद्धच्या सामन्यात मोठा धमाका करत आतापर्यंतचे सर्वाच वेगवान द्विशतक ठोकले. यानंतर जगभरातून त्याच्या कौतुकाचे पाठ सुरू आहेत. आता भारताचे माजी सलामीवीर कृष्णमाचारी श्रीकांत यांनी वैभव सूर्यवंशीबाबत मोठे वक्तव्य केलं असून बीसीसीआयकडे मागणी देखील केली आहे. श्रीकांत हे बीसीसीआयचे माजी निवडसमिती अध्यक्ष असल्यानं त्यांच्या मागणीला एक वेगळेच वजन आहे.
श्रीकांत यांनी १५ वर्षाच्या वैभव सूर्यवंशीला जर तयार करायचं असेल तर प्रत्येक फॉरमॅटमध्ये संधी दिली गेली पाहिते. त्याची गुणवत्ता बिघडवू नका. त्याला वर्ल्डकप २०२७ च्या वनडे टीममध्ये घ्या अशी मागणी केली आहे. वैभवने नुकतेच आपल्या ५३ चेंडूत केलेल्या २०४ धावांच्या खेळीत २८ षटकारांची आतशबाजी केली होती.
श्रीकांत यांनी आपल्या युट्यूब चॅनलवर बोलताना सांगितलं की, वैभव सूर्यवंशी कसोटी संघात देखील असला पाहिजे. जरी तुम्ही त्याला प्लेईंग ११ मध्ये खेळवलं नाही तर तो संघासोबत असला पाहिजे. वैभवला श्रीलंकेविरूद्धच्या वनडे मालिकेत देखील संधी द्या अशी मागणी श्रीकांत यांनी केली आहे. जर त्याची २०२७ च्या वनडे वर्ल्डकपमध्ये निवड होते तर तो एकट्याच्या जिवावर सामना जिंकून देऊ शकतो.
व्हिडिओत श्रीकांत म्हणतात, 'वैभव हा एक सर्व फॉरमॅट खेळू शकणारा खेळाडू आहे. तुम्ही किमान त्याला कसोटी खेळवत नाही. मात्र त्याला कसोटीच्या १५ च्या संघात तरी ठेवा. आता तरी तुमच्या सर्व शंकांचे निरसन झाले असेल. श्रीलंकेच्या वनडे मालिकेसाठी त्याला संधी द्या. त्याला त्याच्या विरूद्ध वनडे सामना खेळू द्या. जर खरंच तुम्ही वैभव सूर्यवंशीला तयार करू इच्छिता तर त्याला २०२७ च्या वनडे वर्ल्डकपसाठी घेऊन जा. त्याला १५ च्या संघात ठेवा. एक दिवस तो तुम्हाला त्याच्या एकट्याच्या जीवावर सामना जिंकून देईल. तो ज्या प्रकारे फलंदाजी करतोय त्यावरून फक्त पॉवर नाही तर टायमिंग देखील महत्वाची आहे हे दिसून येतं.
श्रीकांत पुढे म्हणाले की, 'फक्त ताकदीची गोष्ट नाही. त्याचा आत्मविश्वास देखील महत्वाचा आहे. तो शांत आणि स्थीर दिसतो. तो अडचणीत आलाय असं कधी दिसत नाही. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे त्याला माहिती आहे की त्याला काय करायचं आहे. तो जिनियस आहे.'
'आधी क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर आला. त्यानंतर किंग विराट कोहली आला. आता तो क्रिकेटच्या देवाचा मुलगा आहे. जर या खेळाडूला तुम्ही प्रोत्साहन दिलं नाही, खेळवलं नाही आणि त्याला आपण तयार केलं पाहिजे असं म्हणू लागलो तर ते चुकीचं आहे. अशा प्रकारे तुम्ही त्याचे क्रिकेट बिघडवून टाकत आहात. संघ व्यवस्थापन, निवडसमिती कृपा करून जागे व्हा.
विशेष म्हणजे आज आशिया रायजिंग स्टार क्रिकेट स्पर्धेत भारत आणि श्रीलंका यांच्यात सेमी फायनल सामना होत आहे. या सामन्यात पुन्हा एकदा वैभव सूर्यवंशीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. आजच्या सामन्यात तो काय मोठा कारनामा करतो हे पाहण्यासाठी सर्वजण टीव्ही अन् मोबाईलला डोळे लावून बसतील.